दिवाळी सण मोठा…

Parent Category: मराठी साहित्य Category: डॉ. आर्या आ.जोशी यांचे लेख Written by सौ. शुभांगी रानडे

आपल्या सर्वांचा आवडता सण म्हणजे दिवाळी. शरद ऋतू हा भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांची रेलचेल असलेला आहे. त्या सर्वाचा कळसाध्याय म्हणजे दिवाळीचा सण ! नवीन कपडे, फटाके आणि खूप सारा फराळ, पहाटेची अंघोळ, दारात कंदील आणि रांगोळी असा हा आनंद देणारा सण आहे. नातेवाईक आणि मित्र- मैत्रिणी यांच्या भेटण्याचा हा सोहळा असतो.

दीपावलीचे मूळचे नाव यक्षरात्री असे आहे. नीलमत पुराण या ग्रंथात या सणास "दीपमाला" असे म्हटले आहे. ज्योतिषरत्नमाला या ग्रंथात "दिवाळी" हा शब्द वापरला आहे. भविष्योत्तर पुराणात दिवाळीला "दिपालीका" म्हटले आहे, तसेच या ग्रंथात तिचा उल्लेख "सुखरात्रि" असा येतो.व्रतप्रकाश नावाच्या ग्रंथात "सुख सुप्तिका" म्हणून दिवाळी ओळखली जाते. कनोजाचा राजा हर्षवर्धन याच्या नागानंद नाटकात या सणाला "दीपप्रतिपदुत्सव" असे नाव दिले आहे.

अशी धार्मिक श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आला, तो याच काळात . प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करुन प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यातील समृद्धीच्या ,आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. या दिवसांत सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात, घरांच्या दारात आकाशदिवे लावले जातात.
दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे रंभा एकादशी, हिला रमा एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी लक्ष्मीचे पूजन करण्याची पद्धती आहे.

आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीला म्हणजे वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. गो म्हणजे गाय आणि वत्स म्हणजे तिचे वासरू. भारताची संस्कृती कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा करतात. शेतकरी कुटुंबात या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील महिला गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालून पूजा करतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात.

त्रयोदशी तिथी ही धनत्रयोदशी म्हणून ओळखली जाते. धनत्रयोदशीबद्दल एक कथा प्रचलित आहे. ती म्हणजे समुद्र मंथनाची. जेव्हा असुरांबरोबर देवांनी समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रगट झाली.तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरीही अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. धन्वंतरी हा वैद्यराज असून त्याच्या हातातील कमंडलू अमृताने भरलेला असतो असे म्हटले आहे. म्हणून त्या दिवसास "धन्वंतरी जयंती" असेही म्हणतातवैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात.

या दिवशी वस्त्रालंकार खरेदी करणे शुभ मानतात. उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून ते स्वच्छ करतात. कुबेर,विष्णू -लक्ष्मी,योगिनी,गणेश,नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून खिरीचा नैवेद्य दाखवितात.

जैनधर्मीय या दिवसाला 'धन्य तेरस' वा 'ध्यान तेरस' म्हणतात. भगवान महावीर या दिवशी ३ऱ्या व ४थ्या ध्यानात जाण्यासाठी योगनिद्रेत गेले होते. तीन दिवसाच्या योगनिद्रेनंतर त्यांना दिवाळीच्या दिवशी निर्वाणप्राप्ती झाली. तेव्हापासून हा दिवस धन्य तेरस या नावाने प्रसिद्ध झाला.
यानंतरचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले. नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान. या दिवशी पहाटे यमासाठी नरकात म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील स्वच्छतागृहात दीपदान करण्याची (पणती लावण्याची) प्रथा आहे असे मानले जाते. काही धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे की आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि अमावास्येला संध्याकाळी लोकांनी आपल्या हातात मशाली घेवून त्या आपल्या दिवंगत पूर्वजांसाठी दाखवाव्यात आणि प्रार्थना करावी.

या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.व्यापारी समुदायात हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने 'आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती ' आणि 'अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता' अशी दोन महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात, म्हणून या पूजेची विशेषता आहे.

कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो.हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात. लोकसंस्कृतीत या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि 'इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो' असे म्हणतात. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्व आहे. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते.शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. या शेणाला "शुभा" असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस. पाठारे प्रभू समाजात बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती एकवीस दिवे मांडण्याचीही चाल आहे. . दक्षिण भारतात या दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. गायी - बैलांना रंग लावून रंग लावून व माळा लावून सजवतात.

या दिवशी विक्रम संवत सुरू होतो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात.व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ऒवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच "दिवाळसण" म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात.

कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो.या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला "यमद्वितीया" असे नाव मिळाले असे मानले जाते. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते.

असा हा आनंद देणारा दिवाळीचा सण. माणसांची मने जोडणारा, निसर्गाला आदर देणारा. प्राण्यांच्या प्रती आदरभाव व्यक्त करणारा आसा आहे.

अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश सर्वाना पोहोचविणारी दिवाळी आपल्याला आनंदाची, समृद्धीची आणि ज्ञानाच्या उपासनेची जावो ही सदिच्छा!

Hits: 187
X

Right Click

No right click