जमशेटजी टाटा

Parent Category: मराठी उद्योग Category: उद्योजक आणि व्यावसायिक Written by सौ. शुभांगी रानडे

भारतात प्रचंड मोठ्या प्रमाणावर औद्योगिक साहस करणारे जमशेटजी हे पहिलेच उद्योगपती होते. औद्योगिक क्षेत्रात यशप्राप्तीसाठी जी कुशलता, जिद्द लागते ती संपादन करण्याच्या बाबतीत ते सर्वात वरच्या दर्जाचे होते. देशाला सामर्थ्यसंपन्न करण्यासाठी केवळ शेतीवर अवलंबून चालणार नाही हे त्यांना जाणीव होती आणि लोखंड व विद्युत उत्पादनाशिवाय पर्याय नाही अशी त्यांची धारणा होती. विद्युत उत्पादनासाठी टाटा हयड्रो इलेक्ट्रिकची स्थापना करण्याची सर्व प्राथमिक तयारी त्यांनी केली होती. तसेच भारतात कुशल वैज्ञानिक तयार व्हावेत व वैज्ञानिक संशोधनावर भर दिला जावा म्हणून बंगलोर येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापना करण्यासाठी लागणार्‍या रकमेची योजनाही त्यांनी तयार केली होती. केवळ तब्येतीची साथ मिळाली नाही. त्यांच्या मृत्यूनंतर जरी या दोन संस्था त्यांच्या मुलाने सुरू केल्या तरी त्यांचे बीज मात्र जमशेटजींनीच रोवले होते.

भारतातील प्रथम क्रमांकाचे उद्योगपती म्हणून नाव कमावण्यासाठी जमशेटजीना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. लहानणापासून तल्लख बुद्धिमत्ता व वाचनाची प्रचंड आवड यामुळे जमशेटजींनी आपले कॉलेजचे शिक्षण केवळ १८ व्या वर्षीच पूर्ण केले. जमशेटजींचे वडील चीनला कापूस व अफू पाठवीत असत व त्याबदल्यात चिनी वस्तू आयात करीत असत. त्यांनी चीनमधील ऑफिस चालविण्यासाठी १८ वर्षाच्या जमशेटजींची योजना केली. आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असलेल्या जमशेटजींनी ती जबाबदारी हसत स्वीकारली. इतकेच नव्हे तर शांघाय येथेही दुसरे ऑफिसही काढले. म्हणजे या वेळेपासूनच त्यांच्या अंगी असलेली धाडसी वृत्ती दिसून येते.

चीनमधील कामगिरी पार पाडून परत आल्यावर इंग्लंडमधील ऑफिस चालविण्यासाठी त्यांना पाठविले. तेथेही कापडगिरण्यांसाठी कापूस भारतातून पाठविला जाई. जमशेटजी इंग्लंडला जाईतो कापसाचे भाव खाली आल्यामुळे धंद्यात मंदी आली. देणेकरी दारात आले पण पोरसवदा जमशेटजी डगमगले नाहीत. त्यांची मनाची शांतता, विवेकबुद्धी व संकटावर मात कारण्यासठी लागणारी हुशारी या तीन गोष्टींच्या जोरावर ते आल्या प्रसंगातून सहजपणे पार पडले, एवढेच नव्हे तर त्यांच्या बोलण्यातील चतुराईमुळे देणेकर्‍यांचा जमशेटजींवरील विश्वास दुणावला. आपला प्रतिनिधी म्हणून देणेकर्‍यांनी जमशेटजींची एकमुखानेनिवड केली. यामुळे जमशेटजींचा आत्मविश्वास बळावला.

काही कालावधीनंतर भारतात परत आल्यावर त्यांनी एक बंद पडलेली तेलेगिरणी चालवायला घेत्तली. तिचे रूपांतर कापसाच्या गिरणीत करून तिला चांगल्या नावारूपास आणली. पूर्वी मुंबई अहमदाबाद या शहरातच कापडगिरण्या असायच्या. जमशेटजी इतरांपेक्षा वेगळ्या मार्गाने विचार करीत. त्यांनी मुंबईऎवजी नागपूरमध्ये कापडगिरणी काढण्याचे ठरविले. इंग्लंडमध्ये सुद्धा नसलेल्या कामगारकल्याण योजना अंमलात आणल्या. कामगारांसाठी सुरक्षा, मदतफंड, घरे, दवाखाना, पेन्शन इत्यादी महत्वाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. नागपूरसारख्या वेगळ्या गावात कापडगिरणी उभारून ती प्रचंड फायद्यात चालवून दाखविली.

