भारतीय भाषांचा नेटवर्क प्रकल्प

Parent Category: मराठी साहित्य Category: डॉ. सु. वि. रानडे यांचे लेख Written by सौ. शुभांगी रानडे

भारतातील गोरगरीब, अशिक्षित आणि ग्रामीण भागात राहणा-या लोकांपर्यंत देशातील सुधारणा पोचाव्यात व त्यांचे जीवनमान सुधारावे या हेतूने शासनाने त्रिभाषा सूत्र स्वीकारून भाषावार प्रांतरचना अंमलात आणली. मात्र याचा फायदा होण्याऐवजी भाषा हेच प्रांताचे आत्मसन्मानाचे स्वरूप बनून प्रांताप्रांतात सीमेवरून संघर्ष सुरू झाला. त्याचेच पर्यवसान, दुस-या भाषेच्या व ती बोलणा-या लोकांविषयी तिरस्कारात रुपांतर झाले. परिणामी राष्ट्रीय एकात्मतेच्या मूळ कल्पनेलाच धक्का बसला. प्रत्येक दोन प्रांतांच्या सीमारेषेलगतच्या प्रदेशात भाषा अभिमानावरून दुही माजली आणि संघर्षमय वातावरण निर्माण झाले.

खरे पाहता दर कोसागणिक (२० मैल) भाषा बदलते. लिपी तीच राहिली तरी बोली बदलते. दोन भाषांच्या सीमारेषेवरील लोकांना आपल्या दैनंदिन कामासाठी दोन्ही भाषा याव्या लागतात. त्यामुळे या भागातील लोकच खरे तर भाषा एकमेकांना विनाविवाद एकत्र जोडण्यात मदत करू शकतात. भाषेची लिपी वेगळी असेल तर मात्र यात ब-याच अडचणी येतात. कारण अक्षरओळख आणि लिहिण्याच्या सवयीला फार वेळ लागतो जो फक्त बालपणातच सर्वांना उपलब्ध असतो.
आता मात्र लिहिण्याची जागा टायपिंगने घेतल्याने आणि सर्व भारतीय भाषांसाठी आंतरराष्ट्रीय मान्यता असणारा युनिकोड अक्षरसंच (फॉंट) उपलब्ध झाल्याने ही अडचण दूर झाली आहे.

गुगल, मायक्रोसॉफ्ट इत्यादी संगणक क्षेत्रातील कंपन्यांनी युनिकोडमध्ये टाईप करण्यासाठी सुविधा निर्माण करून मोबाईल व संगणकावर या भाषांमध्ये टाईप करणे अगदी सोपे केले आहे. पुण्यातील मोड्युलर इन्फोटेक कंपनीने य़ाबाबतीत फार मोठे कार्य केले आहे. त्यांच्या श्रीलिपी व्यावसायिक अक्षरसंचासोबत मायक्रोसॉफ्टच्या मराठी भाषेसाठी मंगल नावाचा युनिकोड फॉंट विकसित केला आहे.

ज्ञानदीपचा प्रवास आधी बिंदूबिंदूतून अक्षर तयार करण्यापासून सुरू होऊन, शिवाजी, आयएसएम, श्रीलिपी, बराहा, गमभन आणि शेवटी युनिकोड असा झाला असल्यामुळे, भारतीय भाषांसाठी युनिकोडचा प्रचार व मराठी युनिकोड टायपिंगचे प्रशिक्षण देण्याचे कार्य सुरू केले.

मायमराठी, विज्ञान व अशाच अनेक मराठी वेबसाईट केल्यानंतर, ज्ञानदीपला सांगलीतील ८१ व्या साहित्य संमेलनाची वेबसाईट करण्याची संधी मिळाली. साहित्यसागर ही वेबसाईट त्यावेळी फार लोकप्रिय ठरली.

आता मायमराठीचे कार्य वाढवत असताना भाषांतर व्यवसायाला आलेले महत्व लक्षात आले. त्याबरोबर भारतीय भाषांमध्ये असलेले साहित्य आणि इतर शास्त्रांचे ज्ञान एकत्र झाल्यावरच या भाषांची खरी प्रगती होईल आणि भाषांभाषांतील दुरावा नाहिसा होऊन परस्पर विश्वास व आदर वाढीस लागून राष्ट्रीय एकात्मतेस बळ मिळेल. शिवाय भाषांतराच्या व्यवसायातून सर्वसामान्य लोकांनाही अर्थार्जनाचे साधन उपलब्ध होईल या कल्पनेतून ज्ञानदीपने आता प्रत्येक भारतीय भाषेत मायमराठी सारखी मायकन्नडा, मायगुजराथी यासारख्या वेबसाईट तयार करण्याचे वा अशा प्रकारच्या वेबसाईटशी संपर्क स्थापन करण्याचे ठरविले आहे.

प्रत्येक दोन प्रांतांच्या सीमाभागात असणा-या शाळा कॉलेजमधील शिक्षकांच्या मदतीने हा मोठा प्रकल्प हाती घेण्याचा संकल्प ज्ञानदीप या संक्रांतीनिमित्त करीत आहे.अनेक भारतीय भाषांच्या खिडक्या वेबसाईटच्या माध्यामातून उघडल्या की प्रत्येक खिडकीतून एक वेगळे साहित्यविश्व पहावयास मिळेल. साहित्यकार व इतर सर्व क्षेत्रातील आजवर माहीत नसलेल्या मान्यवरांचा परिचय होईल. माहिती देवाण घेवाणासाठी नवे सेतू तयार होतील. ज्ञानदीपचे इतर प्रकल्पही याच मार्गाने सा-या देशभर पसरतील. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी ज्ञानदीपचे हे योगदान निश्चितच सर्वमान्य होईल.

शिक्षणक्षेत्रांतील विद्यार्थी, शिक्षक तसेच सामाजिक संस्थांमधील लोकांचे याला सक्रीय सहकार्य मिळेल असा मला विश्वास वाटतो. ---- डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

Hits: 220
X

Right Click

No right click