उत्सवाचा आनंद वाढविणारी रांगोळी

Parent Category: मराठी साहित्य Category: डॉ. आर्या आ.जोशी यांचे लेख Written by सौ. शुभांगी रानडे

उत्सवाचा आनंद वाढविणारी रांगोळी

रांगोळी ही भारताची धार्मिक- सांस्कृतिक परंपरा आहे. कोणताही सण असो ,उत्सव असो किंवा धार्मिक विधी- पूजा असो, दारात, मंदिरात, सार्वजनिक ठिकाणी रांगोळी काढली जातेच. दिवाळीच्या निमित्ताने रमा एकादशी पासून भाऊबीजेपर्यंत दारात सजलेली रांगोळी आणि वा-यावर डुलणारा आकाशकंदील सणाची शोभा वाढवितो.

वैदिक साहित्यात मंडल अथवा चक्र असे शब्द आढळतात. ते कदाचित जमिनीवर काढले जाणारे रेखाटन अशा अर्थी असावेत. रांगोळीचा उल्लेख रामायण, महाभारत ग्रंथांमध्येही आढळतो. वात्स्यायनाने लिहिलेल्या कामसूत्र या ग्रंथामध्ये स्त्रियांना अवगत असाव्या अशा चौसष्ट कलांमध्ये रांगोळी या कलेचा समावेश केला आहे. सरस्वतीच्या मंदिरात तसेच कामदेव व शिवलिंग यांच्या पूजेसाठी विविधरंगी फ़ुलांनीही आकृतिबंधात्मक रांगोळी काढत असेही उल्लेख काही ग्रंथात वाचायला मिळतात. वरांग चरित या ग्रंथात पंचरंगी चूर्णे, धान्ये व फुले यांनी रांगोळीचे चित्रविचित्र आकृतिबंध तयार करीत असल्याचे उल्लेख आहेत. गद्यचिंतामणी ,देशीनाममाला, या ग्रंथातही रांगोळीचे संदर्भ सापडतात. गद्यचिंतामणी या ग्रंथात भोजन समारंभात मंगलचूर्णरेखा काढीत, असा उल्लेख आढळतो. हेमचंद्राच्या देशीनाममाला या ग्रंथात तांदळाच्या पिठाने रांगोळी काढीत असल्याचा उल्लेख आहे.

मानसोल्लासात या ग्रंथात सोमेश्वराने धूलिचित्र या नावाने व श्रीकुमार याने शिल्परत्नात धूलिचित्र किंवा क्षणिकचित्र या नावाने रांगोळीचा निर्देश केला आहे.

संस्कृत भाषेत रांगोळीला रंगवल्ली म्हटले जाते. दिवाळीच्या सणात दारापुढे किंवा अंगणात विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून त्या विविध रंगांनी भरतात. नुकत्याच सारवलेल्या जमिनीवर शुभसूचक म म्हणून रांगोळी काढली जाते हि पद्धत आजही ग्रामेने भागात अनुभविता येते. गोपद्मव्रतामध्ये चातुर्मासात रांगोळीने गायीची पावले काढणे अशासारखे आचारही परंपरेने केले जातात. सकाळी सडासंमार्जन केल्यावर अंगणात रांगोळी काढण्याची पद्धती ग्रामीण भागात विशेष पहायला मिळते. शहरातही काही महिला आपल्या घरापुढे रांगोळी काढतात.

रांगोळी म्हणजे वेगवेगळ्या प्रतीकांचे एकत्रीकरण होय. रांगोळीमध्ये ज्या आकृत्या काढतात त्या प्रतीकात्मक असतात. स्वस्तिक, सूर्य, चंद्र, तारे, चक्र, चक्रव्यूह, त्रिशूळ, वज्र, कलश,गोपद्म, शंखचक्र, गदा, कमळाचे फूल, बिल्वपत्र, लक्ष्मीची
पावले, सूर्य देवेतेचे प्रतीक, श्री, कासव, बेलाचे पान अशा प्रतीकांचा समावेश रांगोळीत असतो. याशिवाय एकलिंगतोभद्र, अष्टलिंगतोभद्र, सर्वतोभद्र अशाही रांगोळ्या धर्मविधीत तांदूळ किंवा गहू यांचा अवाप्र करून काढल्या जातात.
चैत्र महिन्यात काढले जाणारे चैत्रांगण ही एक विशेष प्रतीकात्मक रांगोळी आहे.यात झुल्यात बसलेली देवी, राधाकृष्ण, चंद्र, सूर्य, गणपती, गोपद्म, गणपती, सरस्वतीचे रेखांकन, अशी विविध प्रतीके काढली जातात.
भारताच्या विविध राज्यात रांगोळी ही विविध नावांनी ओळखली जाते ती याप्रमाणे-

महाराष्ट्रात रांगोळी,कर्नाटकात रंगोली, आंध्र प्रदेशात मुग्गुळु, तामिळनाडूमध्ये कोलम, राजस्थानात मांडना,बिहारमध्ये अरीपण, उत्तर प्रदेशात सोनारख्खा, गुजरातमध्ये रंगोळी, मध्य प्रदेश भागात चौकपूरना माळवा प्रांतात चौकपूरणा, बंगाल प्रांतात अलिपना, केरळमध्ये पुवीडल, , ओडिशा राज्यात झुंटी अशी रांगोळीची नावे आहेत.

रांगोळीची पूड, फुले, पाने, रंग अशी विविध साधने वापरून रांगोळी काढली जाते आणि उत्सवाचा आनंद वाढविला जातो.

डॉ आर्या आ.जोशी
लेखिका हिंदू धर्मशास्र, इतिहास, भारतीय तत्वज्ञान-संस्कृृती आणि परंपरा या विषयाच्या अभ्यासक असून मराठी विकीपीडियावर संपादिका म्हणून कार्यरत आहेत.

Hits: 184
X

Right Click

No right click