बौद्धिक गुलाम (कोड मंकी)

Parent Category: मराठी साहित्य Category: डॉ. सु. वि. रानडे यांचे लेख Written by सौ. शुभांगी रानडे

भारतात माहिती तंत्रज्ञानाची प्रगती वेगाने हॊत असल्याने व त्याद्वारे भारतात मोठ्या प्रमाणावर परकीय चलन उपलब्ध होत असल्याने माझ्या मनात भारतीय आय. टी. कंपन्यांबद्दल अतीव आदराची भावना होती. भारतात सर्वत्र गरिबी, दुष्काळ, महागाई व रोजगाराची बिकट अवस्था असतानाही आय.टी. कंपन्यांची भरभराट, त्यांच्या नफ्याची चढती कमान व मोठ्या प्रमाणावर गलेलठ्ठ पगार देऊन रोजगार उपलब्ध करणार्‍या या कंपन्या म्हणजे भारताला एक वरदानच आहे असे मला वाटत होते. या कंपन्यातून नोकरी सोड्णार्‍यांचे प्रमाण इतर कंपन्यांच्या तुलनेत बरेच जास्त असते तरीदेखील या कंपन्यात जी वारेमाप नोकरभरती होते यात काय गौडबंगाल आहे. याचा मला उलगडा होत नव्हता.

सुदैवाने एका स्नेहमेळाव्यात मला अशा कंपन्यांतील अनुभवी सॉफ्टवेअर इंजिनिअर लोकांच्यासमवेत चर्चा करण्याची संधी मिळाली. सध्या इंजिनिअरिंग कॉलेजातील शिक्षणाचा दर्जा तितकासा चांगला नाही व नवीन पदवीधारकाना सध्याच्या सॉफ्टवेअरविषयी फारशी माहिती नसते तरीही यांना प्रसिद्ध आय.टी कंपन्यांत मोठ्या पगाराच्या नोकर्‍या लगेच कशा मिळतात व या कंपन्यांना त्यांचा कितपत फायदा होतो असा प्रश्ने मी त्यांना विचारला. त्यांनी अगदी सहजपणे सांगितले की आमच्या कंपन्यांना आंतराष्ट्रीय स्पर्धेस तोंड द्यावे लागत असल्याने आमच्या कुशल कर्मचारी वर्गाची संख्या जास्त ठेवावी लागते. नोकरीवर घेतल्यावर पहिल्या सहा महिन्यात त्यांना विवक्षित काम सहज शिकविता येते. शिवाय त्यांनी काम केले अथवा नाही केले तरी फारसे बिघडत नाही कारण त्यांच्या डिग्री व संख्या यांच्या आधारे कामाचे मोठे एस्टीमेट केले जाते. या उत्तराने माझे समाधान झाले नाही.

एखादे सॉफ्टवेअर तयार करायचे म्हणजे किती तयारी लागते, प्लॅनिंग, डिझाईन हे किती गुंतागुंतीचे कां असते हे मला ठाऊक होते. मी त्याबद्दल विचारले असता त्यातील एकाने सांगितले की आमची कंपनी फक्त कुशल माणसे पुरविते. आंतरराष्ट्रीय मोठ्या प्रकल्पाचे मुख्य डिझाईन, आखणी, कामाचे विभाजन वगैरे सर्व गोष्टी विकसित राष्ट्रातील आंतरराष्ट्रीय कंपन्या ठरवितात. आम्हाला त्याच्याशी काही देणे घेणे नसते. प्रत्येकाला काम आखून दिले असते व तो मोठ्या प्रकल्पाचा छोटासा हिस्सा असतो. उदा. एकाकडे ठराविक कार्यासाठी प्रोग्रॅम लिहिण्याचे काम अस्ते तर दुसर्‍याकडे ते तपासून चुका दुरुस्त करण्याचे, एखाद्याकडे केवळ मांडणीचे तर एखाद्याकडे जुळणीचे काम असते. संपूर्ण प्रोजेक्ट काय आहे व त्याचा उद्देश काय आहे याचीही आम्हाला माहिती नसते. एक सॉफ्टवेअर इंजिनीअरने तर स्पष्ट सांगितले की विकसित देशातील प्रोजेक्ट्चे मालक आम्हाला कोडमंकी (बौद्धिक गुलाम) समजतात. तिथल्या राहणीमानाप्रमाणे द्याव्या लागणार्‍या पगाराच्या मानाने भारतात स्वस्तात असे लोक मिळ्तात. यामुळेच आमच्या कंपनीला एवढा फायदा मिळतो.

