बजाज घराणे
भारतातील एका महत्त्वाच्या उद्योगसमूहाचे प्रवर्तक घराणे. वर्धा येथील शेठ बच्छराज बजाज यांनी वयाच्या चौथ्या वर्षी दत्तक घेतलेले ⇨जमनालाल बजाज (४ नोव्हेंबर १८८९-११ फेब्रुवारी १९४२) हे या उद्योगसमूहाचे संस्थापक. शेठ बच्छराज यांचा पाच लाखांचा घरगुती व्यवसाय जमनालालांना मिळाला होता. विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात, जमनालाल बजाज यांनी व्यापारी, पतपेढीदार आणि कापूस व्यापारी म्हणून व्यवसायाचा श्रीगणेशा केला. १९२६ मध्ये या समूहातील ‘बच्छराज फॅक्टरीज लि.,’ मुंबई, हा पहिला निगम, तर १९३१ साली ‘हिंदुस्तान शुगर मिल्स लि’., गोलागोकरनाथ उत्तर प्रदेश हा पहिला साखर कारखाना स्थापन झाला.
महात्मा गांधी जमनालालांना ‘व्यापारी राजपुत्र’ (मर्चट प्रिन्स) म्हणून संबोधीत. आपण मिळविलेल्या प्रचंड संपत्तीचा जमनालालांनी जनकल्याणार्थ विश्वस्तनिधी निर्माण करून विनियोग केला. प्रामाणिकपणा व दीर्घ परिश्रम हे त्यांच्या व्यवसायाचे ब्रीदवाक्य होते.
केवळ पैसे भरपूर प्रमाणात कमविणे हे बजाज उद्योगसमूहाचे ध्येय कधीच नव्हते. युध्दकालीन तेजीचा फायदा या उद्योगधुरीणांनी इतरांप्रमाणे केव्हाही करून घेतला नाही. बजाजांकरवी अनेक न्यास उभारण्यात आले त्याचप्रमाणे अनेक सुयोग्य कारणांकरिता प्रचंड प्रमाणात देणग्या देण्यात आल्या. उदा., मुंबई विद्यापीठास १० लाख रूपयांची देणगी देऊन उभारण्यात आलेली ‘जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’.
द्वितीय महायुध्दोत्तर काळात झालेली बजाज घराण्याची वाढ ही कमलनयन व रामकृष्ण या दोन बंधूच्या कर्तृत्वाची साक्षच होय. सध्या बजाज उद्योगसमूह अनेक प्रकारच्या औद्योगिक व उपभोग्य वस्तूंचे उत्पादन व वितरण करतो. १९७७ मध्ये या समूहाच्या १८ उत्पादनसंस्थांमधून १७,००० वर लोक गुंतलेले असून समूहाची एकूण वार्षिक उलाढाल १६४ कोटी रूपयांवर होती. आंतरराष्ट्रीय अग्रेसर परदेशी कंपन्याबरोबर तांत्रिक, वित्तीय व व्यवस्थापकीय सहकार्य करून यशस्वी झालेले जे काही थोडेफार भारतीय उद्योग आहेत, त्यांमध्ये बजाज उद्योगसमूहाचा वरचा क्रम लागतो. त्याचबरोबर देशी तांत्रिक विशिष्ट ज्ञानाच्या विकासावर अधिकाधिक भर दिला जात आहे. कुर्ला या मुंबईच्या उपनगरात असलेल्या ‘मुकुंद आयर्न अँड स्टील वर्क्स’ या विशिष्ट प्रकारचे पोलाद निर्माण करणाऱ्या सहयोगी कारखान्यात (स्था.१९३७) अद्ययावत संशोधन केंद्र उभारण्यात आले आहे. बजाज उद्योगसमूहाने आपल्या काही कारखान्यांच्या कामगारांकरिता कारखान्यांच्या परिसरातच घरे बांधली असून बहुतेक सर्व बजाज कामगांराना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध केली जाते. हिंदुस्तान शुगर मिल्स लि. या कारखान्याच्या परिसरात एक माध्यमिक शाळाही चालविली जाते. ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक अनुदाने देण्यात येतात. मुकंद आयर्न अँड स्टील वर्क्स आपल्या तांत्रिक व बिगरतांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण व विकास कार्यक्रम उपलब्ध करते.
