दिवाळी....
डॉ. आर्या जोशी
दिवाळी....
दिवाळीचे दिवस म्हणजे नातेवाईकांच्या भेटी, भेटवस्तूंची देवाणघेवाण, मुलांसाठी फटाके आणि नवीन कपडे, दारात रांगोळी, कंदील आणि पणत्यांची आरास ! पहाटेचे अभ्यंगस्नान, तिन्हीसांजेला केलेले लक्ष्मीपूजन ,पाडवा आणि भाऊबीजेचे औक्षण या सणाचा उत्साह अधिकच वाढवतात.
शुभसूचक रांगोळी, वाईट प्रवृत्तीना दूर पाठवून देणारा आकाशदीप, अंधार दूर करून आयुष्यात प्रकाश पसरवून आपल्याला आनंद देत असलेल्या पणत्या ही दिवाळीची अगदी खास वैशिष्ट्ये.
दिवाळी या मराठी नावाच्या जोडीने या सणाला संस्कृत नावेही आहेत. ही नावे दिवाळीचा अर्थ आणि प्राचीनता दोन्ही आपल्याला सांगतात. दीपालिका, यक्षरात्री, सुखरात्री अशी तिची काही नावे. नीलमत पुराणात नोंद आढळते की भारताच्या नंदनवनात म्हणजे काश्मीर भागात दिवाळीला सुखसुप्तिका असे नाव आजही प्रचलित आहे.
दिवाळी येते ती शरद ऋतूचा आनंद मनात घेऊनच! आपली भारतीय संस्कृती ही शेतीवर आधारलेली आहे. शारदीय नवरात्र आणि दसरा संपला की पाठोपाठ कोजागिरीची रात्र पूर्ण चंद्रबिंब घेऊन येते. आटवलेल्या केशरी दुधासह आपण ही रात्र जागवतो. याच रात्री देवीची पूजा केली जाते, तिला आटीव दुधाचा नैवेद्य दाखविला जातो. या दिवसाला “नवान्न पौर्णिमा” असेही म्हणतात कारण शेतातून नुकत्याच हाती आणलेल्या धान्याची कणसे देवीला अर्पण केली जातात. वैदिककाळात आश्वयुजी नावाची इष्टी आश्विन पौर्णिमेला केली जात असे. यावेळी घरे स्वच्छ करून सुशोभित केली जात. गोठ्यातल्या पशुधनाची पूजा केली जाई. त्यामुळे या इष्टीकर्मातच दीपावली उत्सवाचे बीज असावे असे अभ्यासक मानतात.
ज्यावेळी समाज अधिक प्रमाणात फक्त शेतीवर अवलंबून होता त्या काळात शेतात पिकलेले धान्य ज्यावेळी कोठारात भरेल आणि विकले जाईल तो काळ समृद्धीचा मानला जाणे स्वाभाविक होते. त्यामुळे धान्याची मुबलकता असताना आणि शरद ऋतूचा आल्हाद असताना दोन्हीचा एकत्र आनंद घेण्यासाठी दिवाळी सणाची योजना दिसते.
रमा एकादशीच्या दिवशी अंगणातल्या तुळशीपुढे पहिली पणती लावली जाते. दररोज आपण संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावतोच.पण या दिवशी दिवाळीच्या स्वागतासाठी पणती सजते. ग्रामीण भागातील अंगणातील या दृश्यामुळे दिवाळीची पावले समाजमनावर उमटलेली दिसतात.
शेतीसाठी बैल आणि दूध-दुभत्यासाठी गाय यांची खूप आवश्यकता असते. त्यामुळे गोवत्स द्वादशीला सवत्स म्हणजे आपल्या वासरासह असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धती आहे कारण त्यांच्या पावलांनी शेतात समृद्धी वाढते. त्या दिवशी गाय, बैल यांचा विशेष मान असतो. गळ्यात माळा घालून त्यांची पूजा केली जाते. तीन सांजेला त्यांना ओवाळले जाते. पुरणपोळीचा घास भरविला जातो.
लक्ष्मी ही धनाची देवता ! प्राचीन भारतात सोन्याचा धूर निघत असे अशी अतिशयोक्ती आढळून येते. परंतु भारताचा परदेशी व्यापार सुरू झाल्याचे ऐतिहासिक दाखले सापडतात. भारतातील व्यापारी मसाल्याच्या पदार्थाची निर्यात करत. त्यांची मुख्य बाजारपेठ रोमन साम्राज्याशी जोडलेली होती. रोमकडून या व्यापार्यांना सोने, चांदी या स्वरूपात मोबदला मिळत असे. त्यामुळे या काळापासून व्यापारी वर्गाचे आणि धनाचे सख्य अधिक वाढलेले दिसते.
धनत्रयोदशी हा दिवस व्यापारी वर्गाचा आणि आयुर्वेद शास्त्राच्या अभ्यासकांचा.व्यापारी वर्गासाठी हा दिवस धनाच्या पूजेचा असतो. हिशेबाच्या नव्या चोपड्यांची, वह्यांची पूजा या दिवशी केली जाते. धणे आणि गूळ यांचा नैवेद्य दाखविला जातो. मुले फटाके उडवून आनंद साजरा करतात.
अमृताचा कुंभ घेऊन समुद्रमंथनातून धन्वंतरी देवता प्रकटली तो हाच दिवस असे मानले जाते. त्यामुळे या दिवसाला धन्वंतरी जयंती असेही म्हटले जाते. आयुर्वेदाचे वैद्य या दिवशी धन्वंतरी पूजन करतात.
