मेंदू आणि संगणक
भविष्यातले युग हे यंत्रमानवांचे युग आहे असे म्हणतात. सर्व प्रकारची कामे न कंटाळता, कुशलपणे आणि अतिशय वेगात करणारे यंत्रमानव माणसाने तयार केले आहेत. धोक्याच्या जागी व अशक्य वाटणारी कामे हे यंत्रमानव अगदी सहजपणे करू शकतात. मात्र काम कोणते करावयाचे याची माहिती यंत्रमानवातील संगणकाला द्यावी लागते. जर यंत्रमानव विचार करू लागला तर त्याला अशी माहिती देण्याची गरज राहणार नाही. माणसाच्या मेंदूइतकाच प्रगल्भ आणि बुध्दीवान संगणक तयार झाला तर असे यंत्रमानव तयार होऊ शकतीलही. एास्त्रज्ञ असा संगणक बनविण्याचा आणि यंत्रमानवाला स्वयंपूर्ण बनविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. यदाकदाचित हे शक्य झाले तर यंथमानव माणसापेक्षा वरचढ होऊन माणसालाच गुलाम बनवेल की काय अशी भीती सर्वसामान्यांना वाटू लागली आहे. सुदैवाने माणसाची बुध्दी ही सध्या असणाऱ्या सर्वात आधुनिक व प्रगत संगणकाच्या दृष्टीनेदेखील फार मोठी व अतर्क्य गोेष्ट आहे. मेंदूच्या अभ्यासावर आता आपल्या शास्त्रज्ञांनी लक्ष केंद्रीत केले आहे.
माणसाच्या मेंदूचा आकार लहान असला तरी त्यात असंख्य म्हणजे सुमारे १०० अब्ज न्यूरॉन किंवा मज्जापेशींचे जाळे असते. प्रत्येक मज्जापेशीत संदेश आणणारा डेन्ड्नइट व संदेश सोडणारा अॅक्झान असे तंतू असतात. एका पेशीचा डेन्ड्नइट दुसऱ्याच्या अॅक्झान जवळ असतो. सेकंदास हजार एवढ्या सूक्ष्म विद्युतलहरी त्यातून प्रवास करतात. एक मज्जापेशी एकावेळी २ लाख मज्जापेशींशी संपर्क साधू शकते. या संपर्कालाच मानवी बुध्दीच्या दृष्टीने फार महत्व आहे. मेंदूमध्ये कोठले कार्य कोठे चालते याबद्दल माणसाला ज्ञान झाले असले तरी ते कसे चालते याबद्दलचे गूढ अजूनही कायम आहे. संगणकाची रचना फार वेगळी असते. स्मृती, गणित, नियंत्रण, माहिती ग्राहक व दर्शक हे भाग वेगवेगळे असतात. शून्य आणि एक या सांकेतिक भाषेत ससंगणकाचे सर्व कार्य चालते. एकावेळी एकच क्रिया संगणक करू शकतो. याउलट मानवी मेंदूत संवेदना ग्रहण कृती व विचार करणे एकाच वेळी चालू असते. माणूस जन्मापासूनच्या असंख्य घटना, दृश्ये, त्यांचे परस्पर संबंध साठवून ठेवू शकतो आणि संदर्भानुसार कोणतीही घटना क्षणार्धात जागृत स्मृतीत आणू शकतो. या स्मृतीचा अंदाज केला तर अशी स्मृती साठविण्यास संगणकास अवाढव्य यंत्रणा लागेल. प्रकाश, आवाज, स्पर्श, वास, चव या सर्व संवेदना माणूस एकाच वेळी एखाद्या चित्रफितीप्रमाणे नोंदवून घेतो व त्याचे स्मृतीत रूपांतर करतो आणि पूर्वीच्या स्मृतींशी त्याचे नाते जोडतो. ही क्रिया जागृत अवस्थेत प्रत्येक क्षणी होत असते व त्यावेळी मेंदू दुसऱ्याच कोठल्यातरी स्मृतीसंदर्भात विचार करीत असतो. या तऱ्हेची क्षमता संगणकात आल्याखेरीज त्याला मेंदूसारखा म्हणता येणार नाही. देान वस्तूतील फरक ओळखण्यासाठी संगणकास त्या दोन्ही वस्तूंचा सर्वांगाने अभ्यास करावा लागतो. मात्र अगदी अशिक्षित गृहीणीदेखील अगदी एकसारख्या दिसणाऱ्या दोन भांड्यातील फरक ओळखू शकते. चेहऱ्यावर बदललेले भाव माणसाला २/१० सेकंदात ओळखता येतात. मेंदूची बरोबरी करण्यासाठी संगणकास याबाबतीतही बरीच प्रगती करावी लागेल.
मानवी स्मृती, ज्ञान व बुध्दी यांचा शोध घेतल्याशिवाय बुध्दीमान संगणक बनविता येणार नाही हे जाणून संशोधकांनी प्रयत्न सुरू केले तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की येथे केवळ संगणकशास्त्र पुरे पडत नाही. एरीरशास्त्र, मानसशास्त्र, तत्वज्ञान इत्यादी विविध दृष्टकोनातून त्याचा अभ्यास करावा लागतो.
