स्वयंशिक्षणासाठी ऑनलाईन मार्गदर्शन - ज्ञानदीप उपक्रम

Parent Category: मराठी साहित्य Category: डॉ. सु. वि. रानडे यांचे लेख Written by सौ. शुभांगी रानडे

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शिक्षणसंस्थांना ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय वापरणे भाग पडले असून, झूम, गुगल क्लासरूम, मायक्रोसॉफ्ट मीट इत्यादी सुविधांद्वारे शिक्षण देण्यासआजचा विद्यार्थी या सर्व शैक्षणिक यात्रेत शरिराने सहभागी असला तरी मनाने तो स्वयंशिक्षणाच्या आकर्षित होत आहे ही समाधानाची बाब आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे कोणतेही ज्ञान मोबाईल व वेबसाईटच्या माध्यमातून अत्यंत कमी खर्चात व जागतिक दर्जाच्या शिक्षकांकडून मिळण्याची सोय झाली आहे. केव्हाही आणि कोठूनही आपल्या सोयीनुसार हे घेण्याची, शंकानिरसन, वादविवाद, चर्चा, प्रत्यक्ष आभासी अनुभव इत्यादी अनेक सोयीमुळे आता विद्यार्थ्याला कॉलेजमधील शिक्षणाचा फोलपणा जाणवू लागला आहे.  केवळ मान्यताप्राप्त पदवी मिळविणे हेच ध्येय असल्याने आपला वेळ, पैसा या शिक्षण प्रक्रियेत घालणे त्याला भाग पडत आहे. नोकरी चांगली मिळावी यासाठी तो याचा स्वीकार करीत आहे. हे चित्र लवकरच पालटेल आणि केवळ ज्ञान आणि क्षमता यालाच पदवीपेक्षा महत्व दिले जाईल.


  
सध्याच्या शिक्षणपद्धतीत  पदवी परिक्षा आणि मोठ्या प्रतिष्ठित कॉलेजांना अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. आकर्षक इमारती व इतर सुखसोयी यांची जाहिरात करून कॉलेजेस विद्यार्थ्यांपुढे प्रवेशासाठी नाना आमिषे व स्वप्ने दाखवीत आहेत. आमच्या वेळी विद्यार्थी कॉलेजमध्ये प्रवेशासाठी आटापिटा करीत. आता चित्र पालटले आहे. कालाय तस्मै नमः हेच खरे.

़प्राचीन काळी सर्वसामान्य जनतेची मुले अरण्यात गुरूकडे शिकण्यासाठी रहायला जात असत. राजघराण्यातील मुलांना शिकविण्यासाठी मात्र प्रगाढ विद्वांनांना राजाश्रय मिळून राजवाड्यातील प्रशस्त दालनात राजाच्या मुलांना शिकविण्यासाठी हे विद्वान गुरू जात असत. कालांतराने या प्रशस्त दालनांचे रुपांतर देवळात झाले. गुरूंच्या जागी त्यांचे पुतळे देव या स्वरुपात उभे केले गेले. भक्तांना या देवावर श्रद्धा ठेवून अंतर्मनाचा विकास करून ज्ञान व समाधान मिळविण्याचा ज्ञानमार्ग तर सर्वसामान्यांसाठी भक्तीमार्ग उदयास आले. मात्र दोन्हींचा भर स्वयंशिक्षणावरच राहिला.
आज परिस्थिती थोडीफार पूर्वीसारखीच आहे. आता गरीबांची मुले नगरपालिकेच्या वा जिल्हा परिषदेच्या शाळेत जातात. तर श्रीमंत व मध्यमवर्गीयांची मुले राजभवनासारख्या सुखसोयींनी युक्त खाजगी शाळांत जात आहेत. खाजगी शाळेतले शिक्षक सुटाबुटात व हायफाय करून बोलणारे आहेत तर शासकीय शाळेतले शिक्षक साध्या पोशाखात ग्रामीण भाषा बोलणारे आहेत. दुर्दैवाने ( की सुदैवाने) दोन्ही ठिकाणचे शिक्षक शिक्षणापेक्षा पगार व कामाचे तास याचा विचार करतच शिक्षण देत आहेत.
साहजिकच पालक आपल्या मुलांना शाळेतील शिक्षणाच्या भरवंशावर न ठेवता खाजगी शिकवण्या करणा-यांकडे शिकायला पाठवीत आहेत. मात्र आता या खाजगी क्लासेसनीही आपली स्वतःची प्रतिष्ठा खाजगी शाळांप्रमाणे राजेशाही बनवली आहे. विद्यार्थी शाळा व क्लास या चक्रात अडकले आहेत तर पालक दोन्हीकडे भरपूर पैसे खर्च करून मुलाला उत्तम शिक्षण देत असल्याच्या भ्रमात आहेत. शिक्षणाबाबतचा विद्यार्थी व पालकांमध्ये असणा-या भ्रमाला तडा जाऊ नये म्हणून परिक्षाही वस्तुनिष्ठ किंवा पर्याय निवडण्याची ठेवून सरावाने भरपूर मार्क मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
नवनिर्मिती, सृजनशीलता, प्रज्ञाशोध प्रकल्प केवळ प्रसिद्धीतून संशोधक झाल्याचे मानसिक समाधान देऊन   अधिक पैसे मिळविण्याचे खेळ बनले आहेत.
जे शाळेच्याबाबतीत तेच पण फार मोठ्या प्रमाणावर कॉलेजच्या बाबतीत चालू आहे. राजवाड्यापेक्षा अधिक आकर्षक इमारती व सुखसोयी यांची जाहिरात करून कॉलेज विद्यार्थी मिळविण्याच्या स्पर्धेत नवनव्या योजना आखत आहेत. आमिषे देऊ करीत आहेत. प्रवेशेच्छु विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजमधील अभ्यासक्रमच निवडावा यासाठी नावाजलेल्या तज्ज्ञ प्राध्यापकांचे मोफत मार्गदर्शन देण्यासाठी मेळावे घेतले जात आहेत.
उद्योग तंत्रज्ञानात सतत होणा-या नवसंशोधनामुळे उद्योगांनाही प्रचलित परिक्षा व पदवी आधारित शिक्षणपद्धती निरर्थक वाटू लागली आहे. साहजिकच नोकरी केवळ पदवीवर मिळणे अवघड होऊ लागले आहे.
यावर उपाय स्वयंशिक्षणाचाच ठरू शकतो. ज्ञानदीप फौंडेशनने यासाठी ‘कॉलेजमुक्त शिक्षण घेता यावे यासाठी एक मुक्त व्यासपीठ सुरू केले आहे. कोणीही व्यक्ती ज्ञान व अनुभव देऊ शकत असेल ती या साध्यमाचा उपयोग करून जागतिक पातळीवर विद्यार्थ्यांना शिकवू शकेल. ( Visit - www.dnyandeep.net)

असे झाले तर  भविष्यात  सर्व कॉलेजेस नव्या स्वयंशिक्षणाच्या  लाटेत वाहून जातील व शुद्ध ज्ञानाच्या शोधार्थ  प्रत्येकास वाटचाल करावी लागेल. अशी तपस्या करणा-याला ज्ञान मिळेलच, शिवाय नवनिर्मितीची आस व ज्ञानप्रसाराचा ध्यास त्याला लागेल. ज्ञानाधिष्ठित समाज हे मानवाचे स्वप्न मग साकार होईल

. – डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली


Hits: 146
X

Right Click

No right click