निर्सगोपचार एक वरदान

Parent Category: मराठी साहित्य Category: लेख Written by सौ. शुभांगी रानडे

सौ.ज्योत्स्ना जोशी,
निसर्गोपचार तज्ञ व प्राणिक हिलर,
मो.नं.8454948258

निसर्गोपचार म्हणजे निसर्गातील तत्वे वापरुन केलेले उपचार, रोगनिवारणासाठी निसर्गाने मानवाला अनेक मार्ग दिलेले आहेत, ते म्हणजे प्रत्येकाच्या शरीरामध्ये जन्मजात असलेली नैसर्गिक जीवनशक्ती/चैतन्यशक्ती, निसर्गानेच बहाल केलेल्या या अद्भूतशक्तीची अनुभूती सर्वांनाच येत असते. उदा.काम करतांना विळी, सुरी इत्यादींनी हाताला कापले तर जखम काही न करताच बरी होते, खूप काम केल्यावर हात, पाय दुखल्यास दुस-या दिवशी आपोआप थांबतात, तसेच सर्दीसुध्दा काहीही उपचार न करता बरी होते, लहान मुले पोट दुखल्यास दुध पीत नाहीत. हीच शक्ती प्राणीमात्रांमध्येही कार्यरत असते. उदा.प्राणी आजारी पडल्यास अन्नसुध्दा घेत नाहीत, निपचीत पडुन राहतात किंवा गवत खातात. निसर्गशक्तीची हाक ऐकून तिची कशी मदत करायची, उपजतच काय उपचार करायचे हे त्यांना माहिती असते, ह्यालाच निसर्गोपचार म्हणतात. आणि म्हणूनच आजकाल सामान्य माणूस निसर्गोपचाराकडे वळू लागला आहे.

आजारपण येऊच नये यासाठी आरोग्यनियमांची शिकवण घेउन उपचार पध्दतीचे नियम आपण श्रध्दापूर्वक पाळणे महत्वाचे आहे. निसर्गोपचार चिकीत्सेचा हाच उद्देश आहे. फक्त रोगाची लक्षणे पळवून लावणे हा हेतू नसून रोगाचे मूळ कारण नष्ट करून शारीरीक स्वास्थ्य परत मिळविणे व रोग पुन्हा उद्भवूच न देणे हा त्याचा मूळ हेतू आहे. या पध्दतीने शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती प्रबळ करून स्वतःच रोगावर हल्ला करून शरीराचे रोगनिवारणाचे काम होउन संपूर्ण स्वास्थ्य अनुभवता येईल ह्यात तिळमात्र षंका नाही. मोकळी हवा, सूर्यप्रकाश, योग्य आहार, व्यायाम आणि शास्त्रीय पध्दतीने विश्रांती, सकारात्मक विचार आणि योग्य मानसिक वृत्ती, ध्यानधारणा या सर्वांमुळे शरीर आणि मन निरोगी राहतात. निसर्गाचे नियम पाळले नाही तर रक्तामध्ये दोष निर्माण होउन शरीरामध्ये विषारी व टाकाऊ पदार्थ साठतात त्यामुळे पचनसंस्था बिघडून विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी आतडी, मुत्रपिंड, फुप्फुसे आणि त्वचा यांना जास्तीचे काम करावे लागते. अयोग्य अनैसर्गिक आहार, व्यायामाचा अभाव, अती श्रम, वाईट सवयी, विश्रांतीचा अभाव किंवा अधिक आराम, मानसिक ताणतणाव ही सर्व रोगांची प्रमुख कारणे आहेत,

निसर्गोपचारतज्ञ फक्त सापेक्षबुध्दीने मदत करीत असतो आणि रूग्णाला निसर्गाचे नियम समजावून सांगत असतो.

मानवाचे शरीर हे पंचमहाभूतांनी व्यापलेले असून त्यांचा सुयोग्य समतोल षरीरात असतो. जल, पृथ्वी, तेज, वायू, आकाश व अग्नी ही पंचमहाभूते ब्रम्हांडात आणि आपल्या शरीरात कार्य करतात. निसर्गोपचार शास्त्राप्रमाणे हया पंचमहाभूतांचा परस्परांशी असलेला शरीरातील समतोल बिघडून शरीर रोगग्रस्त होते. निसर्गातील माती, पाणी, वायू, अग्नि आणि आकाश या मुलभूत घटकांच्या योग्य उपचारामुळे शरीरातील विषारी द्रव्यै बाहेर टाकून शरीर शुध्दी होउन रोग बरे करण्याचे सामर्थ्य शरीरास प्राप्त होउन ते अधिक कार्यक्षम बनते. जलउपचार, मातीउपचार, सूर्यस्नान, लंघन, प्राणायाम व श्वसनाचे प्रकार हे पंचमहाभूतांचे उपचार करून रोग निवारण करण्यात येते.