कमलनयन बजाज (१९१५-७२) : जमनालाल व जानकीदेवी यांचे हे प्रथम पुत्र. राजकारण व समाजकारण यांचा वारसा त्यांना परंपरेने लाभला होता. लोकसभेचे ते अनेक वर्षे सदस्य होते. (१९५७-७०) महात्मा गांधी राष्ट्रीय स्मारक निधीचे ते एक विश्वस्त असून ‘खादी व ग्रामोद्योग मंडळा’चे सदस्य म्हणून तसेच ‘निसर्गोपचार सल्लागार समिती’चे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. यांशिवाय अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संस्थाशी त्यांचा संबंध होता. कमलनयन बजाजांचा गांधीच्या तत्त्वज्ञानावर व सिध्दांतावर दृढ विश्वास असल्याने, ते आचरणात आणले तरच आपल्याला त्रस्त करणारे विविध राष्ट्रीय प्रश्न दूर करता येतील, ही त्यांची श्रध्दा होती. त्यांच्या मते भारतात सामाजिक क्रांती परस्परसामंज्यस व त्याग यांमुळेच घडून येऊ शकेल हिंसाचारांनी नव्हे. कमलनयन यांनी आपल्या पूर्वीच्या व्यवसायात दृढीकरण व आधुनिकता आणली, एवढेच नव्हे तर विद्युत उपकरणे (बजाज इलेक्ट्रीकल्स), स्कूटर, तीन-चाकी मालवाहू गाड्या व रिक्षा (बजाज ऑटो), सिमेंट (उदयपूर सिमेंट वर्क्स), आयुर्वेदिय औषधनिर्मिती (आयुर्वेद सेवाश्रम लि.) इ. विविधांगी उद्योग सुरू केले. वयाच्या अवघ्या सत्तावनाव्या वर्षी त्यांचे आकस्मित निधन झाले.
संस्थापक जमनालाल कमलनयन रामकृष्ण
संस्थापक जमनालाल कमलनयन रामकृष्ण
रामकृष्ण बजाज (२२ सप्टेंबर १९२३− ) : हे जमनालाल व जानकीदेवी यांचे द्वितीय पुत्र आणि कमलनयन बजाजांचे धाकटे बंधू जन्म वर्धा येथे. रामकृष्णाचे शिक्षण वर्धा येथील नवभारत विद्यालयात चालू असतानाच स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्याकरिता त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला. त्यांनी १९४०-४५ यांदरम्यान तीन वेळा कारावास भोगला. रामकृष्ण १९७२-७६ दरम्यान विदर्भ विकास निगमाचे अध्यक्ष होते. यांशिवाय बच्छराज अँड कंपनी लि. हिंदुस्तान शुगर मिल्स लि. मॅचवेल इलेक्ट्रिकल्स इंडिया लि. हर्क्युलस हॉइस्ट्स लि. वगैरे कंपन्यांचे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले. मुकंद आयर्न अँड स्टील लि. चे ते उपाध्यक्ष होते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स (१९६४-६८), कौन्सिल फॉर फेअर बिझिनेस प्रॅक्टिसेस (१९६९-७१), नॅशनल कमिटी ऑफ इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स (१९७८-७९), इंडियन मर्चट्स चेंबर (१९७९-८०) इ. नामवंत संस्थांचे ते अध्यक्ष होते. सांप्रत रामकृष्ण ‘बजाज इंटरनॅशनल प्रा.लि.’ मुंबई, या कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहतात.
रामकृष्णांनी जापान की सैर, रूसी युवकोंके बीच, अटलांटिक के उसपास ही हिंदी तर द यंग रशिया व सोशल रोल ऑफ बिझिनेस ही इंग्रजी पुस्तके लिहिली आहेत.
रामकृष्णांनी १९६२ मध्ये काँग्रेस पक्षाचा त्यात केला व औद्योगिक उत्पादनावर अधिक लक्ष केंद्रीत केले. ‘कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिस’ या संस्थेच्या प्रमुख संस्थापकांपैकी रामकृष्ण हे एक असून या संस्थेने व्यापार व्यावसायिकांसाठी एक आचारसंहिता तयार केली आहे. रामकृष्णांच्या मते गैरव्यवहार करणाऱ्या काही व्यापाऱ्यांमुळे संबंध व्यापारी वर्गाची बदनामी होऊ नये म्हणून ही आचारसंहिता कार्यवाहित आणली जाणे अत्यावश्यक आहे.
राहूल बजाज (१० जून १९३८− ) : हा कमलनयन व सावित्री बजाज यांचा मुलगा. बजाज घराण्याची ही तिसरी पिढी. ते १९७२ पासून बजाज ऑटो लि’. या प्रख्यात स्कूटरनिर्मिती कारखान्याचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहतात. ‘महाराष्ट्र स्कूटर्स लि’. या सातारा येथील महाराष्ट्र शासन (सरकारी क्षेत्र) व खाजगी क्षेत्र यांच्या संयुक्त क्षेत्रीय प्रकल्पाचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे आहे.
