दूरदर्शन दूरच बरे
सध्या तर दूरदर्शन वा टीव्ही या प्रसार माध्यमाने बहुतेक सर्व घरांचा ताबा घेतला आहे. कोरोनामुळे घरात बसावे लागते. मग वेळ घालवायचा सगळ्यात सोपा आणि आनंददायी पर्याय म्हणून आपण टीव्ही पहात बसतो.
चित्तवेधक जाहिराती, गाणी, जगभरात चाललेल्या दंगली, हिंसाचार, अपघात, भडक बातम्या दाखवून लोकांना आपल्या चॅनेलकडे खेचून आणण्याची स्पर्धा पराकोटीला गेली आहे. करमणुकीसाठी नाचगाणी, नटनट्या व खेळाडूंच्या रसभरीत कथा व ओढून ताणून बनविलेल्या कौटुंबिक संघर्ष मालिका यांनी दूरदर्शन व्यापून गेले आहे. त्यातच चैनीच्या वस्तूंच्या व सौंदर्यप्रसाधनांच्या जाहिराती भर घालत आहेत. आता लॉटरीच्या धर्तीवर स्पर्धा मालिका लोकप्रिय होत आहेत. मुलांसाठी कार्टून मालिका तर युवकांसाठी सिनेसंगीत व मुव्हीज यांचाही जाहिरातींसाठी वापर होत आहे. फुकट करमणूक करण्याच्या व जगातील घडामोडींचे ज्ञान देण्याच्या बहाण्याने व्यावसायिक दूरदर्शन चॅनेलधारकानी या एरवी उपयुक्त व प्रभावी प्रसार माध्यमावर आपला बाजार मांडला आहे. दुर्दैवाने याविरुद्ध कोणीच तक्रार करीत नाही ही खेदाची गोष्ट आहे.
दूरदर्शनचा उपयोग शिक्षणासाठी व समाज प्रबोधनासाठी करण्याचे सरकारचे उद्दीष्ट असले तरी त्याची अंमलबजावणी करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. व्यावसायिक चॅनेलना टक्कर देऊन समाजोपयोगी सरस व आकर्षक कार्यक्रम व विधायक संतुलित बातम्या देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. मात्र त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद न केल्याने या कार्यक्रमांकडे प्रेक्षक वळत नाहीत. परिणामी दूरदर्शन हे प्रसारमाध्यम समाज उन्नतीऎवजी समाजाच्या अधोगतीस कारणीभूत होत आहे.
दूरदर्शन पाहण्यात लोक आपला किती वेळ घालवतात हे पाहिले तर धक्कादायक निष्कर्ष निघतील. दूरदर्शन पाहण्याचा नाद लागल्याने मुले वाचन व अभ्यासास कंटाळा करतात. मोठ्या माणसांना घरात बसून टी व्ही बघण्याची सवय लागल्याने महत्वाची बाहेरची कामे, समाजसेवा, सभा, व्याख्याने यांना उपस्थिती, भेटीगाठी यात चालढकल होते. टीव्ही मालिकेतील ताणतणाव यानी विनाकारण मनात काहूर माजते. पुढे काय होणार हे पाहण्याची उत्सुकता व नंतर चटक लागते. दूरदर्शन मालिकावाले या अशा लोकांना हवे तसे ताटकळत ठेवतात व जाहिरातींचा मारा त्यांच्यावर करतात.
माझे एक मित्र टीव्हीच्या या दुरुपयोगाबद्दल फार जागरूक असल्याने त्यांनी आपल्या घरात टीव्ही घेतला नव्हता. त्यावेळी मीही त्यांच्या या वागण्यावर टीका करायचो. आता मला त्यांचे म्हणणे पटू लागले आहे. मात्र त्या मित्राच्या घरात बायको व मुलांच्या आग्रहाखातर टीव्हीने आपले बस्तान बसविले आहे.
आपण टीव्ही पाहतो तेव्हा आपला किती वेळ फुकट जातो याचा विचार करावयास हवा. तोच वेळ शिक्षण, व्यवसाय वा अन्य कामात घालविला तर किती फायदा होऊ शकेल हे लक्षात घेतले तर याची नीट कल्पना येईल.
म्हणून दूरदर्शनचा वापर मर्यादित व जपून करा. कोणता कार्यक्रम पहायचा हे विचारपूर्वक ठरवा. आवश्यक माहिती मिळाली वा कार्यक्रम संपला की लगेच दृढ निश्चयाने तो बंद करा. मुलांपासून तर दूरदर्शन शक्यतो दूरच ठेवा. कारण तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवू शकाल मात्र तुमच्या मुलांना याची चटक लागली की ती तुमचे काही ऎकणार नाहीत. मग त्यांच्या अभ्या्स व खेळात होणार्या हानीस टीव्हीऎवजी वा मुलांऎवजी तुम्ही स्वतःच जबाबदार ठराल.
Hits: 144