बँकॉकची सफर भाग -१

Parent Category: मराठी साहित्य Category: डॉ. सु. वि. रानडे यांचे लेख Written by सौ. शुभांगी रानडे

त भविष्यातील भारताचे दर्शन घडविणारी बँकॉकची सफर
सांगली परिसर संरक्षण व संशोधन संस्थेच्यावतीने थायलंडमधील साखर, अल्कोहोल (मद्यार्क) व कागद कारखान्यातील सांडपाण्याच्या शुद्धीकरण व्यवस्थांचा अभ्यास करण्यासाठी २ मे ते १२ मे १९८७ असा एक अभ्यास दौरा व तेथील तंत्रज्ञानाबरोबर एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. भारतातील निरनिराळया ठिकाणच्या साखर व कागद कारखान्यांचे संचालक, तंत्रज्ञ तसेच जलप्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असे एकूण ३२ प्रतिनिधी या दौर्‍यात सहभागी झाले होते. या दौर्‍याचे वैशिष्ठ म्हणजे थायलंड सरकार, आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्था आणि बँकॉक मधील चुलालुकॉर्न विद्यापीठ यांचे सहकार्य या दौर्‍यासाठी व चर्चासत्रासाठी मिळाले होते. सांगलीहून या अभ्यास दौर्‍यात संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. सुब्बाराव व कार्यवाह म्हणून मी सहभागी झालो होतो.
परदेशी प्रवासाला जायचे म्हणजे पासपोर्ट व व्हिसा काढणे जरूर असते. देशाबाहेरजाण्याचा परवाना म्हणजे पासपोर्ट. व दुसर्‍या देशात प्रवेश करण्याची अनुमती म्हणजे व्हिसा. कोणताही सरकारी परवाना मिळविताना जो व्याप व त्रास सहन करावा लागतो त्याला पासपोर्ट काही अपवाद नाही. सहा फोटोच्या प्रती, जन्मतारीख व शिक्षण व रेशनकार्डेचे सर्टीफिकेट यासह अर्ज केला की पासपोर्ट मिळायला सुमारे दोन महिने लागतात सी. आय. डी. खात्यातर्फे पोलिसतपास होऊन त्यांचे नाहरकत पत्र आले की पासपोर्ट दिला जातो. एकदा पासपोर्ट मिळाला की व्हिसा मात्र १/२ दिवसात मिळतो. तुम्ही प्रथमच परदेशी जात असाल तर सरकारतर्फे तुम्हाला ५०० अमेरिकन डॉलर परदेशी चलन मिळू शकते. त्याला एफ.टी. एस. असे म्हणतात. येथून प्रवासास निघण्यापूर्वी बँकेमार्फत ते विकत घेता येते. एकदा एफ.टी. एस. मिळाले की पुढे तीन वर्षे परदेशी चलन मिळू शकत नाही.
पासपोर्ट, व्हिसा व परदेशी चलन यांची पूर्तता होईपर्यंत ३० एप्रिल उजाडला. आम्ही १ तारखेला रात्रीच्या विमानाने मुंबईहून प्रयाण करणार होतो व आमच्या प्रवासी सहाय्यक संस्थेच्या चुकीमुळे सर्वांना विमानात जागा मिळाली नाही. बाकी प्रतिनिधींना पाठवून आम्ही आमचे प्रयाण एक दिवस पुढे ढकलले.
२ तारखेला ११ वाजताच आम्ही सहार विमानतळाकडे टॅक्सीने निघालो. मनात अमाप उत्साह होता पण त्याचबरोबर कुतूहल आणि भीती यांचीही लपाछपी चालू होती. प्रवेशव्दारातील आपोआप उघडणार्‍या भव्य काचेच्या दारांनी आमचे स्वागत केले. विमानतळावरील भव्यता, स्वच्छता, सजावट पाहिल्यावर परदेशातच पाऊल टाकल्याची अनुभूती आली. पण भारतीय व्यवस्थेचा हिसका बसल्यावर आम्ही परत मूळ ठिकाणीच असल्याचे जाणवले. म्हणजे असे झाले की तेथे गेल्यावर कळले की दुपारी तीन चे विमान आठ तास उशीरा सुटणार आहे. म्हणजे रात्री ११ पर्यंत येथेच वेळ काढावा लागणार काय करणार? आलिया भोगासी असावे सादर म्हणत तेथेच मुक्काम ठोकला. काही प्रवासी तर बस स्टँड किंवा रेल्वे फलाटावर झोपतात तसे पथारी पसरून झोपले देखील. आम्हीच उगीच शिष्ठपणाचा आव टिकवण्यासाठी