अकौंटिंग भाग १ - डेबिट का क्रेडिट? हाच प्रश्न !

Parent Category: मराठी उद्योग Category: उद्योग Written by सौ. शुभांगी रानडे
लहानपणी शाळेत असताना जमाखर्चाची गणिते सोडविताना अकौंटिंगची थोडीफार ओळख झाली होती. मात्र अकौंटिंगमधील डेबिट व क्रेडिट या शब्दांचा जमाखर्च संकल्पनेशी मेळ घालताना माझा हमखास गोंधळ उडायचा.  डेबिट म्हणजे खर्च आणि क्रेडिट म्हणजे जमा असे माझ्या मनात पक्के बसले होते. मात्र ते तसे नसते असे ऎकले की काहीच  कळेनासे व्हायचे. त्यामुळे अकौंटिंग व टॅली सॉफ्टवेअर मला नेहमीच अगम्य वाटत होते. अकौंटिंग व इन्व्हेंटरीचे सॉफ्टवेअर करण्याविषयी विचारणा झाली त्यावेळी असले अवघड काम अंगावर घेऊ नये असेच वाटत होते. पण  विचार केला की यानिमित्ताने का होईना आपल्याला  अकौंटिंगचा अभ्यास करावाच लागेल आणि मग डेबिट का क्रेडिट ह्या  अनिर्णित प्रश्नाचे उत्तर आपल्याला शोधता येईल. मग अकौंटिंग व इन्व्हेंटरीच्या अत्यंत महत्वाच्या क्षेत्रातही ज्ञानदीपला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या संधी मिळू शकतील. सांगलीतील युनिव्हर्सल कंट्रोल्स या उद्योगासाठी असे सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम आम्ही स्वीकारले.

यापूर्वी फॉक्सप्रो, व्हीबीमध्ये अशी काही सॉफ्टवेअर आम्ही केली होती त्यावेळीही अकौंटिंगमधील काही रिपोर्ट तयार केले होते. मात्र त्यावेळी आम्ही त्या क्षेत्रातील माहितगार व्यक्तींचे साहाय्य घेतले होते. आता मात्र आपणच हे सर्व शिकायचे व करायचे असा संकल्प केला.

अकौंटिंगची पुस्तके व नेटवरील माहिती वाचल्यावर मला यातील बारकावे लक्षात येऊ लागले. त्याचीच माहिती मी टप्प्याटप्प्याने देणार आहे. यात काही चुका असल्यास या क्षेत्रातील तज्ज्ञांनी त्या मला कळवाव्यात ही विनंती.


  घरातील जमाखर्च लिहिताना आपण जमा रकमा एका बाजूला व खर्च रकमा दुसर्‍या बाजूला लिहितो व एकूण जमा रकमेतून एकूण खर्च वजा करून राहिलेली रक्कम शिल्लक रक्कम म्हणून दाखवितो. येथे प्रत्येक व्यवहार एकतर जमा अथवा खर्च असा लिहिला जातो. या पद्धतीला सिंगल एन्ट्री पद्धत म्हणतात.

अकौंटिंगमध्ये डबल एन्ट्री पद्धत वापरली जाते. यात खरेदी वा विक्रीच्य़ा प्रत्येक व्यवहाराची नोंद दोन खात्यात डेबिट व क्रेडिट या नावाने केली जाते. उधारीवर झालेल्या व्यवहारांचीही नोंद या पद्धतीत होत असल्याने उद्योगधंद्याचे अकौंटिंग करण्यासाठी अशा डबल एन्ट्री पद्धतीचा वापर करणे श्रेयस्कर ठरते.
उद्योगात वस्तूंची खरेदी-विक्री वा सेवा देणे-घेणे यांचा समावेश होतो. हे व्यवहार रोखीने वा उधारीवर होऊ शकतात.

विक्री -  रोख विक्री केल्यावर पैसा रोख वा चेकच्या स्वरुपात उद्योगात येतो. याची नोंद कॅश ला डेबिट तर विक्रीला क्रेडिट अशी केली जाते.
उदाहरणार्थ  ५०० रुपयांचा माल विकला तर कॅशला डेबिट ५०० रुपये व विक्री खात्याला क्रेडिटला ५०० रुपये अशी नोंद केली जाते.

मात्र  उधारीवर विक्री केल्यास ज्याला माल विकला त्याच्या नावे डेबिटला ५०० रुपये  व विक्री खात्याला क्रेडिटला ५०० रुपये अशी नोंद केली जाते. म्हणजे ज्याला माल उधारीवर विकला त्याच्याकडून ५०० रुपये येणे आहे हे कळते.

खरेदी -  रोख वा चेकच्या स्वरुपात पैसे देऊन वस्तू खरेदी केल्यास ( विकत घेतल्यास ) उद्योगातील पएसा बाहेर जातो म्हणून   याची नोंद कॅश ला क्रेडिट तर खरेदी खात्याला  डेबिट  अशी केली जाते.
उदाहरणार्थ  ५०० रुपयांचा माल खरेदी केला तर कॅशला क्रेडिट ५०० रुपये व खरेदी खात्याला डेबिटला ५०० रुपये अशी नोंद केली जाते.

मात्र ही खरेदी उधारीवर  केल्यास ज्याच्याकडून खरेदी केली   त्याच्या नावे क्रेडिटला ५०० रुपये  व खरेदी खात्याला डेबिटला ५०० रुपये अशी नोंद केली जाते. म्हणजे ज्याच्याकडून खरेदी त्याला ५०० रुपये देणे आहे हे कळते.

खरेदी विक्री व्यवहारात डेबिट व क्रेडिट यांचा वापर कसा करायचा हे समजल्यावर मला अकौंटिंग शिकण्यातील पहिला टप्पा पार केल्याचे समाधान मिळाले व पुढे शिकण्यास हुरूप आला.
Hits: 109
X

Right Click

No right click