इ.स. १६५० मध्ये थॉमस हॉब्जने विचार करणे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून विशिष्ट संकल्पनांच्या गणिती क्रिया होत असे मत मांडले. १८९४ मध्ये जार्ज बुल या शास्त्रज्ञाने तर्कावर आधारित गणित बुलीयन लॉजिक या नावाने प्रसिध्द केले. सध्याचे सर्व संगणक ह्याच गणितावर आधारलेले आहेत. मात्र तर्कावर आधारलेल्या गणितास सत्य व स्पष्टपणे वर्गीकरण करता येईल अशी माहिती हवी असते. मेंदू मात्र अशा माहितीबरोबरच संदीग्ध, संभाव्य वा कमी विश्वसनीय अशा माहितीचाही परामर्श घेऊ शकतो. नियमांच्या चौकटीत बसणारे ते ज्ञान असे आपण समजल्यामुळे संपूर्ण ज्ञानाचे आपल्याला व पर्यायाने संगणकाला आकलन होऊ शकले नाही. कारण आपले संगणक फक्त तर्कावर आधारिलेल्या माहितीचाच विचार करू शकतात. मानवी बुध्दीमत्तेची वैशिष्ट्ये म्हणजे नवे ज्ञान मिळविण्याची किंवा शिकण्याची क्षमता व निर्णय घेण्याची क्षमता. मानवी बुध्दीचे मूळ त्याच्या विचार करण्याच्या क्षमतेत, व ही क्षमता मानवी मनात दडलेली असल्याने संगणकशास्त्रज्ञ सध्या मनाच्या आंतरस्वरूपाचा शोध घेत आहेत. कारणमीमांसा व कल्पनाशक्ती यांच्या सहाय्यनेच यावर काही प्रकाश पडू शकतो.
ज्ञान म्हणजे एक स्मृतींचा आकृतीबंध अशी कल्पना करता येते. यात स्मृती या शिरोबिंदू असून त्यातील संबंध हे शिरोबिंदूना जोडणारे बंध मानता येते. माणसाची एक अनोखी कला म्हणजे विसरण्याची व पुन्हा आठवण्याची क्रिया. संगणकात ही क्षमता आणण्यासाठी अशा आकृतीबंधाची कल्पना उपयोगी पडते. स्मृतीतील बंधांची ताकत काळानुसार कमी होत जाते व शेवटी बंध तुटतात म्हणजे माणूस विसरतो. मात्र जवळची स्मृती वा बंध वापरात आला की हा बंध पुन्हा पुर्ववत होतो. म्हणजे काही घटना घडली की त्या संदर्भातील स्मृती जागृत होतात. पण या स्मृती म्हणजे काय ? भाषा, चित्रे व संवेदना यांच्या स्वरूपात स्मृती साठविली जाते. माणूस विचार करतो वा आठवतो म्हणजे मन:पटलावर ते चित्र पहातो, ती माहिती वाचतो वा ती संवेदना अनुभवतो. मात्र स्मृतींमधला संबंध व घटनेतून ध्वनित होणारा अर्थ संगणकास शिकविणे हे एक अवघड काम आहे. कारण आपण नेहमी पाहतो एकाच घटनेचे वेगवेगळे अर्थ निघतात. माणसाच्या मन:स्थितीनुसार व इतर परिस्थितीनुसार हा अर्थ बदलून स्मृती बनते किंवा असे म्हणता येईल की पूर्वीच्या अनुभवाचा विचार करूनच माणूस घटनेचा अर्थ लावतो. म्हणजे पूर्वग्रहाशिवाय माणूस ज्ञान ग्रहण करू शकत नाही त्यामुळे त्याच्या स्मृतीदेखील त्याच्या पुर्वग्रहावर आधारित असतात. संगणकास असे पक्षपाती करता येणार नाही कारण त्याला स्वत:चे हित वा मत नसते.
काय गंमत आहे पहा. माणसाला कला सोपी वाटते तर शास्त्र अवघड वाटते. या उलट संगणकाचे आहे. त्याला शास्त्र नियमबध्द असल्याने लगेच आत्मसात होते. पण कला समजू शकत नाही. माणूस शास्त्रात पारंगत झाला म्हणजे आपण त्यास बुध्दीमान म्हणतो.संगणकाने कलेत प्राविण्य मिळविणे सोडा त्याला साधी कला समजली तरी त्याला बुध्दीमान म्हणावयास हवे.
इ. स. १९५१ मध्ये मार्विन मिन्स्की याने स्नार्क नावाचा मेंदूच्या कार्यसदृश्य चालणारा न्यूरो कॉम्प्युटर तयार केला. १९५८ मध्ये चित्रे ओळखणारा तर १९७२ मध्ये भाषा जाणणारा संगरक तयार झाला. मात्र नियमांपलिकडची भाषा त्याला समजेल काय ? 'तो कामाला वाघ आहे', 'त्याच्या डोक्यात कॉम्प्युटर बसविलाय` अशा वाक्यांचा अर्थ संगणक काय काढे कोण जाणे ? मग कविकल्पना, विनोद, मॉहर्न आर्ट, प्रेम, श्रध्दा यांना जाणणे तर संगणकाला कधीतरी ाक्य होईल काय ?
डॉ. वेंकट भास्कर वेमुरी या शास्त्रज्ञांनी मात्र याबाबत आशावाद दाखविला आहे. १९८७ साली सॅन डिएगोमध्ये व १९०८ मध्ये क्रॅलिफोर्निया मध्ये मज्जापेशींच्या संबंधावर आधारित संगणक या विषयावर परिसंवाद भरला. त्यावेळी हा आशावाद व्यक्त करण्यात आला. अमेरिकेत, एका भारतीयाच्या डॉ. वेंकटभास्कर वेमुलींच्या नेतृत्वाखाली या विषयावर संशोधन चालले आहे हे ऐकून तुम्हास निश्चितच धन्य वाटेल.
नुकतेच जपानने भाषा सर्वार्थाने जाणणारा संगणक तयार केल्याचे जाहीर केले आहे. हे संशोधन खरेच एके दिवशी मानवापेक्षा सरस यंत्रमानव बनवेल काय ? आणि तो यंत्रमानव माणसाचा सहाय्यक राहीला की माणसालाच गुलाम करेल हे भविष्यच जाणो...
Hits: 195