रक्षाबंधन - ४

Parent Category: मराठी साहित्य Category: लेख Written by सौ. शुभांगी रानडे

या पाकिस्तानी अतिरेक्याची योजना अशी होती की १५ ऑगस्ट रोजी सकाळी ७.५५ ते ८.०५ या दहा मिनिटाच्या मुदतीत तीस स्फोट व्हावेत. दादरला येणार्‍याव जाणार्‍याजलद लोकलच्या दोन बोगीमध्ये अणि दादर स्टेशन मास्तरच्या कार्यालयात, असे पाच स्फोट मध्य रेल्वे मध्ये, याप्रमाणे कुर्ला व ठाणे येथेही पाच स्फोट, असे १५ स्फोट मध्य रेल्वेमध्ये, त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वेवर दादर, अंधरी व बोरिवली या ठिकाणी १५ स्फोट, असे एकूण तीस स्फोट दहा मिनिटात होणार होते. त्यासाठी रविवारी संध्याकाळी ५ वाजता बाँब भरलेले जेवणाचे ३० डबे, या तळघरात आणणार होते. त्याच बरोबर ३० रिमोटही येणार होते. १५ ऑगस्टला पहाटे पाचपासून या मुलाना डबे व रिमोट घेऊन तो पाकिस्तानी सोडणार होता. १५ ऑगस्टच्या झेंडा वंदनात काही गडबड होऊ नये म्हणून सर्व पोलिस फोर्स तिकडे गुंतलेला असणार, त्यामुळे इतर ठिकाणी दुर्लक्ष, हे अपेक्षितच होते.
रविवारी दुपारी बारा वाजता महंमद देशपांडेच्या घरी गेला. मनोहर व मधुरा तेथे आधीच आले होते. सर्वानाच भेटीचा आनंद झाला. मधुराने मनोहरला व महंमदला शेजारी शेजारी बसवून ओवाळले व राखी बांधली. मधुरा दोघांना म्हणाली कीं लहानपणी बांधलेली राखी हाताची शोभा वाढवते. पण मोठेपणी बांधलेली राखी कर्तव्याची जाणीव करून देते. महंमदने १०० रू. चा चांदीचा कुंकवाचा करंडा तिला भेट दिला. त्यानंतर जेवणे झाली. मनोहर, मधुरा व महंमद दोन तास गप्पा मारत बसले होते व एकमेकांच्या कामाची माहिती करून घेत होते. महंमदचे काम विशेष नव्हतेच. पण मनोहरचे काम प्रचंड होते. जवळ जवळ दहा हजार आदिवासी लोकांच्या जीवनात त्याने सर्व दृष्टीने आनंद फुलवला होता. चालता बोलता, त्यांच्यात मिसळणारा आणि त्यांच्या उत्कर्षासाठी झटणारा हा देव आहे, अशी त्यांची भावना होती. ४ वाजता महंमद कॉफी घेऊन बाहेर पडला अणि एका बोळात जाऊन डोळे मिटून शांतपणे विचार करत बसला. मनोहर काय करतो आहे अणि आपण काय करतो आहोत याची तुलना करून त्याला त्याच्या जीवनाची लाज वाटू लागली. लहानपणी एकत्र खेळलेले हे मित्र अणि मोठेपणी एकजण देव आणि दुसरा दानव. स्फोटामध्ये जे ४-५ हजार लोक मरणार होते, त्यांच्या बायकांच्या कपाळावरील कुंकू पुसले जाणार होते. उद्या सकाळी ताई जर त्या बोगीत असेल तर ? कशाला तिला आपण कुंकवाचा करंडा भेट दिला ? नाही, हे बरोबर नाही, हे थांबायला हवे पण कसे थांबणार ?
एक तासाने तो पुन्हा मनोहरच्या घरी गेला. मनोहरला त्याने एकांतात या होणार्‍या ३० स्फोटांची सारी कल्पना दिली. मनोहर त्याला घेऊन एका आमदाराच्या घरी गेला. त्याला घेऊन ते मुंबईचे मुख्य पोलिस आयुक्त यांचे घरी गेले. एकांतात त्याना सर्व कल्पना दिली. ज्या तळघरात ३० बाँब आहेत व ही मुले ७ नंतर तेथे मुक्कामाला आहेत, त्याचा विचार करून कांही योजना ठरली. महंमद जर जास्त वेळ तेथे राहिला तर त्या अतिरेक्याला शंका येईल म्हणून तो परत गेला. जाताना त्याने राखी काढून मनोहरच्या हातात दिली.
संध्याकाळी ८ चे सुमारास त्या भागात बँड पथकाचे तालावर १५० ते २०० महिला नाचत होत्या. त्याशिवाय ४० महिला नटून थटून आल्या होत्या. त्या नाचत नव्हत्या, नाचणार्‍यामहिलापैकी निम्म्या नाचत व निम्म्या विश्रांती घेत. त्यानंतर त्यांच्यात बदल होई. ज्या इमारतीच्या तळघरात बाँब ठेवले होते तेथे ही मिरवणूक १० वाजता आली. चांगल्या सुशिक्षित मुली व बायका नाचताहेत हे पासून सर्व मुले आणि अतिरेकीही बाहेर आला. बायकंाचा नाच पाहून अतिरेकी गुंग झाला. त्याला त्या नटलेल्या तरूणीपैकी एकीने विचारले, आम्हाला पाणी मिळेल का ? त्याने मुलाना पाणी आणण्यासाठी पाठवले. महंमद त्याचे शेजारीच उभा होता. त्याने मधुराला खूण करून सांगितले की हाच तो अतिरेकी. त्याला जर का काही धोक्याची कल्पना आली तर तो पळत हॉलमध्ये जाईल व सर्व बाँब उडवून उध्वस्त करेल याची कल्पना होतीच. पाणी पिता पिता त्यातील सात आठ तरूणी त्या दाराशी गेल्या आणि त्यानी हॉलचे दार ब्लॉक केले. चारपाच तरूणीनी पिस्तुल रोखून अतिरेक्याला घेरले. चाळीस महिलापैकी उरलेल्यांनी त्या मुलाना पकडले. त्या नटलेल्या चाळीस तरूणी म्हणजे मुंबईच्या पोलिस दलातील इन्स्पेक्टर व हवालदार होत्या. पाचच मिनिटात या सर्वांना पकडण्यासाठी स्वत: आयुक्त आले होते. सर्वांची रवानगी पोलीस कोठडीत झाली. बाँब शोध पथकाने येऊन सर्व बाँब निकामी केले. या छाप्याची कल्पना सामान्य जनतेला येऊ नये म्हणून तेथे आलेला फौजफाटा साध्या वेशात होता. बँड पथक आणि महिलांचा नाच सुरू असल्याने इकडे फारसे लक्ष नव्हते. महिलांच्या या नाचाची योजना त्या अतिरेक्याला आणि मुलाना बाहेर आणण्यासाठी आणि त्यांना नाचात गुंतवून ठेवण्यासाठी, स्वत: पोलिस आयुक्तानीच आखली होती. सर्वाना कोठडीत पाठवण्यापूर्वी त्यानी महंमदला मात्र त्यांच्या जवळच ठेवून घेतले. मधुराही लगेच तेथे आली. तिला महंमद म्हणाला ताई, तुम्ही सर्व मिरजेहून पुण्याला निघालात त्यावेळी मी तुला म्हणालो होतो की मोठेपणी तू राखी बांधल्यावर जन्मभर आठवण राहील अशी भेट मी तुला देईन. राहील ना ही भेट जन्मभर तुझ्या जवळ ?

Hits: 552
X

Right Click

No right click