मार्गशीर्ष

Parent Category: मराठी संस्कृती Category: मराठी सण Written by सौ. शुभांगी रानडे
दत्त जयंती
श्री. दत्तात्रय हे अत्रीऋषी व माता अनुसया यांचे पुत्र होय. तीन तोंडे, सहा हात, दोन पाय, चतुर्वेद दर्शक, चार श्वान व जवळ कामधेनु (गोमाता) असे असलेले श्री. दत्तगुरू हे बह्मा, विष्णु, महेश यांचे अंश होय. श्री. गुरूदेव दत्त हे हिदु धर्मातील पहिले गुरू होय. हिंदु धर्माचा प्रसार करण्याच्या उद्देशाने दत्तात्रयांनी भारत भम्रण केले ठिकठिकाणी त्यांची स्थाने (गादी) निर्माण करून गुरू परंपरा चालू ठेवली.
आपल्या शिष्यामार्फत दीनदलितांची सेवा व समाजातील दु:ख व अज्ञान दूर करण्याचे कार्य चालू ठेवले. त्यांच्या पश्चात श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती व वासुदेवानंद सरस्वती हे त्यांचे अवतार मानण्यात येतात. दत्ताची स्थाने महाराष्ट्नत प्रयाग, औदुंबर, गाणगापुर, माहुर, नृसिंहवाडी आदि आहेत. दत्तांच्या कार्यावर लिहिलेले गुरूचरित्र हा ग्रंथ संपूर्ण देशात प्रसिध्द आहे. मोठ्या भक्तिभावाने वाचला जातो.

चंपाषष्टी

मार्गशीर्ष महिन्यात येणारे हे नवरात्र देवीच्या नवरात्रासारखेच असते. श्रीमहादेवाच्या मल्हारी मार्तंड हा एक अवतार होय.

पुण्याजवळ असलेले जेजुरी ह्या गावी मल्हारी देवस्थान आहे. कृत युगात मणी व मल्ल या राक्षसांना ब्रह्म देवाने, ``तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही'' हा वर दिला त्यामुळे ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले व ऋषीमुनी करीत असलेल्या तपश्चर्येला अडथळा आणून तेथे विध्वंस करू लागले. ऋषीमुनींनी अखेर कंटाळून देवांकडे मदत मागितली.

भगवान शंकर त्यांचे म्हणणे ऐकून संतप्त झाले. त्यांनी मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपल्या ७ कोटी (येळकोट) सैन्य घेऊन व कार्तिकेयासह ते मणि मल्ल राक्षसांवर चालून गेले. दोन्ही पक्षात प्रचंड युध्द होऊन अखेर मार्तंड भैरवांनी मणी राक्षसाला त्याची छाती फोडून त्याला जमिनदोस्त केले. मणी राक्षसाने शरण येऊन ``माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे व माझे अश्वारूढ रूपही तुझ्या शेजारी राहावे'' अशी इच्छा व्यक्त केली. भगवान शंकरांनी तथास्तु म्हटले.

नंतर मार्तंड भैरवांनी मल्ल राक्षसाचा पराभव केला तेव्हा त्याचे शरण जाऊन ``तुमच्या नांवाआधी माझे नांव जोडले जावे अशी मागणी केली.'' तथास्तु म्हणून मार्तंड भैरवाने मान्य केले. तेंव्हापासून त्यांना मल्हारी (मल्ल+अरी) मार्तंड असे म्हणण्यात येते. हा विशेषत: धनगराचा देव मानला जातो. अतिशय जागृत देव आहे. मुख्य भंडारा म्हणून हळद उधळली जाते; ज्वारीचा रोडगा व भरीत हा त्यांचा प्रसाद असतो.

गीता जयंती :-


पाच हजार वर्षापूर्वी मार्गशीर्ष शुध्द एकादशीला मंगल सुप्रभाती कुरूक्षेत्राच्या रणभूमीवर योगेश्वर श्रीकृष्णाने जीवनाचा दिव्य संदेश, महान विचार दिला. योगेश्वरांच्या त्या ज्ञान प्रवाहातून भारताला गीतेसारखा अव्दितीय अमोल ग्रंथ लाभला.

गीता ही व्यासांची मुख्य शिकवण आणि त्यांच्या मननाची संपूर्ण साठवण आहे. प्राचीन काळापासून गीतेला उपनिषद ही पदवी मिळाली आहे. आपल्याला विद्या प्राप्त करावयाची असेल तर विनम्रता, जिज्ञासा आणि सेवावृत्ती या तीन गोष्टींचे जतन केले पाहिजे असा जीवनाला दृष्टी देणारा संदेश गीतेने जगाला दिला आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी गीतेसंबंधी असे भाष्य केले आहे कि भगवतगीता हा ताटिबक प्रबंध नसून तो एक धार्मिक ग्रंथ आहे. त्यात सत्याचे सम्यक दर्शन घडते इतकेच नव्हे तर मानवधर्माचे त्रिकालाबाधित स्वरूपही कळते.

 

 

Hits: 563
X

Right Click

No right click