प्रख्यात ब्रिज इंजिनिअर माधवराव भिडे
मराठी उद्योजकांमध्ये सहकाराची रुजवणूक करण्यासाठी सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट स्थापून प्रख्यात ब्रिज इंजिनिअर माधवराव भिडे यांनी मराठी उद्योजकतेत मैत्रीचा मजबूत पूल बांधला.
‘मी व्यावसायिक होईनच’ असे स्वप्न मराठी तरुणांनी पाहावे, उद्योग वाढवावा, संपत्ती निर्माण करावी आणि स्वत:बरोबरीने इतरांनाही मदतीचा हात देत मोठे करावे, अशा भूमिकेतून त्यांनी २००० सालात सॅटर्डे क्लबची स्थापना केली.
माधवराव भिडे यांचे वडील नानासाहेब हे पेशाने शिक्षक होते. ते इतिहासाचे जाणकार होते. सावरकरांवर त्यांची अढळ निष्ठा होती. त्यांच्या पत्रांचा संग्रह भिडेनी पुस्तकरुपाने प्रसिद्ध केला. सांगलीस आले असताना त्यांनी ३०० रु. किमतीचे ते पुस्तक मला भेट दिले होते. माधवरावांनी सिव्हील इंजिनियरिंगमध्ये ७४ टक्के गुण मिळवून यश संपादन केले एवढेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे ब्रिज इंजिनिअर होऊन रेल्वे खात्यामध्ये प्री स्ट्रेस्ड काँक्रीट पुलांचे डिझाईन व बांधकाम केले.
रेल्वेमध्ये नोकरीला लागल्यानंतर त्यांनी रेल्वे कर्मचार्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ’ललित कला मंडळा‘ची स्थापन केली. स्वखर्चाने आपल्या सुट्ट्यांचा वापर करुन इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, स्वित्झर्लंड, स्वीड्न, नेदरलँड, नॉर्वे, फ्रान्स, चीन, जपान इत्यादी महत्त्वाच्या देशांचा प्रवास करून रेल्वे पुलांचा अभ्यास केला. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत दिवा-डोंबिवली-वसई हा रेल्वे प्रकल्प पूर्ण केला. वान्द्रे-खार या हार्बर लाईनचा अंधेरीपर्यंत विस्तार करण्यासाठी ‘प्री स्ट्रेस्ड काँक्रीट’ पद्धतीचा पूल रेल्वे इतिहासात पहिल्यांदाच बांधला गेला. त्याचे जनक माधवराव होते.
गुजराथमध्ये नोकरीनिमित्त असताना वार्षिक २०० कोटी रुपयांची उलाढाल असणा-या एका गुजराथी कारखानदाराने त्यांना सांगितले की आमच्याकडे क्लार्क, केमिस्ट, अकौंटंट ही सर्व मराठी मंडळी हुषार आहेत पण धंद्यामध्ये आमच्याशी स्पर्धा करू शकत नाहीत. हे वाक्य ऐकल्यावर त्यांचा स्वाभिमान जागृत झाला आणि त्या ईर्षेतून त्यांनी नोकरी सोडून उद्योजक होण्याचा निर्णय घेतला.
वयाच्या ५८ व्या वर्षी भारतीय रेल्वेतून स्वेच्छा निवृत्ती घेऊन इमारत, पूल, कारखाना यांचे मूल्यांकन करणार्या भिडे असोसिएट्सची स्थापना केली. काही वर्षांतच संपूर्ण भारतात भिडे असोसिएट्सच्या १५ शाखा झाल्या. १९८९ साली त्यांनी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ब्रीज इंजिनियर्स’ या संस्थेची स्थापना केली. ‘आयआयबीई’द्वारे पूलबांधणीचे अनुभव देश-विदेशांतून भारतीय अभियंत्यांना देणारे, ज्ञान-तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीचे व्यासपीठ त्यांनी उभे केले.
भिडेंनी सन २००० साली ’सॅटर डे क्लब ग्लोबल ट्र्स्ट‘ या संस्थेची स्थापना केली. मराठी उद्योजकांना एकत्र करण्यासाठी ‘एकमेका साह्य करु, अवघे होऊ श्रीमंत’ असे नवे घोषवाक्य घेऊन माधवरावांनी सारा महाराष्ट्र पिंजून काढला.
२००२ साली सांगली, मिरजमध्ये शाखा काढण्यासाठी ज्ञानदीपने पुढाकार घेतला होता. त्याच्या क्लबसाठी मायमराठी वेबसाईटही वापरण्याचे त्यावेळी निश्चित झाले होते मात्र परदेशी गेल्यामुळे माझा त्याच् संपर्क तुटला. माधवराव भिडे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी ७ जुलै २०१८ रोजी निधन झाले हि बातमी वाचल्यावर मी स२टरडे क्लबबाबत माहिती गोळा केली त्यावेळी संस्थेच्या ४५ शाखा सध्या कार्यरत असून १७०० हून अधिक मराठी उद्योजक याचे सदस्य आहेत. हे मला कळले.
सॅटरडे क्लबची वेबसाईट http://scgt.org.in क्लबमधील पदाधिका-यांची नावे समजली. मात्र वेबसाईट सध्या अद्ययावत नाही हे लक्षात आले. आता माधवराव भिडें यांचा मराठी उद्योजकांचा सॅटरडे क्लब आणि शिक्षण, साहित्य व संस्कृतीत रमलेले मराठी बुद्धीवंत यांच्यात नवा पूल बांधण्याचे काम ज्ञानदीप मायमराठीच्या माध्यमातून करणार आहे.
Hits: 250