बहुतेक सर्व बजाज उद्योगांचे उत्पादन व नफा ह्यांचे आकडे वाढीव आलेख दर्शवितात. बजाज ऑटो लि.मध्ये (स्था.१९४५) स्कूटर, मालवाहू तीन-चाकी गाड्या व त्यांचे सुटे भाग यांची निर्मिती केली जाते. स्कूटर व तीन-चाकी गाड्यांची निर्मिती करणारा भारतातील सर्वांत मोठा व जगामधील दुसरा कारखाना म्हणून याची गणना होते. १९७६-७७ मध्ये १.१७ लक्ष स्कूटरचे या कारखान्यातून उत्पादन झाले. बजाज ऑटोने इंडोनेशिया व तैवान या देशांत आपल्या तांत्रिक सहकार्याने स्कूटरनिर्मितीचे कारखाने उभारले आहेत. बजाज ऑटोने पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या सहकार्याने सातारा येथे महाराष्ट्र स्कूटर्स लि. या नावाचा संयुक्त क्षेत्रीय कारखाना उभारला असून १९७७-७८ या दुसऱ्या वर्षात त्यामधून २४,००० स्कूटरची निर्मिती झाली. भारतातील सर्वात जुन्या साखरकारखान्यापैंकी एक असलेल्या हिंदुस्तान शुगर मिल्समधून (स्थापना १९३१) प्रतिवर्षी अद्यापही मोठ्या प्रमाणावर सारखेचे त्याचप्रमाणे सु. १८ लक्ष गॅलन औद्योगिक अल्कोहॉल यांचे उत्पादन होत असते. १९७६-७७ या साली १,३०५ लक्ष रू.किंमतीचे साखर व अल्कोहॉल यांचे उत्पादन झाले. या कारखान्याच्या ‘उदयपूर सिमेंट वर्क्स’ या दुय्यम कंपनीद्वारे १९७६-७७ मध्ये १.८५ लक्ष टन सिमेंटचे उत्पादन झाले. उदयपूर, हैदराबाद व वाराणसी येथील बजाज नियंत्रित ‘आयुर्वेद सेवाश्रमां’मधून (१९३०) १९७६-७७ मध्ये १.८ कोटी रू. किंमतीची सौंदर्यप्रसाधने, आयुर्वेदीय औषधे इत्यादींचे उत्पादन झाले. ‘बजाज टेंम्पो’ या कारखान्यामधून ‘मॅटॅडॉर’ वाहनांची निर्मिती केली जाते. ‘बजाज इलेक्ट्रिकल्स’ ही प्रथमतः वितरणसंस्था होती. ती १९५२ मध्ये बजाज उद्योग समूहाने आपल्या छत्राखाली आणली. दिवे, नलिका, पंखे,फिटिंग्ज, गृहोपयोगी उपकरणे, त्याचप्रमाणे शेतीसाठी मोटर व पंप इत्यादींचे वितरण बजाज इलेक्ट्रिकल्स द्वारे केले जाते. १९७६-७७ मध्ये तिची १४७४.५ लक्ष रूपयांची एकूण विक्री झाली. मॅचवेल इलेक्ट्रिकल्स (इंडिया) लि. (स्थापना १९४६.) हा कारखाना सर्व प्रकारच्या विजेच्या पंख्यांचे तसेच ॲल्युमिनियम प्रेशर डाय-कास्ट उपकरणांचे उत्पादन करतो. १९७५-७६ मध्ये त्यामधून ४२२.६ लक्ष रू. किंमतीचे उत्पादन झाले. ‘हिंद लॅम्प्स’ (स्था.१९५१) मधून लहान आकाराच्या स्वयंप्रकाशी दिव्यांचे तसेच तदनुषंगित उपकरणांचे उत्पादन होते. १९७५-७६ मध्ये ६२४.२ लक्ष रू. किमतीचे उत्पादन झाले.
बजाज उद्योगसमूहाने आतापर्यंत अनेक सार्वजनिक धर्मादाय कारणांकरिता सु. २ कोटी रूपयांचा विनियोग केला आहे. १९७६ मध्ये रामकृष्ण बजांजांनी जमनालालांच्या स्मरणार्थ स्थापिलेल्या ५० लक्ष रूपयांच्या ‘जमनालाल बजाज प्रतिष्ठाना’द्वारा समाजसेवा, विज्ञान व तंत्रविद्या यांचा ग्रामीण विकासार्थ विशेष उपयोग आणि स्त्रिया व मुले यांच्या कल्याणार्थ विशेष प्रकारचे कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांचा प्रत्येकी एक लक्ष रूपयांचे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. पहिले दोन पुरस्कार १९७८ पासून, तर तिसरा पुरस्कार १९८० पासून देण्यात येऊ लागला.
गद्रे, वि. रा.
Hits: 261