तुकारामाचे अभंग ११-२०
विसरले कुळ आपुला आचार । पती भावे दीर घर सोय ॥१॥
सांडिला लौकिक लाज भय चिंता । रातलें अनंता चित्त माझें ॥२॥
मज आतां कोणी आळवाल झणी । तुका म्हणे कानीं बहिरी जालें ॥३॥
-------------- ११
न देखें न बोलें नाइकें आणीक । बैसला हा एक हरि चित्तीं ॥१॥
सासुरें माहेर मज नाहीं कोणी । एक केलें दोन्ही मिळोनियां ॥२॥
आळ आला होता आम्ही भांडखोरी । तुका म्हणे खरी केली मात ॥३॥
--------------१२
दुजा ऐंसा कोण बळी आहे आतां । हरि या अनंता पासूनिया ॥१॥
बळियाच्या आम्ही जालों बळिवंता । करूं सर्व सत्ता सर्वांवरी ॥२॥
तुका म्हणे आम्ही जिवाच्या उदारा । जालों प्रीतिकरा गोविंदासी ॥३॥
--------------१३
क्षणभरी आम्ही सोसिलें वाईट । साधिलें अवीट निजसुख ॥१॥
सांडी मांडी मागें केल्या भरोवरी । अधिक चि परी दुःखाचिया ॥२॥
तुका म्हणे येणें जाणें नाहीं आतां । राहिलों अनंताचिये पायीं ॥३॥
--------------१४
आम्हां आम्ही आतां वडील धाकुटीं । नाहीं पाठीं पोटीं कोणी दुजें ॥१॥
फावला एकांत एकविध भाव । हरि आम्हांसवें सर्व भोगी ॥२॥
तुका म्हणे अंगसंग एके ठायीं । असों जेथें नाहीं दुजें कोणी ॥३॥
------------१५
सर्व सुख आम्ही भोगूं सर्व काळ । तोडियेलें जाळ मोहपाश ॥१॥
याचसाठी सांडियेले भरतार । रातलों या परपुरुषाशीं ॥२॥
तुका म्हणे आतां गर्भ नये धरूं । औषध जें करूं फळ नव्हे ॥३॥
-----------१६
एका जिवें आतां जिणें जालें दोहीं । वेगळीक कांहीं नव्हे आतां ॥१॥
नारायणा आम्हां नाहीं वेगळीक । पुरविली हे भाक सांभाळिली ॥२॥
तुका म्हणे जालें सायासाचें फळ । सरली ते वेळ काळ दोन्ही ॥३॥
---------१७
हासों रुसों आतां वाढवूं आवडी । अंतरींची गोडी अवीट ते ॥१॥
सेवासुखें करूं विनोदवचन । आम्ही नारायण एकाएकीं ॥२॥
तुका म्हणे आम्ही जालों उदासीन । आपुल्या आधीन केला पति ॥३॥
-----------१८
मजसवें आतां येऊं नका कोणी । सासुरवासिनी बाइयानो ॥१॥
न साहवे तुम्हां या जनाची कूट । बोलती वाईट ओखटें तें ॥२॥
तुका म्हणे जालों उदास मोकळ्या । विचरों गोवळ्यासवें आम्ही ॥३॥
----------१९
शिकविलें तुम्हीं तें राहे तोंवरी । मज आणि हरी वियोग तों ॥१॥
प्रसंगीं या नाहीं देहाची भावना । तेथें या वचना कोण मानी ॥२॥
तुका म्हणे चित्तीं बैसला अनंत । दिसों नेदी नित्य अनित्य तें ॥३॥
Hits: 756