माजी प्राचार्य बापूसाहेब आणि मी

Parent Category: मराठी साहित्य Category: डॉ. सु. वि. रानडे यांचे लेख Written by सौ. शुभांगी रानडे
कितीही संकटे आली आणि पराभव पत्करावा लागला तरी हसत त्याचा स्वीकार करावा व पुन्हा उमेदीने संघर्ष चालू ठेवावा. हे मला प्रा. बापूसाहेब कानिटकरांनी शिकविले. त्यांचा तो उपदेश मला आयुष्यभर आनंदाने काम करीत राहण्यास साहाय्यभूत ठरत आहे.

प्राचार्य कै. बापूसाहेब कानिटकर

मी १९६६ साली कॉलेजवर असिस्टंट लेक्चरर म्हणून नोकरीस लागल्यापासून माझा प्राचार्य कानिटकर सरांशी नियमित संबंध येत असे. सुब्बाराव यांचेबरोबर मी नेहमी त्यांना भेटायला जाई. पुढे बीईच्या क्लासरूममध्ये पार्टिशन घालून आम्ही पब्लिक हेल्थ लॅब सुरू केली. शनिवारी, रविवारीही आम्ही तेथे काम करीत असू. सर्व कॉलेज बंद असले तरी कानिटकर सर एक फेरी टाकून कसे काय काम चालले आहे ते पहात. सल्लाही देत. त्यामुळे कामाला अधिक हुरूप येई.

मला पीएचडीला प्रवेश मिळाला तेव्हा त्यांना फार आनंद झाला. माझ्या आईवडिलांचे त्यांनी अभिनंदन केले. १९७५ साली मला कलकत्त्यातील कॉन्फरन्समध्ये पेपर प्रेझेंटेशनमध्ये पहिला क्रमांक मिळाला आणि डॉ. करणसिंग यांचे हस्ते दिल्लीत मला ते पारितोषिक मिळाले. तेंव्हा त्यांनी फोनवरून माझ्यासाठी पब्लिक हेल्थमध्ये असिस्टंट प्रोफेसरची जाहिरात काढली असल्याचे सांगितले. मला फार आनंद झाला. पण ती पोस्ट माझ्या नशिबात नव्हती.
 

आत्तापर्यंत कोणाकडेही न सांगता मनात ठेवलेली घटना मी आज उघड करीत आहे. त्यावेळी सुब्बाराव, संतपूर आणि जोगळेकर यांची खूप मैत्री होती. जोगळेकर माझ्यापेक्षा ज्येष्ठ आणि पब्लिक हेल्थ विषय शिकवत होते. मी कानपूरहून सांगलीस परत आल्यावर कळले की इंटरव्ह्यू होऊन प्रा. जोगळेकरांना ती पोस्ट मिळाली. मला फार वाईट वाटले. प्रा. ब्र्हमनाळकर आणि प्राचार्य कानिटकरांनी याबाबतीत काही करता न आल्याबद्दल खेद व आपली नाराजी व्यक्त केली होती व लवकरच पुन्हा संधी मिळेल असे सांगितले होते. १९७५ नंतर पुन्हा तशी पब्लिक हेत्थच्या नावाने पोस्ट निघाली नाही. बाकीच्या पीएचडी करणा-यांना दोन पगार वाढी मिळाच्या त्याही मला मिळाल्या नाहीत. माझी पीएचडी नेहमी उपेक्षितच राहिली. तशी संधी यायला मला पुढे २० वर्षे वाट पहावी लागली.

प्रत्यक्षात प्रा. संतपूर, प्रा. जोगळेकर इत्यादी प्राध्यापक इतर कॉलेजमध्ये गेले, मला वालचंद क़लेज सोडून दुसरीकडे कोठे जाण्याची कल्पनाच करवत नसे. कॉलेजमधील विद्यार्थी, माजी विद्यार्थी संधटला, मराठी विज्ञान प्रबोधिनी, डॉ. सुब्बाराव यांचेबरोबर कॉलेज व इपीआरएफच्या माध्यमातून प्रदूषण नियंत्रणाबाबत डिझाईन व सल्ला देणे. विविध काखान्यांना भेटी देणे आणि विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पात सहभागी होणे यातच मला आनंद होता. शिवाय प्रा, फडणीस सरांमुळे कॉम्प्युटरमध्ये प्रशिक्षण वर्ग चालविण्यास मिळत होते. यामुळे मला त्याबद्दल कधी वाईट वाटले नाही.

