श्रावण

Parent Category: मराठी संस्कृती Category: मराठी सण Written by सौ. शुभांगी रानडे
श्रावण महिन्यातील पहिलामहत्वाचा सण नागपंचमी हा आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करतात. हा सण वेदकालापासून सुरू झाला.

भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षीत वर आले तो दिवस श्रावण शुध्द पंचमी होता. तेव्हांपासून नागपूजा प्रचारात आली असे म्हणतात. या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरीपण कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही, हे नियम पाळत असतात. नागदेवता ची पूजा करून त्याला दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवतात. व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात.

रक्षाबंधन

श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण येतो. त्याला राखी पौर्णिमा असे म्हणतात. बहीण भावाच्या अतूट प्रेमाचा हा सण असून बहिणी भावास राखी बांधतात व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे.

इंद्राच्या राणीने आपल्या मनगटावर एक धागा बांधला होता. ज्याच्या सामर्थ्याने वज्रानुसार राक्षसाचा पराभव केला. तेव्हापासून त्याची स्मृती म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पध्दत आहे. तसेच ऐतिहासिक काळात चित्तोडच्या राणी कर्मवतीने हुमाँयू बादशहाला राखी पाठवली व हुमाँयू बादशहाने पण आपल्या या बहिणीचे परकीय आक्रमणापासून संरक्षण केले.

राखी बांधण्याचा अर्थ आपण त्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वत:ला वाहून घेऊन तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वकारतो. राखी बंधनाच्या या सणातून मित्रत्व, स्नेह व परस्पर प्रेम वृध्दिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे.

पोळा

आपला भारत देश हा शेती प्रधान देश असल्यामुळे पोळा हा बैलांचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. आपल्याला शेती करताना बैल अत्यंत महत्वाचा उपयोगी प्राणी असून नांगरणे, वखरणे, मळणी वगैरे सर्व गोष्टी बैलाच्या मदतीनेच करतात. श्रावण वद्य अमावस्येला हा सण साजरा करण्यात येतो. या दिवशी बैलाला न्हाऊ माखू घालून सजवतात व त्याची पूजा करतात. त्याच्या साठी मुद्दाम गोडाचे जेवण तयार करतात व वाजत गाजत त्याची मिरवणूकही काढतात.

आपल्या साठी सदैव कष्ट करणाऱ्या या मुक्या प्राण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण केला जातो.

Hits: 579
X

Right Click

No right click