शुद्धलेखनाचे इतर नियम
नियम ५:
५.१ मराठीतील तत्सम इ-कारान्त आणि उ-कारान्त शब्द दीर्घान्त लिहावेत. उदाहरणार्थ: कवि = कवी, बुद्धि = बुद्धी, गति = गती. इतर शब्दांच्या अंती येणारा इकार व उकार दीर्घ लिहावा.
उदाहरणार्थ: पाटी, जादू, पैलू.
५.२ 'परंतु, यथामति, तथापि' ही तत्सम अव्यये ऱ्हस्वान्त लिहावीत.
५.३ व्यक्तिनामे, ग्रंथनामे, शीर्षके व सुटे ऱ्हस्वान्त तत्सम शब्द मराठीत दीर्घान्त लिहावेत. उदाहरणार्थ: हरी, मनुस्मृती, वर्गीकरण पद्धती, कुलगुरू.
५.४ 'आणि' व 'नि' ही मराठीतील दोन अव्यये ऱ्हस्वान्त लिहावीत.
५.५ सामासिक शब्द लिहिताना समासाचे पूर्वपद (पहिला शब्द) तत्सम ऱ्हस्वान्त शब्द असेल (म्हणजेच मुळात संस्कृतात ऱ्हस्वान्त असेल) तर ते पूर्वपद ऱ्हस्वान्तच लिहावे. दीर्घान्त असेल तर ते दीर्घान्तच लिहावे. उदाहरणार्थ: बुद्धि - बुद्धिवैभव; लक्ष्मी - लक्ष्मीपुत्र.
५.६ 'विद्यार्थिन्, गुणिन्, प्राणिन्, पक्षिन्' यांसारखे इन्-अन्त शब्द मराठीत येतात तेव्हा त्यांच्या शेवटी असलेल्या 'न्' चा लोप होतो व उपान्त्य ऱ्हस्व अक्षर दीर्घ होते. परंतु हे शब्द समासात पूर्वपदी आले असता (म्हणजेच समासातील पहिला शब्द असता) ते ऱ्हस्वान्तच लिहावेत. उदाहरणार्थ: विद्यार्थिमंडळ, गुणिजन, प्राणिसंग्रह, स्वामिभक्ती, मंत्रिगण, पक्षिमित्र, योगिराज, शशिकांत.
नियम ६: मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्यातील उपान्त्य इकार किंवा उकार ऱ्हस्व असतो. उदाहरणार्थ: किडा, विळी, पिसू, मारुती, सुरू, हुतूतू. तत्सम शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असले तरी त्यातील उपान्त्य इकार आणि उकार मूळ संस्कृतातल्याप्रमाणे ऱ्हस्व किंवा दीर्घ ठेवावा. उदाहरणार्थ: नीती, अतिथी, प्रीती, गुरू, शिशू, समिती.
नियम ७:
७.१ मराठी अ-कारान्त शब्दांतील इकार व उकार दीर्घ लिहावेत. उदाहरणार्थ: गरीब, वकील, सून, फूल, बहीण, खीर, तूप. तत्सम शब्दातील शेवटले अक्षर अ-कारान्त असले तरी त्यातील उपान्त्य इकार किंवा उकार मूळ संस्कृतातल्याप्रमाणे ऱ्हस्व किंवा दीर्घ ठेवावा. उदाहरणार्थ: गुण, गीत, विष, शरीर, रसिक, शूर, शून्य, कौतुक.