जमशेटजींचे वैशिष्ट्य म्हणजे जुन्या आजारी गिरण्या ते धाडसाने विकत घेत असत. कुशल तंत्रज्ञ, सुधारित मशिनरी वापरून गिरणीचा दर्जा उंचावण्यास मदत करीत. यातून त्यांच्यातील धाडसी, कुशल उद्योगपतीचे गुण दिसून येतात. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळील ‘ताजमहाल’ हॉटेल पहिले म्हणजे जमशेटजींच्या सौंदर्यदृष्टीचे दर्शन होते. भारतात परदेशी लोक येतात, वाढ्त्या प्रमाणात यावेत, त्यांची जेवणखाणाची, राहण्याची अतिशय उत्तम व्यवस्था असावी असा विचार करून त्यांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे हे हॉटेल बांधले. जर्मनी, फ्रान्स येथून आणलेल्या उत्तमोत्तम प्रतीच्या मालाचा वापर करून या हॉटेलची उभारणी केली. जगात भारताची प्रतिमा उंचावली जावी या हेतूने ‘ताजमहाल’ हे हॉटेल बांधले गेले. १०० वर्षांपूर्वी बांधलेले हे हॉटेल अद्यावत सुविधांनी युक्त आहे. जमशेटजींची दूरदृष्टीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

केवळ एका उद्योगावर समाधान मानणे हे जमशेटजींच्या वृत्तीत बसणारे नव्हते. त्यासाठी त्यांनी म्हैसूर येथे जमीन खरेदी करून त्यावर तुतीची लागवड केली आणि रेशीम उत्पादनही सुरू केले. एका उद्योगापाठोपाठ दुसर्‍या उद्योगाचा त्यांचा आराखडा तयार असे. जमशेटजीना भारताला उद्योगप्रधान देश बनवायचे होते. त्यासाठी महत्वाचे म्हणजे लोखंडाचा उद्योग स्थापन केला पाहिजे या विचाराने त्यांना झपाटून टाकले. त्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. अनंत अडचणी आल्या. तरी खचून न जाता त्यांनी त्या सर्व अडचणींवर धैर्याने मात केली. एका जर्मन तंत्रज्ञाचा लेख त्यांच्या वाचनात आला. त्यानुसार भारतात लोखंड व कोळसा कोठे सापडू शकेल याचा त्यांनी शोध घेतला. अखेरीस त्यांच्या प्रयत्नांना यश आले. बंगाल प्रांतातील दुर्गापूर व साकची येथे लोखंड व कोळसा याचा मुबलक साठा सापडला.लोखंडाचा कारखाना तेथेच उभारायचे ठरले जमशेटजीच्या प्रयत्नांमुळे आकारास आलेल्या या वस्तीचे, शहराचे नावही जमशेटपूर असेच ठेवण्यात आले. जमशेटजींचे निधन १९०४ साली झाले तरी त्यांच्याप्रमाणेच कर्तृत्ववान असलेल्या त्यांच्या मुलाने - दोराबजी टाटा यांनी आपल्या वडिलांच्या महास्वप्नाला मूर्त रूप दिले. १९११ साली ‘टाटा आयर्न, स्टील कंपनी’ हा कारखाना उभारला गेला. त्याचबरोबर कामगारांसाठी घरे, शाळा, बाजार, हॉस्पिटल, रेल्वे लाईन, बस, पोस्ट ऑफिस इत्यादी सर्व सुविधाही केल्या गेल्या.

अशा थोर उद्योगपतींच्या चरित्रावरून प्रत्येकाला आळस झटकून सतत उद्योगी राहण्याची प्रेरणा मिळेल. कष्ट करण्याची तयारी, जिद्द हे गुण मुलांच्या अंगी उतरावेत यासाठी पालकही प्रयत्नशील राहतील.

Hits: 184
X

Right Click

No right click