अक्षरपत्रे - ज्ञानदीपचा नवा उपक्रम
स्वहस्ताक्षरात लिहिलेले पत्र आजकाळ दुर्मिळ झाले आहे. या पत्रात अक्षरांबरोबर चित्रेही काढता येतात व पत्र सजविता येते. अक्षर लेखनाचीही सवय होते. पण यापेक्षाही एक मोठा फायदा म्हणजे अशा स्वलिखित पत्रात मजकुराबरोबरच लेखकाच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटलेला असतो. व त्यामुळे असे पत्र हा एक जतन करण्यासारखा ठेवा बनतो.
साध्या कार्डावर वा कागदावर लिहिलेली पत्रे स्कॅन करून प्रसिद्ध करण्याचे ज्ञानदीपने ठरविले आहे. त्यास वाचक प्रतिसाद देतील अशी आशा आहे. ज्यांना कॉम्प्युटरवर टाईप करण्यास येत नाही वा स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिण्याची सवय आहे अशा सर्वांसाठी आपले विचार व्यक्त करण्यासाठी हे सदर ज्ञानदीपच्या मायमराठी, मायमांगली, मायकोल्हापूर, विज्ञान, स्कूल फॉर ऑल, आणि संस्कृतदीपिका या वेबसाईटवर सुरू करण्यात येणार आहे.
आपल्या पत्रात मायना वगळून फक्त मजकूर शीर्षकासह द्यावा व आपले नाव लिहून पत्र पोष्टाने, प्रत्यक्ष वा स्कॅन करून ज्ञानदीपकडे पाठवावे. पत्राच्या मागल्या बाजूस आपली सही व पूर्ण पत्ता द्यावा. विषयानुसार व विषयाच्या व्याप्तीनुसार अशी पत्रे ज्ञानदीपच्या योग्य त्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येतील.
सूचना-
१. पत्राचा मजकूर जास्तीत जास्त वीस ओळी व एकाच पानावर एकाच बाजूस असावा. पत्रासाठी पोस्टकार्ड वा पांढरा कागद वापरावा
२. सुविचार, कथा, कविता, अभिप्राय, विधायक सूचना व माहितीपर पत्रांना प्रसिद्धीसाठी प्राधान्य दिले जाईल.
३. व्यक्तिगत टीका, प्रचार वा जाहिरातविषयक पत्रे प्रसिद्ध करण्यात येणार नाहीत. पत्रात लिहिलेल्या मजकुराच्या सत्यतेविषयी वा व्यक्त केलेल्या मताविषयी व यासंदर्भातील कोणत्याही कायदेशीर बाबीविषयी पत्रलेखक सर्वस्वी जबाबदार राहील व ज्ञानदीपचा त्यात काहीही संबंध नाही याची लेखकाने नोंद घ्यावी.
४. पत्र प्रसिद्ध करण्याचा वा त्याच्या प्रसिद्धी कालावधीचा अधिकार ज्ञानदीपकडे राहील.
Hits: 328