७.२ मराठी शब्दांतील जोडाक्षरापूर्वी इकार व उकार सामान्यतः ऱ्हस्व असतात.उदाहरणार्थ: कुस्ती, मुक्काम, पुष्कळ, शिस्त, दुष्काळ, पुस्तक.मात्र तत्सम शब्दांतील जोडाक्षरांपूर्वीचे इकार व उकार ऱ्हस्व व दीर्घ अशा दोन्ही प्रकारांनी आढळतात. ते मूळ संस्कृतप्रमाणेच लिहावेत. उदाहरणार्थ: मित्र, पुण्य, तीक्ष्ण, पूज्य, चरित्र, प्रतीक्षा. मराठी व तत्सम शब्दांतील इकारयुक्त व उकारयुक्त अक्षरांवर अनुस्वार असल्यास ती अक्षरे सामान्यतः ऱ्हस्व असतात. उदाहरणार्थ: चिंच, लिंबू, तुरुंग, उंच, लिंग, बिंदू, अरविंद, अरुंधती. मराठी व तत्सम शब्दांतील विसर्गापूर्वीचे इकार व उकार सामान्यतः ऱ्हस्व असतात. उदारणार्थ: छिः, थुः, दुःख, निःशस्त्र.
नियम ८:
८.१उपान्त्य दीर्घ ई-ऊ असलेल्या मराठी शब्दांचा उपान्त्य ई-कार किंवा ऊ-कार उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी ऱ्हस्व लिहावा.
उदाहरणार्थः गरीब - गरिबाला; चूल - चुलीला, चुलींना; अपवाद - दीर्घोपान्त्य तत्सम शब्द. उदाहरणार्थ: परीक्षा - परीक्षेला, परीक्षांना; दूत - दूताला, दूतांना.
८.२ मराठी शब्द तीन अक्षरी असून त्याचे पहिले अक्षर दीर्घ असेल तर अशा शब्दाच्या सामान्यरूपात उपान्त्य ई-ऊ यांच्या जागी 'अ' आल्याचे दिसते. उदाहरणार्थ: बेरीज - बेरजेला; लाकूड - लाकडाला, लाकडांना. मात्र पहिले अक्षर ऱ्हस्व असल्यास हा 'अ' आदेश विकल्पाने होतो. उदाहरणार्थ: परीट - पर(रि)टास, पर(रि)टांना.
८.३ शब्दाचे उपान्त्य अक्षर 'ई' किंवा 'ऊ' असेल तर अशा शब्दाच्या उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी 'ई'च्या जागती 'य', आणि 'ऊ'च्या जागी 'व' असे आदेश होतात. उदाहरणार्थ: फाईल - फायलीला, कायलींना; देऊळ -देवळाला, देवळांना.
८.४ पुल्लिंगी शब्दांच्या शेवटी 'सा' असल्यास त्या जागी उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी 'शा' होतो. ('श्या' होत नाही.) उदाहरणार्थ: घसा-घशाला, घशांना; ससा-सशाला, सशांना. ८.५ पुल्लिंगी शब्दांच्या शेवटी 'जा' असल्यास उभयवचनी सामान्यरूपात तो तसाच राहतो (त्याचा 'ज्या' होत नाही). उदाहरणार्थ: दरवाजा - दरवाजाला, दरवाजांना; मोजा -मोजाला, मोजांना.
८.६ तीन अक्षरी शब्दातील मधले अक्षर 'क' चे किंवा 'प'चे द्वित्व असेल तर उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी हे द्वित्व नाहीसे होते. उदाहरणार्थ: रक्कम - रकमेला, रकमांना; छप्पर - छपराला, छपरांना.
८.७ मधल्या 'म'पूर्वीचे अनुस्वारसहित अक्षर उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी अनुस्वारविरहित होते. उदाहरणार्थ: किंमत - किमतीला, किमतींना; गंमत -गमतींना, गमतींचा.
८.८ ऊ-कारान्त विशेषनामाचे हे सामान्यरूप होत नाही. उदाहरणार्थ: गणू - गणूस, दिनू - दिनूस.