प्रा. जोगळेकर गमतीत मला पीएचडी म्हणजे काय वेगळे दिवे लावले म्हणून चिडवीत असत व आपली नेमणूक कशी योग्य होती हे सांगत. मीही त्यांच्या विनोदावर हसून वेळ मारून नेत असे. अर्थात जोगळेकर सरांना मनातून माझ्याबद्दल प्रेम होते. त्यांनी मला इपीआरएफ व मराठी विज्ञान प्रबोधिनीच्या स्थापनेसाठी खूप मदत केली. स्नेहदीपवरील फ्लॅटही हिकमती करून आम्हाला मिळवून दिला. साठेनिवासमध्ये मला क्वार्टर्स मिळवीन देण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. या सर्व गोष्टींमुळे आमचे संबंध नेहमीच चांगले राहिले. मीही त्यांच्या तालमीत तयार झालो,

प्रा कानिटकर सरांनी माझा भाऊ अरूण याला सांगली अर्बन बॅंकेत आणि धाकटा भाऊ उदय य़ाला आधी वालचंद कॉलेज व नंतर बुधगावच्या पीव्हीपीआयटी कॉलेजमध्ये नोकरी दिली. उदयच्या पत्नीलाही तेथे नोकरी मिळाली. आपल्या माणसांना पुढे आणण्यासाठी त्यांनी नेहमी स्वतःचे वजन खर्ची करून अनेक माझ्यालारख्या कुटुंबांना मानाचे स्थान मिळवून दिले. याबाबतीत त्यांच्याकडे कोणीही कॉलेजमधील कधी गेले तर नक्की उपयोग होई. असा वशिला लावण्यास ते कचरत नसत.

इतर ठिकाणी मात्र मला याबाबतीत फार कटू अनुभव आले.  सिटी हायस्कूल व विलिंग्डल कॉलेजमध्ये सर्व वरीष्ठ अधिकारी व्यक्ती अगदी परिचयाच्या असून देखील माझ्या मुलाला व नातेवाईकांना तेथे प्रवेश मिळू शकला नाही उलट वशिला चालत नाही. केवळ गुणवत्तेवर येथे प्रवेश दिला जातो म्हणून माझी बोळवण करण्यात आली. नंतर कमी गुणाचे विद्यार्थीही देणग्या घेऊन तेथे प्रवेश घेत होते हे माझ्या लक्षात आले. मी त्या माझ्या मित्रांना दोष देत नाही कारण त्यांचेही हात बांधलेले असत. मात्र या सर्व पार्श्वभूमीवर बापूसाहेबांनी जो माझ्याबाबतीत आपलेपणा दाखविला व प्रसंगी स्वतःला दूषण लावून घेतले त्याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे.

 प्रा. श्री. कानिटकर यांच्यात बापूसाहेबांचेच गुण उतरले आहेत. कॉलेजबद्दल नितांत प्रेम, स्थानिक व कॉलेजातील लोकांना उच्च पदे मिळावीत स्थानिक लोकांचे आणि उद्योगांचे प्रश्न कॉलेजने सोडवावेत असे त्यांना वाटते. महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी व कॉलेजमधील वादात त्यांच्या भूमिकेबद्दल लोकांची मते भिन्न असू शकतील. मात्र कॉलेजच्या आणि सांगली परिसराच्या विकासासाठी व  अंतिम भल्यासाठीच त्यांचे प्रयत्न राहतूल याची मला खात्री आहे.

बापूसाहेबांनी माझ्या मनात कॉलेजबद्दल आंतरिक जिव्हाळा निर्माण केला त्यामुळेच मी वालचंद हेरिटेज प्रकल्पाचे काम अंगावर घेतले. माजी विद्यार्थी संघाचीही मोडलेली घडी परत बसविण्यासाठी सर्वांना एकत्र आणायचा प्रयत्न बापूसाहेबांच्याच उमेदीने आणि सर्वांबद्दल आदर ठेवून करण्याचे मी ठरविले आहे.
वालचंद कॉलेजचे नाव माझ्या दृष्टीने तरी कानिटकर कॉलेज असेच राहिले आहे.


Hits: 178
X

Right Click

No right click