अध्यात्म रामायण -प्रस्तावना

Parent Category: मराठी साहित्य Category: डॉ. आर्या आ.जोशी यांचे लेख Written by सौ. शुभांगी रानडे

अध्यात्म रामायण-संक्षिप्त परिचय

प्रस्तावना-

महर्षी वाल्मिकींचे आदिकाव्य रामायण सर्वपरिचित आहे. या आदिकाव्यापासून प्रेरणा घेऊन विविध कवींनी आपापल्या प्रतिभेला अनुसरून विविध रामायणांची निर्मिती केली असल्याचे दिसून येते.संस्कृत भाषेतील आनंद रामायण,अगस्त्य रामायण, तमिळ भाषेतील कंब रामायण, तुलसीदासांचे हिंदी भाषेतील तुलसी रामायण,बंगाली भाषेतील कृत्तिवास रामायण ही त्याची काही उदाहरणे.

परमेश्वराच्या ठिकाणी भक्तीभाव कसा ठेवावा याचे मार्गदर्शन करणारा ग्रंथ म्हणून अध्यात्म रामायणाचे विशेष महत्व आहे. यामध्ये रामायणाच्या कथानकातच प्रसंगानुरूप रामाच्या तत्वज्ञानात्मक रूपाचे वर्णन केलेले दिसून येते.ब्रह्मांड पुराणाचा एक भाग असलेल्या अध्यात्म रामायणात ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय झालेला दिसून येतो.यालाच अध्यात्मरामचरित किंवा आध्यात्मिक रामसंहिता असेही म्हणतात.या ग्रंथाची ७ कांडे आणि १५ सर्ग आहेत.
अध्यात्म रामायण ब्रह्मांड पुराणाचा भाग असले तरी त्याचा कर्ता कोण याविषयी अभ्यासकात मतभेद आहेत. १४ व्या शतकातील रामानंद हे त्याचे कवी असावेत असा काहींचा कयास आहे.( संदर्भ -Dhody Chandan Lal, 1995, The Adhytma Ramayan,M.D. Publications PVT.LTD.)

रामकथा-
प्रमाणातीत ,माया-जीव-ईश्वर यांच्या पलीकडे असलेल्या , निर्मल, विषयरूप मलविवर्जित, आत्म्स्वरूपज्ञान हेच शरीर , वाणी वा मन यांना अगोचर अशा दक्षिणामूर्तिना नमस्कार करून या रामायणाची सुरुवात होते.
देवर्षी नारद एकदा ब्रह्मलोकात गेले असता त्यांनी ब्रह्मादेवाला विचारले-“ कलियुगात अनेक चुकीच्या गोष्टींच्या आधीन झालेल्या नष्टबुध्दी लोकांना परलोकाची प्राप्ती कशी होईल यावर काही उपाय सांगा.त्यावर; रामाचे यथार्थ स्वरूप जाणून घेण्याच्या इच्छेने पार्वतीने केलेल्या विनंतीनुसार भगवान शंकरांनी सांगितलेले अध्यात्म रामायण या कलियुगातील लोकांचे रक्षण करील असे ब्रह्मदेवाने नारदांना सांगितले.
या ग्रंथात रामायण कथेच्या ओघातच यथाक्रमाने श्रीरामाच्या आध्यात्मिक स्वरूपाचे वर्णन आलेले दिसते.ते असे-
पृथ्वीचा भार हरण करण्याची विनंती देवांनी महाविष्णूना केली आणि त्यानुसार मायेने मनुष्यावतारात रामांनी जन्म घेतला.भगवान शंकर पार्वतीला म्हणाले-“ रामाठायी भक्ती हेच संसार तरण्याचे साधन होय.राम श्रेष्ठ असूनही मायेने वेढलेल्या स्वत:च्या स्वरूपाची त्याला जाणीव नव्हती. वसिष्ठांनी त्याला ती जाणीव करून दिली.”

अध्यात्म रामायणाच्या कथानकात वाल्मिकी रामायणापेक्षा काही वेगळेपण आहे.-

१.रामजन्माचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे की रावण वा त्याचा भाऊ कुंभकर्ण यांनी देवांना त्रास दिला. मनुष्याच्या हातूनच रावणाचा वध होईल अशी ब्रह्मदेवाची योजना होती वा त्यासाठीच विष्णूने रामावतार घेतला.