मी हतबुद्धच झालो. माझ्या डोळ्यापुढे सोनेरी पिंजर्‍यात साखळीने बांधलेली सांगकामी माकडे दिसू लागली. ब्रिटिशांच्या काळात आपल्याकडे बाबूराज होते. इंग्रजी जाणणारी माणसे ब्रिटिशांची नोकरी करीत एतद्देशियांच्यावर जुलूम करीत ब्रिटिशांची संपत्ती वाढवत असत. तसाच हा प्रकार नाही ना. या विचाराने मी बेचैन झालो. विकिपिडिआत ‘कोडमंकी’ याचा काही चांगला अर्थ असेल अशा आशेने मी शोध घेतला. तेथे ‘कोडमंकी’ या नावाचा संगीतप्रधान प्रसिद्ध व्हिडिओगेम असल्याचे मला समजले. मात्र त्यातील पात्रे कोडमंकीच्याच खालच्या दर्जाची रंगवलेली मला दिसली.

आंतरराष्ट्रीय कंपन्या आपलेच बुद्धीवैभव वापरून आपल्यावर सत्ता गाजवीत नसतील कशावरून. सध्या भारतातील बहुतेक सर्व मोठे प्रकल्प भांडवल पुरविण्याच्या आमिषाने आंतराष्ट्रीय कंपन्या बळकावत आहेत. बीओटी हा भारत सरकारपासून ते स्थानिक संस्थेपर्यंत परवलीचाअ शब्द झाला आहे. बीओटीमध्ये आंरराष्ट्रीय मोठ्या कंपन्या पैसा उभा करतात या गोड स्वप्नात आपण असतो. मात्र या कंपन्या हे भांडवल स्वत: कधीच घालत नाहीत. ते भांडवल आपल्या पतीवर त्या येथील बँकांतूनच मिळवितात. प्रकल्पाचे कामही त्या येथील संस्थांच्यामार्फत करवितात.त्यांच्या देशातील साधनसामुग्री येथे चढ्या भावाने विकतात. अशा प्रकल्पाचे सर्व काम ते तिकडे बसून व इथल्या आय टी कंपन्यातील कुशल कर्मचार्‍यांच्या साहाय्याने करतात. येथे त्यामुळे पैसा येत असला व प्रकल्प होत असले तरी फायद्याचा मोठा हिस्सा त्यांना मिळतो.

इकडे भारतात भेडसावणार्‍या अनेक समस्यांवर प्रभावी उपाय काढण्यासाठी आय टी तज्ज्ञ मिळत नाहीत कारण ते सर्व आंतरराष्ट्रीय कंपन्यांत जाणे पसंत करतात. भारत सरकार आय टी कंपन्यांना आपली कामे देत नाही. आय़टी कंपन्याही याबाबतीत संघर्ष करीत नाहीत.आय टी कंपन्यात नोकरी करणारा कर्मचारी वर्ग सामाजिक चळवळीत सहभागी न होता समाजापासून वेगळा होत आहे व आलिशान जीवनशैली व सुखोपभोगाला आपली संस्कृती मानू लागला आहे. ही समाजधुरिणांनी काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. कारण यामुळे शहरीकरण, चंगळवाद व महागाई वाढत चालली आहे. यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.

अन्यथा भारत भविष्यात महासत्ता होणार या स्वप्नात आपण गुरफटून राहू व प्रत्यक्षात आपण विकसित राष्ट्रांचे गुलाम बनू व त्यांच्यावर आश्रित व अवलंबून राहू.

Hits: 176
X

Right Click

No right click