हिरवाई

Parent Category: मराठी साहित्य Category: सौ. शुभांगी रानडे यांचे लेख Written by सौ. शुभांगी रानडे

दोन दिवस संततधार कोसळणार्‍या पावसाने आज अगदी गंमतच केली. श्रावण महिना सुरू व्हायला अजून कमीतकमी १०-१५ दिवस तरी बाकी होते. पण पावसाच्या मात्र हे गावीही नव्हते. श्रावणच सुरू झाला आहे असे समजूनच तो चालला होता. क्षणात ऊन तर क्षणात सरसर शिरवं असा त्याचा खेळ चालू होता. एक पळभरही विश्रांती न घेता पाऊस आपली ही करामत सर्वांना दाखवीत होता. अचानकपणे पावसाची एवढी मोठी सर कोसळत होती की हातातली छत्री उघडायला सुद्धा उसंत मिळत नव्हती. सडसडा पडून सर्वांना ओलेचिंब करून टाकण्यात पावसाला खरोखर मोठी मजा वाटत असावी. आणि छत्री उघडेतो बघता बघता वेगात आलेली पावसाची सर कुठच्या कुठे गडप होत होती.

आज अस्मादिकांच्या स्कूटरनेही संप पुकारल्याने ऑफिससाठी नाईलाजाने मला बसचे पाय धरायची वेळ आली होती. मी झपाझप पावले टाकीत बसस्टॉपकडे जात होते. एका हातात छत्री घेतलेली, दुसर्‍या हाताने साडी सावरत, मागून वेगाने येणार्‍या गाड्या चुकवत रस्ता ओलांडताना माझी पुरती तारांबळ उडत होती. तेवढ्यात झटकन्‌ वेगाने येऊन पुढे गेलेल्या गाडीने माझ्या साडीवर खडीदार नक्षी उठली होती. कसंबसं करत मी बसस्टॉपवर पोहोचले. मागच्या बाकावरील खिडकीजवळची जागा मिळाली मला. हुश्‌श करून सहज बाहेर बघते तो रस्त्याच्या दुतर्फा हिरवी पोपटी झाडे हेलकावे खात जणू खळाळून हसत होती, खेळत होती. लाल-पिवळी फुले त्या तालावर नाचत होती. पावसाचे टपोरे थेंब झेलत पाने-फुले सुखावली होती.

पुढच्याच स्टॉपवर आपापल्या छत्र्या सावरत एक आजी-आजोबा उभे असलेले मला दिसले. प्रचंड गर्दीमुळे त्यांना बसमध्ये काही चढता आले नाही. मी क्षणभरच त्यांच्याकडे पाहिले. त्यांना कुठेतरी पाहिल्यासारखं मला वाटलं खरं. पण बराच वेळ विचार करून नेमके कुठे पाहिले ते स्मरेना. आणि एका क्षणातच डोक्यात लख्खकन्‌ प्रकाश पडला. हो - उषाकाका अन्‌ नानाकाकाच होते ते! माझ्या माहेरच्या म्हणजे पुण्याच्या सदाशिव पेठेतल्या जोशी वाड्यातले उषाकाकू अन्‌ नानाकाकाच होते ते!

वाड्यातल्या सगळ्या मुलांचं त्यांना भारी कौतुक! त्यामुळे रोज संध्याकाळी दिवेलागणीला आम्ही सगळी मुले त्यांच्या घरी जमत असू. शुभं करोति बरोबरच प्रत्येक वाराचे स्तोत्रही त्यांनी हसत खेळत आम्हा सर्वांना शिकवले होते. ते म्हणून झाल्यानंतर प्रत्येकाच्या हातावर खडीसाखर, गोळी, वडी, भाजके दाणे असा छोटासाच का होईना, पण खाउ देऊन मगच आमची बोळवण होई. त्यावेळच्या त्या उषाकाकू एकदम माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. गोर्‍यापान, रुंद चेहरा, घारे डोळे, धारदार नाक, ठसठशीत कुंकू यामुळे उषाकाकू चारचौघीत उठून दिसत असत. यातच भरीत भर म्हणजे त्यांच्या मानेवर रुळणार्‍या सैलसर अंबाड्यात खोचलेले एखादेच फूल, निदान चार कसलीतरी पाने यामुळे त्यांच्या आंबाड्याला व अशा आंबाड्यामुळे त्यांच्या चेहर्‍याला एक आगळेच सौंदर्य प्राप्त होई. साधी सुतीच पण नीटनेटकी नेसलेली साडी व सदैव हसतमुख, प्रसन्न चेहरा यामुळे उषाकाकूंच्या व्यक्तिमत्वाला एक प्रकारचा सोज्वळपणा लाभला होता. मुलात मूल होऊन मिसळण्याची कला त्यांना चांगलीच अवगत होती. काही म्हणता काही कमी नव्हतं त्यांना. पण आल्यागेल्या प्रत्येकाशी दोन गोड शब्द बोलून किंवा निदान गोडसं हसून सर्वांचं मन जिंकून घेण्यात त्या अगदी पटाईत होत्या. तसं पाहिलं तर हे शिक्षण त्यांना कही शाळा-कॉलेजातून मिळालं नव्हतं. पण जात्याच मृदू स्वभावाच्या उषाकाकू आतिथ्यशीलही होत्या. आपल्या घासातला घास काढून दुसर्‍याला देण्यात त्यांना कोण आनंद व्हायचा!

विचारांच्या तंद्रीत हरवलेल्या मला बसस्टॅंड कधी आला ते समजले सुद्धा नाही. बसमधून उतरताना मात्र मनाशी एक निश्चय करीतच उतरले. आणि तो म्हणजे - आपणही उषाकाकूंसारखं समाधानी, आनंदी, आतिथ्यशील व्हायचा प्रयत्न करायचा. या विचाराने बाहेरच्या झाडापानांची हिरवाई माझ्या मनातही झिरपली ती कायमचीच!
---------------

Hits: 273
X

Right Click

No right click