जलतत्व - जल ह्याला जीवन म्हटले आहे, जलतत्वाचे महत्वाचे स्थान उदरपोकळी म्हणजे कटीपोकळी मध्ये असते. पाण्याशिवाय माणूस / सृष्टी जगू षकत नाही, म्हणून जलउपचार हे अत्यंत सोपे व महत्वाचे आहेत. हवा ही पहिली व पाणी ही दुसरी गरज आहे. शरीराला पाणी हे अंतर्गत स्वच्छता, बाह्य स्वच्छता, रक्ताभिसरण, पाचक रस निर्मिती, शरीराचे तापमान राखणे, पचन-शोषण-उत्सर्जन हया क्रियांसाठी लागते. पाण्याचा महत्वाचा गुण हा रस एकत्र राखणे, वाढविणे, शमन करणे हा असतो. तसेच रस व वहन यामुळे शरीराची स्वच्छता होते. पाणी उपचार वेदना व सूज कमी करतात. रक्ताभिसरण वाढून साठलेले विजातीय पदार्थ उत्सर्जन संस्थेकडे पाठवून स्वच्छता होते. जलतत्वामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होउन पेशी व स्नायू मधील आकुंचन व प्रसरण वेगाने होते. हयामुळे रोग किंवा अडकलेले विजातीय पदार्थ बाहेर टाकले जातात व रोगनिवारण होते. या उपचारामध्ये थंड व गरम स्नान, जलप्राशन, फवारास्नान, अभ्यंग स्नान, पादस्नान, मेरूदंड स्नान, कटिस्नान, बाश्पस्नान, स्थानिक बाश्पउपचार, पाणीपट्टी, स्थानिक लपेट व सर्वांग लपेट हयंाचा समावेष असतो. वेदना, सूज, ताप, दाह, डोकेदुखी, पोटदुखी, उच्चरक्तदाब, दमा, झोप न लागणे, पित्तदोष, अपचन, पाठदुखी, गुडघेदुखी, पायदुखी, मासिक पाळीचे त्रास, मुत्रपिंडाचे रोग, वजन कमी करणे इत्यादी रोगांवर जलोपचाराचा फायदा होतो. त्वचेखालील रक्ताभिसरण वाढून विजातीय पदार्थ बाहेर पडल्यामुळे त्वचा सतेज होते व शरीराचे तापमान राखले जाते, तसेच मुत्रावाटे व घामावाटे पाणी शरीराची स्वच्छता राखण्याचे महत्वाचे काम करते.

पृथ्वीतत्व- म्हणजेच जडत्व. हे शरीरामध्ये मांस, मेद व स्नायूंमध्ये असून ह्याचे स्थान पायापासून मांड्यांपर्यंत असते. महत्वाचे गुण घट्ट करणे, आकार देणे व गंध हे आहेत. हयामुळे इतर तत्व शरीरात एकत्र राहतात. याचे कार्य शमन व शोषण म्हणजे आकुंचन करणे. यामध्ये मातीचे उपचार फायद्याचे ठरतात, माती व पाणी यांच्या संयोगाने माती पट्टी तयार करून वेदना होत असलेल्या अवयवावर अर्धा तास ठेवल्यास मातीच्या स्थितीस्थापक तत्वामुळे रक्ताभिसरण होउन विजातीय व आम पदार्थ बाहेर पडतात. स्नायूंचे आकुंचन व प्रसरण सुधारून विषारी द्रव्य, साचलेला आम उत्सर्जित होउन रोगनिवारण होते. तसेच मेद वितळतो, स्वेदग्रंथीचे व त्वचेचे उत्सर्जन कार्य सुधारून त्वचा नितळ, सुरकुत्या कमी होउन त्वचा मउ होते. सांधेदुखी, संधीवात, सूज, वेदना, दाह, पित्तदोष, पोटदुखी, डोकेदुखी, अपचन, मुत्रपिंडाचे रोग, स्नायू मुरगळणे इत्यादीमध्ये मातीउपचार केले जातात. संधीवातामध्ये तेलमालीश नंतर सर्वांगमाती लेप घेतल्यास वेदना लगेच कमी होउन सांध्यातील लवचीकता कायम राखली जाते.


