किती वर्षाने असे निवांतपण ..!!

Parent Category: मराठी साहित्य Category: कविता Written by सौ. शुभांगी रानडे

किती वर्षाने असे निवांतपण
स्वच्छ आभाळ नि असे मोकळेपण
खिडकीवर बसलेली चिमणी
नि तिचे एकटेपण
खिडकीतून दिसणारे चिमणीच्या मागचे
गुलमोहराचे झाड
ते आभाळ
तो ढगांचा शुभ्र कल्लोळ
आभाळात शांत विहरणारी घार
कसे शांत ,स्वच्छ निवांत
ध्यान लावून बसलेय हे वातावरण

बायको बसलीय देवघरात देवाजवळ
काय मागतेय देवाजवळ कुणास ठाऊक ?
चेहऱ्यावरचा शांत भाव
प्रसन्नपणा
सगळे मिळाल्याची तृप्तता
तृप्तीचा हा अनोखा क्षण
तो सेव्ह करून ठेवतोय
कितीतरी वेळा सेव्ह न केल्यामुळे डिलीट होऊन गेल्यात
कितीतरी घटना ,प्रसंग

आयुष्याच्या ऊतरवंडीवरचे हे क्षण
हे निवांतपण
कोठे हरवून गेले ते क्षण
ते सुख
नि ते तारुण्य ....
ती सळसळ
तो आदिम उत्साह
नि आता .....
कधी कधी
ह्या विचारांचा कल्लोळ
अशा शांत वातावरणात
आतला लाव्हारस
दबा धरून बसलेला
कधी उफाळून येईल
कुणास ठाऊक ...?
सुखाची देखील भीती वाटतेय ...
आजकाल ..का ..?
कुणास ठाऊक ...??

Hits: 505
X

Right Click

No right click