२.सीता स्वयंवराचे आख्यान या रामायणात नाही. रामाने जनकाच्या नगरीत जाऊन तेथे असलेले शिवधनुष्य सहज पेलले आणि जनकाने या पराक्रमी युवराजाला आपली कन्या सीता विवाहपूर्वक दिली. धनुष्य तुटलेले समजल्यावर भगवान परशुराम, मिथीलेहून अयोध्येच्या वाटेवर परत जाणा-या दशरथ आदि सर्वांना रागाने सामोरे गेले. प्रथम रामाविषयी त्यांनी आपला क्रोध व्यक्त केला परंतु नंतर मात्र श्रीरामाचे स्व-रूप लक्षात येताच त्यांना शरण जावून त्यांची स्तुती केली.परशुराम म्हणाले-“ तुझ्या भक्तांची संगती वा तुझ्या चरणी दृढ भक्ती मला सदा लाभो. जो हे तुझे स्तोत्र म्हणेल त्याला भक्ती, विज्ञान वा अंतकाळी तुझे स्मरण लाभो.”

३.रामला वनवासाला पाठविणे आणि भरताला राज्याभिषेक करणे यासाठी कैकेयीने राजा दशरथाकडे वर मागितला. या घटनेला एक नाट्यमय वळण अध्यात्म रामायण देते- तो प्रसंग असा- देवांनी सरस्वतीला आज्ञा केली की तू प्रयत्नपूर्वक भूलोकी अयोध्येला जा आणि राम राज्याभिषेकात विघ्न आण. त्यासाठी मंथरा आणि कैकेयी यांच्या शरीरात तू प्रवेश कर. सारांश, कैकेयीला वरदान आणि तिचे रामाविषयी निष्ठुर वर्तन हे सर्व देवांनीच घडवून आणले.

४. रावणाचे आत्मगत चिंतन हे या रामायणाचे एक वैशिष्ट्य ! राम हा मनुष्य नसून परमेश्वरच असावा. त्यामुळे त्याच्याकडून मी मारला गेलो तर वैकुंठाच्या साम्राज्याचा मालक होईन. भगवान माझ्यावर भक्तीने प्रसन्न होणार नसेल तर विरोध बुद्धीने त्याच्याकडे जावे असा विचार रावणाने येथे केलेला दिसतो ! हा विचार रामाला समजल्यावर राम सीतेला सांगतात की रावण संन्याशाचे रूप घेवून आश्रमात येईल.

म्हणून तू तुझ्या आकाराची छाया आश्रमात ठेव आणि माझ्या आज्ञेने एक वर्षपर्यंत अग्नीत गुप्तरूपाने रहा. रामाचे वाचन ऐकून सीतेने तसेच केले. राम प्रत्यक्ष परब्रह्म आणि सीता प्रत्यक्ष योगमाया असल्याने याप्रकारची नाट्यमयता त्यांनीच कथानकाला दिली आहे.

५. ज्याप्रमाणे सीता स्वयंवर आख्यान या रामायणात नाही त्याप्रमाणे प्रसिद्ध अशा लक्ष्मणरेषेचा उल्लेखही यामध्ये नाही. मारीचाने कांचनमृगाचे रूप घेवून सीतेला मोहित केल्यावर श्रीराम त्याच्यामागे जातात , त्यावेळी श्रीरामांचा आवाज ऐकून सीता लक्ष्मणाला रामाच्या रक्षणासाठी जायला सांगते. त्यावेली तिच्याच रक्षणाचा विचार करून लक्ष्मण जायला तयार होत नाही परंतु सीता लक्ष्मणाचा अपमान करून त्याचा धिक्कार करते आणि त्यामुळे काहीसा चिडलेला लक्ष्मण तिला तसेच सोडून रामाच्या मदतीला निघून जातो.

या वा अशा अन्य घटनांच्या माध्यमातून रामाचे आध्यात्मिक वा अलौकिक रूप मांडले गेले आहे. ज्यामध्ये रामकथेतील विविध व्यक्तीनी रामाचे गुणवर्णन केले आहे.