ताटकळत बसून राहिलो. वेळ जावा म्हणून तेथील रेस्टॉरंटमध्ये गेलो. एका बाजूच्या काचेच्या भिंतीतून विमानतळावरील दृश्य दिसत होते ते पहात व कॉफी पीत बराच वेळ काढला. जवळजवळ प्रत्येक पाच मिनिटाला एक विमान येत होते वा सुटत होते. येताना सावकाश फेरी मारत विमान कसे उतरते व उतरल्यावर रनवेवर धावून कसे थांबते हे पाहणे मोठे मनोरंजक होते विमान सुटताना देखील वेग आल्यावर ते हवेत केव्हा झेपावते हे पहाताना उत्कंठा ताणली जायची श्वास रोखायचा. एकदा विमान वर जाऊन त्याने आपला तोल सांभाळला की हायसे वाटायचे. आपले विमान उडतानाही असेच कोणीतरी पहात असतील अशी कल्पना येऊन गंमत वाटली. शेजारीच पाकिस्तान इंटरनॅशनलचे हिरव्या पंखांचे विमान उभे होते. त्यात सामान चढविण्याची पद्धत देखील नाविन्यपूर्ण वाटली. ट्रकसारख्या वाहनावरून सामानाचे मोठे खोके यायचे ट्रक थांबला की खालच्या स्प्रिंग उघडून सर्व खोके वर उचलले जायचे. सर्व काम यंत्राने. माणसे फक्त हात लावण्यापुरती आहेत असे वाटले.
रात्र झाली आठ वाजताच चेक इन कौंटरवर आमच्या विमानाचा AI308 असा फलक लागला. प्रथम आमचे सामान सुरक्षा तपासणीसाठी एक्स रे मशीन मधून पाठविले. बाहेर बसणार्‍या माणसाला टी. व्ही. पडद्यावर बंद बॅगमधील सर्व सामान दिसू शकत होते. काही संशयास्पद वाटले तर येथील अधिकारी बॅग उघडावयास लावतात. तपासणी झालेल्या बॅगवर कागदाचे लेबल लावले जाते. आमच्या बॅगांवर लेबले लागली आणि बॅगा त्यांच्या ताब्यात गेल्या. तिकीट मिळाले की सामान आधीच विमानात ठेवण्यासाठी फिरत्या पट्ट्यावरून नेले जाते. मग डिक्लेरेशन कौंटरवर सोबत असणार्‍या कॅमेरासारख्या वस्तूंची नोंद करावी लागते व नंतर आपली व्यक्तिगत तपासणी होते. प्रत्येकाच्या हातातील हॅण्डबॅगची तर तपासणी होतेच पण एक्स रे रूममधून जावे लागते व अंगावर चाचपून प्रत्यक्ष तपासणी होते नंतर विमानात जाण्यासाठी अनुमती दर्शक शिक्का मारला जातो. ही तपासणी झाल्यावर आम्ही विमानाची प्रतीक्षा करीत आतल्या दालनात बसलो. विमान उभे होतेच प्रथम विमानाचे वैमानिक व एअर होस्टेस आपल्या आकर्षक गणवेशात सर्कस सुंदरी सारख्या मोठ्या दिमाखाने आमच्या दालनातून विमानाकडे गेल्या नंतर आम्हाला सूचना आली. रांगेने तिकिटे दाखवून आम्हाला दाराबाहेर सोडले तर तेथे एक तरंगता बोगदाच विमानाच्या दारापर्यंत लावल्याचे दिसले त्यातून आम्ही विमानात गेलो. राजेशाही थाटाचे प्रचंड विमान प्रत्येक सीटवर लाईट, वारा मिळावा याची व्यवस्था सामानासाठी कप्पा, कोचसारख्या खुर्च्या, खुर्ची मागेपुढे करण्याची समोर घडी करता येणारे टेबल, समोर ‘नमस्कार’ नावाचे रंगीत आर्टपेपरवर छापलेले मासिक, बाजूला १० चॅनेल मध्ये संगीत ऐकण्याची सोय. दारे बंद झाली तरंगता बोगदा दूर झाला. स्वागत होऊन बेल्ट बांधण्याची सूचना आली. बेल्ट बांधले तर संकटकाळी प्राणवायू पुरविणारे साधन कसे आपोआप वरून खाली येईल व त्याचा कसा वापर करायचा याचे एअर होस्टेसने प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यांनी ते प्रात्यक्षिक नेहमीचा उपचार म्हणून दाखविले तरी आमच्या मनात उगीचच धडकी भरली. विमानाचा सूऽई असा आवाज सुरू झाला विमानाने गती घेतली ती ते खिडकी बाहेरचे दिवे जोरात मागे पळताना पाहिल्यावरच जाणवले. एकदम आवाजात