चांगल्या वृत्तीने आसुरी किंवा वाईट प्रवृत्तीवर मिळविलेला विजय म्हणजे नरक चतुर्दशीची पहाट! अशी आख्यायिका प्रचलित आहे की या दिवशी पहाटे श्रीकृष्णाने प्राग्ज्योतिषपूर राज्याचा राजा नरकासुर या राक्षसाचा वध केला. त्याच्या या विजयाच्या आनंदानिमित्त आपण पहाटे उठून अभ्यंगस्नान करतो. या दिवसात हळूहळू थंडी पडायला लागलेली असते आणि आपली त्वचाही कोरडी व्हायला लागलेली असते. अशावेळी उटणे दुधात कालवून त्याच्या सुगंधित लेपाने अंग स्वच्छ करणे म्हणजे त्वचेची काळजी घेणेच आहे. आयुर्वेदशास्रामधे अशा अभ्यंगाचे महत्व विशेष आहे. अंघोळीपूर्वी मुलांना,पुरुषांना औक्षण केले जाते, कोमट तेल अंगाला चोळले जाते.
याच दिवशी पहाटे यमदीपदान केले जाते.नरक म्हणजे वाईट जागा. समाजात प्रचलित प्रथेनुसार या दिवशी पहाटे यमासाठी पणती घराच्या स्वच्छतागृहात लावली जाते.
महाराष्ट्रात आपण अमावस्या अशुभ मानतो. दक्षिण भारतात मात्र ती शुभ मानली जाते. अलक्ष्मी दूर करून लक्ष्मीच्या स्वागतासाठी आश्विन अमावास्येला आपण लक्ष्मीपूजन करतो. आपल्या घरात आलेली , सचोटीने आणि प्रामाणिकपणे मिळविलेली संपत्ती पूजनीय आहे. ती वाढती राहो यासाठी धनाचा अधिपती कुबेर आणि देवी लक्ष्मी यांची पूजा करतो. पश्चिम बंगाल, ईशान्य भारत या राज्यांमधे या अमावास्येला लक्ष्मीपूजनाऐवजी मध्यरात्री कालीपूजन केले जाते. देवीला बळी अर्पण केला जातो. बकरी, रेडा यांचे बळी देण्याची प्रथा आजही सुरू आहे तर काही ठिकाणी पशुबळीऐवजी प्रतिकात्मक म्हणून कोहळा, लाल भोपळा यांच्यावर गुलाल, कुंकू घालून ते कापले जाते.
बलिप्रतिपदा म्हणजे भगवान विष्णूने वामन अवतारात बळीराजाचे सर्व साम्राज्य मागून घेतले तो दिवस. यज्ञ करण्यात मग्न असलेल्या बळीराजाकडे वामन अवतारात भगवान विष्णू पोहोचले. त्यांनी त्याच्या तीन पावलात सामावले एवढी भूमी बळीराजाकडे मागितली . दोन पावलातच सर्व विश्व व्यापल्यावर तिसरा पाय ठेवायला वामनाला जागा न मिळाल्याने त्याने बळीच्या मस्तकावरच आपला पाय ठेवला आणि त्याला पाताळात ढकलून दिले अशी ही कथा आहे.
ग्रामीण भागात शेतकरी आपल्या शेतात बळीचे मातीचे राज्य तयार करतात आणि इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना करतात. पाडव्याच्या या दिवशी विक्रम संवत सुरु होते. व्यापारी वर्गाचे नवे आर्थिक वर्ष सुरु होते. पती आणि पत्नीच्या नात्यातील गोडवा वाढविणारा हा पाडवा सर्वानाच आनंद देतो.
उत्तर प्रदेशात पाडव्याच्या दिवशी गोवर्धन पूजा करण्याची पद्धती आहे. त्यादिवशी विविध प्रकारची मिठाई तयार करतात आणि गोवर्धन पर्वताची प्रतिकृती तयार करतात. कृष्णाच्या मूर्तीची पूजा करून त्याला नैवेद्य दाखवितात. ईशान्य भारतातही वैष्णव संप्रदायाने प्रभावित भक्त अन्नकूट करतात. गावातील कृष्ण मंदिरात हाती आलेले नवे पीकही अर्पण करतात.
यमव्दितीया म्हणजे भाऊबीज. ऋग्वेद या आपल्या प्राचीन ग्रंथात यम आणि यमी ही दोन भावंडे आहेत. भावाबहिणीचे नाते पवित्र आहे असे यांच्या संवादातून सूचित केले आहे त्यामुळे भाऊ आणि बहीण यांच्या नात्यातील पावित्र्य, आस्था जपणारा हा दिवस आहे.
केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातल्या प्रत्येक राज्यात स्थानिक परंपरेनुसार दिवाळी साजरी होते. गुजरातमधे लक्ष्मीपूजनावेळी लावलेल्या दिव्याच्या काजळीचे काजळ तयार करून महिला ते डोळ्यात घालतात. ही कृती शुभसूचक मानली जाते.दक्षिण भारतात मंदिरांमधे दीपावली उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. नरक चतुर्दशीला दक्षिण भारतात छोटी दिवाली असे संबोधले जाते.ओरिसामधे तागाची रोपे एकत्र करुन त्याभोवती कापड गुंडाळून ती प्रज्वलित केली जातात.
एकूणातच मानवी मनांना जोडणारी, समाजाला एकत्र आणणारी,पराक्रमाची आठवण करुन देणारी आणि नाती जपणारी ही दिवाळी!
Hits: 202