८.९ धातूला 'ऊ' आणि 'ऊन' प्रत्यय लावताना शेवटी 'व' असेल तरच 'वू' आणि 'वून' अशी रूप तयार होतात, पण धातूच्या शेवटी 'व' नसेल तर 'ऊ' आणि 'ऊन' अशी रूपे तयार होतात. उदाहरणार्थ: धाव - धावू, धावून; ठेव - ठेवू, ठेवून; गा - गाऊ, गाऊन; धू- धुऊ, धुऊन; कर - करू, करून; हस - हसू, हसवून.
नियम ९ : पूर हा ग्रामवाचक शब्द कोणत्याही ग्रामनामास लावताना यातील 'पू' दीर्घ लिहावा. उदाहरणार्थ: नागपूर, तारापूर, सोलापूर.
नियम १०: 'कोणता, एखादा' ही रूपे लिहावीत. 'कोणचा, एकादा' ही रूपे लिहू नयेत.
नियम ११: 'हळूहळू, चिरीमिरी' यांसारख्या पुनरुक्त शब्दांतील दुसरे व चौथे ही अक्षरे दीर्घान्त लिहावीत. परंतु यांसारखे पुनरुक्त शब्द नादानुकारी असतील तर ते उच्चाराप्रमाणे ऱ्हस्व लिहावेत. उदाहरणार्थ: लुटुलुटु, दुडुदुडु, रुणुझुणु.
नियम १२: एकारान्त सामान्यरूप या-कारान्त करावे. उदाहरणार्थ: करणे - करण्यासाठी; फडके - फडक्यांना. अशा रूपांऐवजी 'करणेसाठी, फडकेंना' अशी एकारान्त सामान्यरूपे करू नयेत.
नियम १३: लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते. त्या वेळी तिचे स्वरूप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे अनुस्वारयुक्त असावे. उदाहरणार्थ: असं केलं; मी म्हटलं, त्यांनी सांगितलं. अन्य प्रसंगी ही रूपे ए-कारान्त लिहावीत. उदाहरणार्थ: असे केले; मी म्हटले; त्यांनी सांगितले.
नियम १४: 'क्वचित्, कदाचित्, अर्थात्, अकस्मात्, विद्वान्' यांसारखे मराठीत रूढ झालेले तत्सम शब्द व्यंजनान्त (म्हणजेच पायमोडके) न लिहिता 'क्वचित, कदाचित, अर्थात, अकस्मात, विद्वान' याप्रमाणे अ-कारान्त लिहावेत. कोणत्याही अन्य भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या भाषेतील उच्चाराप्रमाणे लेखन करावे. इंग्रजी शब्द, पदव्या किंवा त्यांचे संक्षेप यांच्या शेवटचे अ-कारान्त अक्षर आता व्यंजनान्त (म्हणजेच पायमोडके) लिहू नये.
नियम १५: केशवसुतपूर्वकालीन पद्य व विष्णुशास्त्री चिपळूणकरपूर्वकालीन गद्य यांतील उतारे छापताना ते मुळानुसार छापावेत. तदनंतरचे (केशवसुत व चिपळूणकर यांच्या लेखनासह) मराठी साहित्य महामंडळाच्या प्रस्तुत लेखनविषयक नियमांस अनुसरून छापावे.
नियम १६: 'राहणे, पाहणे, वाहणे' अशी रूपे वापरावीत. 'रहाणे, राहाणे; पहाणे, पाहाणे; वहाणे, वाहाणे' अशी रूपे वापरू नयेत. आज्ञार्थी प्रयोग करताना मात्र 'राहा, पाहा, वाहा' यांबरोबरच 'रहा, पहा, वहा' अशी रूपे वापरण्यास हरकत नाही.
नियम १७: 'ही' हे अव्यय तसेच 'आदी' व 'इत्यादी' ही विशेषणे दीर्घान्तच लिहावीत.
नियम १८: पद्यात वृत्ताचे बंधन पाळताना ऱ्हस्व-दीर्घाच्या बाबतीत हे नियम काटेकोरपणे पाळता येणे शक्य नसल्यास कवीला तेवढ्यापुरते स्वातंत्र्य असावे.
Hits: 950