व्हिसा बॅन - आत्मनिर्भर भारतासाठी एक इष्टापत्ती

Parent Category: मराठी उद्योग Category: उद्योजक आणि व्यावसायिक Written by सौ. शुभांगी रानडे
 अमेरिकेने एच वन - बी व्हिसावर बंदी घातल्याने भारतातील आयटी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. परदेशात आपले बुद्धीमान लोक पाठवून त्यांच्या माध्यमातून प्रचंड पैसा मिळविण्याच्या त्याच्या व्यापाराला आता खीळ बसणार आहे. निदान आपले अस्तित्व टिकविण्यासाठी का होईना त्यांना आता इतर पर्याय शोधण्यावाचून गत्यंतर नाही.

परदेशात जाणा-या तरुणांनाही एक धक्का बसला आहे. परदेशात जाऊन ऐषारामात सुखी जीवन जगण्याचे स्वप्न भंग पावले आहे. परदेशात असणा-या लोकांनाही आपल्या नोकरीची शास्वती राहिलेली नाही.

 याचा परिणाम म्हणजे आता या कंपन्या वा व्यक्तींचे लक्ष आकाशातील स्वर्गसुखाच्या काल्पनिक विश्वातून सभोवतालच्या स्थानिक परिस्थितीकडे वळणार आहे. ही गोष्ट भारताच्या दृष्टीने भविष्यात अतिशय चांगली ठरेल यात शंका नाही.

सध्या स्थानिक जनतेचे असंख्य प्रश्न सोडविण्याकडे कोणाचेच लक्ष नाही. परदेशी कंपन्यांची चाकरी करून भारतातील  संपत्ती परदेशात नेणा-या त्यांच्या कार्यास हातभार लावण्यापेक्षा तेच व्यवस्थापन कौशल्य व तीच बुद्धीमत्ता भारतासाठी उपयोगात आली तर भारत आत्मनिर्भर व विश्वविजेता होऊ शकेल. मात्र यासाठी भारत सरकारनेही अशा भारतीय कंपन्यांना आपल्या प्रकल्पांची कामे अग्रहक्काने द्यावयास हवीत. त्यांच्या व्यवस्थापन मंडळांत आपले प्रतिनिधी ठेवून या क्षेत्रातील सर्वदूर पसरलेल्या आणि कामाअभावी कसेबसे अस्तित्व टिकवून ठेवणा-या छोट्या कंपन्यांना याचा वाटा कसा मिळेल याकडे लक्ष द्यावयास हवे.

महाराष्ट्रास समृद्धीच्या वाटेवर नेणा-या सहकारी उद्योगाचा वसा आयटी कंपन्यांत सक्तीने अंमलात आणला तरच हे शक्य होईल. माननीय माजी मुख्यमंत्री श्री वसंतराव दादा पाटील यांनी सहकारक्षेत्र उच्च शिक्षणालाठी खुले केले. मा. पतंगराव कदम यांना आयटी पार्कच्या माध्यमातून ते करायचे होते. या दोघांचा वारसा घेऊन महाराष्ट्र राज्य सरकारने याबाबतीत पहिले पाऊल टाकावे आणि सा-या भारताला समृद्धीचा नवा मार्ग दाखवावा असे मला मनापासून वाटते.

ज्ञानदीप इन्फोटेकच्या प्रत्यक्ष अनुभवातऊन आणि गेली चार वर्षे अमेरिकातील भारतीयांच्या जीवनाचे परिक्षण करूनच मी माझे हे मत मांडत आहे. परदेशात जाऊन गाहणा-यांना दिसायला पगार मोठा वाटला तरी त्यातील बहुतेक वाटा कर, विमा आणि घरभाडे यात खर्च करावा लागतो. नोकरीची शास्वती नसते. दुय्यम नागरिकत्वाची वागणूक मिळते. स्थानिक लोकांच्या रोषाला केव्हा सामोरे जावे लागेल, पोलिसांच्या क्रूरतेला,  कोणा माथेफिरूच्या गोळ्यांची शिकार व्हावे लागेल हे सांगता येत नाही.

त्यामळे तेथेही विस्थपित अवस्थेत आपल्या समूहातच आयुष्य घालविण्यापेक्षा भारतात गरिबीत का असेना पण मानाने आणि सर्वांच्या लोभस आपलेपणाचा अनुभव घेत एकमेकांना आपली सुखदुःखे वाटत आपल्या भारतासाठी व सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी काम करणे त्यांना नक्कीच आवडेल. अनेक भारतीय भाषांत आपले सारे ज्ञानभांडार विखुरलेल्या स्वरुपात आज उपयोगाविना पडून आहे. बुद्धीमान व अनुभवी लोकांचा आणि शिक्षित महिलांची फार मोठी संख्या योग्य संधी व प्रशिक्षण न मिळाल्याने या क्षेत्राचा लाभ घेण्यावाचून वंचित आहे. हे सारे अत्यावश्यक काम बेरोजगार शिक्षित तरुणांकडून करून घेता येणे सहज शक्य आहे.

मात्र त्यासाठी सरकार, जनता आणि राजकीय नेते यांनी तसे वातावरण निर्माण करावयास हवे. सुदैवाने आता इंटरनेटच्या माध्यमातून जगातील कोणत्याही प्रकल्पात सहभागी होण्याची व आपले बुद्धीचातुर्य दाखवून भारताकडे संपत्तीचा ओघ वळविण्याचे सामर्थ्य प्रप्त झाल्यामुळे हे सहज शक्य आहे.

आपल्या सर्व जनतेला माहिती तंत्रज्ञानाची संजीवनी शिकविणे हे एकमेव उद्दीष्ट जरी परदेशी वास्तव्य असणा-या लोकांनी आपल्यापवढे ठेवले तरी मोठा बदल घडून य़ेईल. सर्व समाज जागृत व ज्ञानी झाला तर तो कोणत्याही जागतिक संकटांचा गोवर्धन पर्वत उचलू शकेल.

ज्ञानदीप फौंडेशनने याबाबतीत सर्व भारतीय छोट्या संस्था आणि तज्ज्ञ व्यक्ती यांचे नेटवर्क करून माहिती तंत्रज्ञानात शिक्षण व संशोधनातून स्वदेशी उद्योगांचा विकास करण्याचे आणि बहुराष्ट्रीय परदेशी कंपन्यांना सशक्त पर्याय निर्माण करण्याचे उत्तुंग ध्येय आपल्या नजरेपुढे ठेवले आहे. http://dnyandeep.net या वेबसाईटवर असे व्यासपीठ तयार केले असून विविध शैक्षणिक व संशोधन संस्थांशी परस्पर सहकार्य करार करण्यास ज्ञानदीपने सुरुवात केली आहे..

यात यश मिळणे दुरापास्त आहे याची फौंडेशनला खात्री आहे पण म्हणून प्रयत्नच करायचे नाहीत हे पटत नाही. आपला खारीचा वाटाही पुढे कोणाला तरी ते उद्दीष्ट गाठण्यास प्रवृत्त कराल असा दुर्दम्य विश्वास वाळगूनच मी संघर्ष करीत राहणार आहे . - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली.




 

Hits: 240
X

Right Click

No right click