तीव्रता आली आणि कोणीतरी आपल्याला एकदम खुर्चीसकट उचलल्यासारखे वाटले. विमानाने हवेत झेप घेतली. क्षणार्धात बाहेरच्या इमारती तिरक्या झाल्या, आमचे विमान कलल्याचा तो परिणाम होता. विमानाने जशी उंची गाठली, तसे मुंबईचे मनोहारी दृश्य दिसू लागले. प्रचंड मोठी मुंबानगरी आमच्यापुढे छोटी होऊन दिव्यानी सजलेले रूप आम्हास दाखवीत होती. समुद्रकिनारा व इमारतीवरून कोणता भाग आहे याची ओळख पटण्यापूर्वीच विमान अधिक उंचीवर गेले व मुंबईचे दृश्य अंतर्धान पावून त्याची जागा गडद अंधाराने घेतली. १ वाजता दिल्ली आली. विमान तासभर थांबून बँकॉककडे निघाले. विमानातील नाजुक साजुक जेवणाचा प्रसाद घेऊन, इयर फोन कानाला लावून संगीत ऐकत डोळे मिटले अन झोप केव्हा लागली ते कळलेच नाही.
जाग आली ती एकदम डोळयासमोर प्रकाश चमकल्याने. त्यानेच मी दचकून उठलो. माझी सीट खिडकीशेजारी असल्याने खिडकीतून सूर्यप्रकाश माझ्या अंगावर पडला होता. खिडकीतून बाहेर नजर गेली माझा विश्वासच बसेना. समोर निळे आकाश तर खोलवर खाली कापूस पिंजून पसरावा त्याप्रमाणे शुभ्र ढगांची बिछायत पसरली होती. खरोखरी स्वर्गातून आपण विहार करीत आहोत असे वाटले. ढगांच्या फटींतून काही खालची जमीन दिसते का ते पाहू लागलो. एका ढिकाणी ढग जरा चांगले होते. खाली वळणावळणाने जाणार्‍या सोनेरी नदीचा प्रवाह दिसला व शेतांचे आणि घरांचे पुंजके दिसू लागले विमानातील संगीत बंद झाले व कानावर शब्द आले आपण आता थोड्याच वेळात बँकॉक विमानतळावर उतरणार आहोत पट्टे बांधावेत. बँकॉकमधील तापमान २८०से. असून तेथे सकाळचे ७ वाजून २० मिनिटे झाली आहेत. मी घडाळयात पाहीले तर फक्त ५ वाजले होते. बँकॉक पूर्वेस असल्याने आम्ही सूर्याला दोन तास आधीच गाठले होते म्हणायचे. घड्याळ नव्या जगातील वेळेशी जमवून घेतले. पट्टा बांधला व उत्सुकतेने बँकॉक विमानतळाची व परदेशात पहिले पाऊल टाकण्याची वाट पाहू लागलो. विमान खाली येऊ लागले तशी खालची घरे स्पष्ट होऊ लागली सुबक चौकोनी इमारती आणि रस्त्यावरून धावणार्‍या खेळण्यातल्या मोटारी पाहील्यावर थोड्याच वेळात आपण त्यापैकी एखाद्या मोटारीत असणार या कल्पनेने मन आनंदीत झाले. सारा देखावा एकदम कलला विमान तिरके होऊन उतरण्याची तयारी करू लागले. विमानतळ दृष्टीपक्षात आला. विमान खाली आले आणि एस. टी. खडकाळ रस्त्यावरून जाताना जसे धक्के बसतात तसे धक्के बसले आणि मी ओळखले विमानाची चाके जमिनीला लागली आपले पायच जमिनीला लागल्यासारखा मला आनंद झाला व हायसेही वाटले. विमानाचा आवाज बदलला वेग कमी होऊन ते थांबल्यास ५/१० मिनिटे लागली. एअर होस्टेसच्या अभिवादनाचा स्वीकार करीत सर्वजण जिन्यावरून खाली उतरलो. विमानाशेजारी आलेल्या बसेसमधून विमानतळावर गेलो तेथे विमानात भरलेला फॉर्म व पासपोर्टची तपासणी झाली. नंतर फिरत्या पट्ट्यावरून सामान काढून घेतले व ट्रॉलीवर टाकून स्वत:च ट्रॉली ढकलत विमानतळाच्या बाहेरच्या दाराशी आलो आमच्या ट्रॅव्हल एजन्सीची गाईड मिसेस लेक आमच्या स्वागतासाठी उभीच होती. एका वातानुकुलीत स्टेशनवॅगनमधून आम्ही रस्त्याला लागलो. गाडीतील थाट पाहू की बाहेरच्या बिल्डिंग पाहू अशा संभ्रमात असतानाच मिसेस लेकने स्पीकरवरून बँकॉकची माहिती सांगण्यास सुरूवात केली.

Hits: 544
X

Right Click

No right click