महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, पुणे
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था
संदर्भ - https://granthottejak.org पत्ता - ११३३, सदाशिव पेठ, खुन्या मुरलीधर मंदीराजवळ, टि.म.वि. समोर,
पुणे - ४११०३०,
०२०-२४४७२२८०,
This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
पुण्यातील महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था गेली १२३ वर्षे उत्कृष्ट मराठी ग्रंथांना पुरस्कार देऊन उत्तेजन देण्याचे कार्य करीत आहे. ही संस्था महाराष्ट्रातील सर्वांत जुनी साहित्य संस्था आहे. आधुनिक महाराष्ट्राचे आद्य प्रवर्तक न्या. महादेव गोविंद रानडे, जागतिक कीर्तीचे संस्कृत पंडित डॉ. सर रामकृष्ण भांडारकर, प्रसिद्ध कादंबरीकार हरि नरायण आपटे, भारतीय अशांततेचे जनक लो. बाळ गंगाधर टिळक इत्यादी पंचवीस द्रष्ट्या महाराष्ट्रीय समाजधुरीणांनी ही संस्था इ. स. १८९४ मध्ये २९ ऑक्टोबर रोजी स्थापन केली. मराठी भाषेच्या आणि साहित्याच्या अभ्युदयासाठी कार्य करण्याचे उद्दिष्ट त्यामागे होते. त्यावेळी संस्थेचे नाव ठेवले डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी.
पेशवे सरकार दरवर्षी चातुर्मासात विद्वानांना दक्षिणा देत असे. त्यात वैदिक विद्वान, इतर पंथीय विद्वान आणि अन्य धर्मातील पंडितांचा समावेश असे. इंग्रजी राज्य सुरू झाल्यावर लॉर्ड एल्फिन्स्टन या पहिल्या गव्हर्नरने ही प्रथा पुढे चालू ठेवली. त्यानंतर तत्कालीन मुंबई सरकारने दक्षिणा फंड म्हणून सरकारात स्वतंत्र निधी ठेवला. त्यातून शिक्षणास उत्तेजन व मराठी ग्रंथास पुरस्कार मिळू लागला. योग्य ग्रंथाची शिफारस करण्यासाठी सरकारने इ. स. १८५१ मध्ये दक्षिणा प्राईझ कमिटी या नावाची एक समिती स्थापन केली.
इ. स. १८९४ मध्ये संस्था स्थापन झाल्यावर पुढील वर्षीच म्हणजे १८९५ मध्ये सरकारच्या दक्षिणा प्राईझ कमिटीचे सर्व काम संस्थेकडे आले. इ. स. १८८७ पासून कमिटीकडे आलेली १०२ पुस्तकेही त्यावेळी संस्थेकडे पारितोषिकाच्या शिफारसीसाठी सुपूर्त करण्यात आली. तेव्हापासून मुंबई सरकार मराठी ग्रंथांना पुरस्कार देत असे, त्याची शिफारस करण्याचे काम संस्थेकडे आले.
इ. स. १९४८ मध्ये संस्थेचे इंग्रजी नाव बदलून ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था’ असे मराठी नामकरण करावे, असा ठराव संस्थेने मंजूर केला आणि त्यानुसार मराठी नावाचा व्यवहारात वापर सुरू झाला.
संस्थेकडे असलेला अमूल्य वाङ्मयीन ठेवा
- सन १८९४ पासूनची मराठी ग्रंथांची विद्वानांनी केलेली परीक्षणे
- शंभर वर्षांपूर्वीपासूनचे जुने, दुर्मीळ ग्रंथ; एकूण ग्रंथसंख्या ६००० पेक्षा अधिक
- पेशवे दप्तर: शाहू महाराज गादीवर आले तेव्हापासून खडकीच्या लढाईपर्यंत म्हणजे सुमारे ११० वर्षांचा मराठेशाहीचा इतिहास यांत पाहावयास मिळतो. या काळात महाराष्ट्रात सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक स्थिती कशी होती, लोकांची करमणूकीची साधने कोणती होती, राज्यव्यवस्था कशी होती, शेतसा-याची आकारणी व वसूली कशी होत असे, मिठावरील कराविषयी माहिती, सरकार कर्ज कसे काढी व कसे फेडी, दिवाणी व फौजदारी खटले कसे चालत, पोलीस, टपाल, टांकसाळ, धर्मादाय, सडका, औषधोपचार वगैरेची व्यवस्था कशी होती, यांविषयी बरीच व विश्वसनीय माहिती या दप्तरांत मिळते.
- पेशवे रोजनिशा
- न्यायमूर्ती रानडे यांचा पत्रव्यवहार
- सन १८२५ पासून प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांची १८९६ - ९७ मध्ये तयार केलेली हस्तलिखित ग्रंथसूचि
- ३२ प्रकारचे कोश, जुन्या पोथ्या
- विविध विषयांवरील ३० अभ्यासपूर्ण प्रबंध (हस्तलिखित स्वरूपात)
- शंभर वर्षापूर्वीचे काही हस्तलिखित ग्रंथ
संस्थेचे कार्य
- मराठी भाषेत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचे परीक्षण करून उत्कृष्ट पुस्तकांना पारितोषिक देऊन त्या पुस्तकांच्या लेखकांना प्रोत्साहित केले. पारितोषिकांसाठी ग्रंथ निवडताना स्वतंत्र आणि नवीन विचार, तर्कशुद्ध मांडणी, प्रौढ भाषा इ. निकषांचा विचार केला जातो.
-
जुन्या दुर्मीळ कागदपत्रांचे जतन: या कार्यासाठी शासनाकडून आतापर्यंत एक लाख रूपये अनुदान मिळाले असून त्यातून न्या. रानडे यांचा पत्रव्यवहार व अन्य महत्त्वाची कागदपत्रे लॅमिनेशन करून ठेवली आहेत.
मराठी भाषेविषयी मराठी मुलांतच अज्ञान दिसून येते. हे लक्षात घेऊन मराठी मुलांना मराठी भाषेची ओळख व्हावी, भाषा शुद्ध बोलता व लिहिता यावी यासाठी दरमहा संस्थेतर्फे ‘भाषा-पत्र’ प्रसिद्ध करण्यात येत होते. हीच मासिक भाषापत्रे एकत्र करून संस्थेने त्यांची एक पुस्तिका प्रसिद्ध केली आहे.
पुण्यातील वनाझ कंपनीचे पूर्वीचे मालक कै. सं. कै. खांडेकर यांच्याकडून जिल्हाधिकारी, पुणे यांच्यामार्फत संस्थेने दहा हजार चौरस फूट जमीन देणगीच्या स्वरूपात मिळवली असून त्या व्यवहारावर शासनाचे शिक्कामोर्तब झाले आहे.
सन १८२५ ते सन १९२५ या कालावधीत मराठी भाषेत प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांची विषयानुक्रमाने संगतवार यादी संस्थेने केली आहे.
संस्थेने १९५१-५२ साली ग्रंथ प्रकाशनाची नवीन योजना तयार केली. त्यानुसार डॉ. ग. वा. तगारे यांचे ‘पातंजल योगशास्त्र’ हे प्रथम प्रकाशित केले.
सन १९७३ पासून दक्षिणा पारितोषिक प्रबंध स्पर्धा संस्थेने सुरू केली. या योजनेतून आतापर्यंत ३० प्रबंध संस्थेच्या संग्रही जमा झाले आहेत.
संस्थेच्या कार्यास ज्ञानदीप फौंडेशनच्या शुभेच्छा.
Hits: 259