तेजतत्व - अन्न हे तेजतत्वापासून बनते. याचे स्थान कटीपोकळी पासून श्वासपटलापर्यंत म्हणजेच उदरपोकळी मध्ये असते. सर्व वनस्पती आपले अन्न सूर्यकिरणाच्या तेजतत्वाच्या समीकरणाने पाणी व क्षारापासून बनवितात. प्राणी हे वनस्पतीपासून तर काही प्राणी अन्य प्राण्यांना खाऊन अन्न मिळवितात. मनुष्य मुख्यत्वे प्राणीजन्य पदार्थाचे सेवन करतो. शरीरामध्ये तेजतत्व हे पाचकरसामध्ये, डोळ्यामध्ये, मेंदू, हातपायंाच्या तळव्यामध्ये, जीभेचे टोक, त्वचा, कान, पेषींची केंदे्र इत्यादी मध्ये असतात. सूर्यस्नान तेजतत्वाचा उपचार आहे. तेलमालीष करून सकाळच्या कोवळया उन्हात उघडया अंगाने अर्धातास उभे राहिल्यास जीवनसत्व-ड मिळून मुडदुस, पोलीओ, रिकेट्स पूर्ण बरे होतात. कॅलशियमचे कार्य चांगल्या प्रकारे होते. संधीवात, हाडांचे विकार, दातदुखी, सांधेदुखी, कंपवात, त्वचेचे रोग, त्वचेचे रक्ताभिसरण, स्वेदग्रंथीचे कार्य सुधारून विजातीय पदार्थांचे उत्सर्जन होते.

वायूतत्व - यालाच प्राणवायू असे म्हणतात. जीवनावश्यक तत्व. याचे शरीरातील स्थान श्वासपटलापासून मानेपर्यंत आहे. शरीरभर वहनाचे काम हे तत्व करते. त्यामुळे उपचारपण संपूर्ण शरीरावरच केले जातात. फुप्फुसातील वायुकोश, पेशीतील, मेंदूतील व सायनस पोकळया इत्यादी मध्ये वायूतत्व असते. संदेशवहन, अभिसरण, उत्सर्जन, पोषणरस पुरविण्याचे व क्रिया करण्याचे कार्य विविध अवयव व संस्थेमार्फत वायुत्वामुळेच केले जाते. त्यामुळे पचन, पोषण व उत्सर्जनाचे कार्य सुधारून रोगनिवारण होते. या उपचारात वायूसेवन, योगासने, प्राणायाम, दिर्घश्वसन केल्याने प्राणवायूचे प्रमाण वाढून स्नायूंमधील लवचीकता कायम राखली जाते. कार्बनडायऑक्साईडचा निचरा होउन विजातीय पदार्थाचे उत्सर्जन चांगल्या प्रकारे होउन रोग निवारण होते. शरीरात विविध तत्वांचा समतोल राखला जाउन शरीरातील स्त्राव योग्य प्रमाणात स्त्रवतात व मानसिक स्वास्थ्य संयमित राहते. वायूतत्वाचे उपचार स्नायूंचे आजार, संधीवात, मानसिक आजार, हृदयरोग, फुप्फुसांचे आजार, दमा, पित्ताचे विकार, मासिक पाळीचे आजार, उच्च रक्तदाब, निम्न रक्तदाब इत्यादीवर उपयुक्त ठरतात.

आकाशतत्व - हे तत्व सर्व शरीरात व्यापलेले आहे. याचे स्थान मानेपासून डोक्यापर्यंत आहे. पचनमार्ग, श्वसनमार्ग, हाडे, पेशी, कान, नाक यातील पोकळयांमध्ये या तत्वाचा संचार आहे. वायू व जलतत्वाबरोबर आकाशतत्वाचे उपचार केल्यास फायदेशीर ठरतात. यामध्ये महत्वाचा उपचार म्हणजे लंघन करणे. याच्या उपचारामुळे विजातीय पदार्थ, उत्सर्जन संस्थेकडे पाठविले जाउन शरीराबाहेर काढले गेल्यामुळे रक्ताभिसरण सुधारून संपूर्ण शरीरामध्ये पंचमहाभूतांचा समतोल राखला जातो. लंघनामुळे संपूर्ण शरीर रोगमुक्त होते. फक्त मधुमेह, अशक्तपणा, कमी वजन असणा-या व्यक्ती, क्षयरोगी अथवा दीर्घकाळाच्या आजारांमध्ये, सर्जरीनंतर लंघन करू नये. लंघन हे 1 दिवसापासून ते 40 दिवसांचे असू शकते. लंघन हे फक्त निसर्गोपचार केंद्रामध्ये तज्ञांच्या देखरेखी खाली घेणे आवश्यक आहे.

Hits: 287

X

Right Click

No right click