जटायूच्या मृत्यूनंतर रामकृपेने त्याला दिव्यरूप प्राप्त झाले. त्यानंतर रामाची स्तुती करताना जटायू म्हणतो-“ हे रामा, तू जगाचे आदिकारण आहेस. तू असंख्य गुणांनी युक्त आहेस. तू भक्तांना वर देण्यात तत्पर आहेस. तू शेकडो सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेस.”
वनवासाहून परत आल्यानंतर हनुमानाला प्रत्यक्ष सीतेने रामाचे स्वरूप सांगितले, त्याला ‘रामहृदय’ असे म्हटले जाते. त्याचे पठन जो करतो त्याची पापातून मुक्ती होते असे त्याचे फलही सांगितले आहे. योगमाया सीता सांगते-“राम हा सच्चिदानंदरूप आहे. ते गुणरहित,सर्वप्रेरक ,स्वयंप्रकाशी,पापरहित आहे. राम हा शोकरहित आहे.त्याच्या रूपात बदल होत नाहे.ते सृष्टीरूप भासतो ते मायेमुळेच.उत्पत्ती-स्थिती आणि लय करणारी आदिमाया मीच आहे आणि या रामायाणातील सर्व घटना मायारूपी सीतेनेच घडविल्या आहेत.”

या रामायणामध्ये श्रीरामांनी शबरीला भक्तीची आणि लक्ष्मणाला ज्ञानाची साधने सांगितली आहेत.
शबरीला श्रीराम म्हणतात-“सज्जनसंगती, रामकथांचे श्रवण,त्याचे गुणगान करणे,आपल्या गुरूला रामस्वरूप मानून त्याची मनोभावे पूजा करणे,सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी रामालाच पाहणे, रामभक्तांची पूजा करणे , यम-नियम इ. चे पालन करणे ही भक्तीची साधने जो मनापासून आचरण करेल त्याला रामाच्या कृपेची प्राप्ती होईल.

लक्ष्मणाने केलेल्या विनंतीवरून रामाने त्याला ज्ञानाची साधने सांगितली ती याप्रमाणे-
रामभक्ताने दंभ, हिंसा यांचा त्याग करावा. निंदा सहन करावी.मनामध्ये चांगले विचार आणावेत.अहंकाराचा त्याग प्रयत्नपूर्वक करावा. रामाठायी अनन्यभक्ती ठेवावी.शरीर-मन- बुध्दीची शुद्धी असावी. असे आचरण केल्याने रामाच्या स्व-रूपाची प्राप्ती होईल वा भक्ताचे कल्याण होईल.
याच रामकथेमध्ये श्रीरामाने आपली पूजा कशी करावी हे ही सांगितले आहे. याला दशावरण पूजा असे म्हणतात.
या रामायणात गंधर्वाने केलेली रामस्तुती वैशिष्टपूर्ण आहे.- रामाचा देह म्हणजे ब्रह्मांड,पाताळ हे त्याचे तळवे,आकाश ही त्याची नाभी,अग्नी हे त्याचे मुख,सूर्य हे डोळे,चंद्र हा मन,यम ह्या त्याच्या दाढा,नक्षत्रे त्याचे दात,दिवस वा रात्र म्हणजे त्याच्या डोळ्यांची उघडझाप असे म्हणून श्रीराम हे सर्वव्यापी तत्व आहे असे म्हटले आहे.

या रामायणाच्या शेवटी भगवान शंकर म्हणतात-
अहं भवन्नाम गृणान्कृतार्थो वसामि काश्यामनिशं भवान्या |
मुमूर्षमाणस्य विमुक्तये S हं दिशामि मंत्रं तव रामनाम ||
मी (महादेव) तुझाच जप करीत काशीतच निवास करतो. मरणासन्न प्राण्याला मुक्तीसाठी तुझ्याच नावाचा उपदेश करतो.

वाल्मिकी रामायणाचा संदर्भ घेत परंतु रामाचे अलौकिक स्वरूप सांगण्याच्या प्रयत्नात अध्यात्म रामायणाने केलेले कथानाकातील बदल मुळातून वाचण्यासारखे आहेत. त्यानिमित्ताने एका वेगळ्या रामायणाचा परीच्या होईल आणि श्रीरामाच्या आध्यात्मिक रूपाची ओळख ही होईल.
डॉ आर्या आ.जोशी
लेखिका हिंदू धर्मशास्र, इतिहास, भारतीय तत्वज्ञान-संस्कृृती आणि परंपरा या विषयाच्या अभ्यासक असून मराठी विकीपीडियावर संपादिका म्हणून कार्यरत आहेत.

Hits: 212
X

Right Click

No right click