देव

Parent Category: मराठी साहित्य Category: सौ. शुभांगी रानडे यांचे लेख Written by सौ. शुभांगी रानडे

जन्माला येणारे लहान मूल हे सर्वत्र सारखेच असते. म्हणजे असे त्याच्यावर जातीपातीचे, रीतीरिवाजांचे, पालकांचे, समाजाचे कसलेही संस्कार झालेले नसतात. जसे मातीचा गोळा सगळीक सारखाच असतो. पण कुंभाराने दिलेल्या निरनिराळ्या रंगरूपांमुळे प्रत्येकाला स्वतंत्र आस्तित्व, वेगळेपण येते हे सर्वांना ठाऊक आहेच. त्याप्रमाणे प्रत्येकावर लहानपणापासून कळत नकळत अनेक प्रकारचे संस्कार होत असतात. तसेच जात्याच हरेक व्यक्ती ही अनुकरणप्रिय असते म्हणून त्या त्या मुलांवर होणारे पालकांचे, घरातले संस्कार हे अधिक महत्वाचे ठरतात.

‘बालपणीचा ठेवचि आई, स्वर्गसुखाची ठेवचि आई
साडीचा परि शेव तिच्याही हाती असता चिंता नाही’

अशा पद्धतीने आई हे सर्वस्व मानणार्‍या त्या लहानग्या बाळाला आईपलिकडे दुसरे काही दिसत नाही. थोडे मोठे झाल्यावर ‘देवाची’, ‘बाप्पाची’ कल्पनाही त्याच्या मनावर बिंबवली जाते. त्याचे दोन्ही हात अलगदपणे कपाळाकडे नेऊन ‘बाप्पा मोरया’ म्हणायला शिकवले जाते. अर्थात या सार्‍या गोष्टींमध्ये घरच्या इतर वडीलधार्‍या मंडळींचाही तेवढाच सहभाग असतो हे विसरून चालणार नाही. आणि मग ते मूल स्वतःहोऊन ‘बाप्पा मोरया’ करायला लागल्यावर तर आपला आनंद तर गगनात मावेनासा होतो व आपणही मनोमन त्या देवापुढे नतमस्तक होतो.

असा हा ‘देव’ असतो तरी कसा? जसे पाण्याला स्वतःचा रंग नसतो अगदी तसेच देवाचे असते. देवालाही स्वतःचे रूप नसते. मग कोणी म्हणेल ‘आपण तर गणपती, शंकर, विष्णू, कृष्ण, विठोबा, सरस्वती, लक्ष्मी, मारूती इत्यादी विविध रूपात त्याला पाहतो हे कसे?’ तर निर्गुण, निराकार अशा त्या देवाला सगुण, साकार करण्याचे काम आपण माणसेच करतो नाही का? त्याचे कारण म्हणजे अमूर्त अशा त्या देवाचे चिंतन, मनन करायला आपले मन तयार नसते. मन ही अशी चीज आहे की ती अतिशय चंचल आहे. तेव्हा जर अशा अमूर्त देवाचे चिंतन करता करता आपले मन कोठे भरकटेल ते सांगता येत नाही. म्हणून त्याला सगुण साकार रूप दिले गेले. तर असा हा मूर्त देव मुळात एकच असून त्याच्या विविध प्रतिमांची अलग अलग नावे आहेत एवढेच. कुणी त्याला ‘राम, किंवा कृष्ण’ म्हणतात तर कुणी ‘अल्ला’, कुणी ‘येशू’ तर कुणी ‘बुद्ध’ एवढाच फरक. म्हणजे फरक फक्त नावातला असून ‘देव’ ह्या संकल्पनेतला नाही. पाणी जसे भांड्यात, वाटीत, तांब्यात किंवा घागरीत भरले तरी पाणी ते पाणीच राहते तसेच आहे हे.

आता हेच पहा ना आपल्याला तर माहीतच आहे की जगभर कुठेही गेले तरी ‘माणूस’ हा सगळीकडे सारखाच असतो. मग तो भारतीय, अमेरिकन, चिनी, जपानी, रशियन वा इतर कोणत्याही देशातला असो. नाक, कान, डोळे, हात, पाय, डोके इत्यादी अवयव तर सर्वांना सारखेच असतात. फरक फक्त एवढाच की त्याच्या कातडीचा रंग, डोळ्यांचा रंग, केसांची ठेवण, शारीरिक उंची असा शरीरयष्टीत बदल असतो. पण शेवटी माणूस तो माणूसच. जशा नद्या वेगवेगळ्या ठिकाणी उगम पावतात पण मिळतात शेवटी समुद्राला जाऊनच ना!

आकाशात्‌ पतितं तोयं यथा गच्छति सागरम्‌।
सर्वदेवनमस्कारः केशवं प्रति गच्छति ॥

अशाप्रकारे देवाबद्दलच्या रंगरूपाबद्दलच्या संकल्पना, मतप्रवाह वेगवेगळे असले तरी शेवटी ते सर्व ‘देव ’ ह्या एकच अमूर्त तत्वापाशी जाऊन मिळतात. केवळ जशी आपापली श्रद्धा असते त्याप्रमाणे वेगवेगळ्या रूपात तो ‘देव’ आपल्याला भेटतो.

Hits: 240
X

Right Click

No right click