वेलीवरची फुले
अनंत असती वेलीवरती
जाईजुईची फुले
परि ठाऊक नाही नशिबी कुणाच्या
काय असे लिहिले ---- १
कितीक येती आणि जाती
कुणास ना दिसती
परि सुगंध अपुला जगास देण्या
अविरत धडपडती ---- २
फूलपाखरी पंख लेऊनी
वार्यायसंगे भिरभिरती
कुणी देवाच्या चरणावरती
पायी कुणी तुडविती ---- ३
अवचित कोणी जाऊनी पडती
विष्णुपदाचे वरी
अलगद कोणी शोभुनी दिसते
केशकलापावरी ---- ४
आकाशीच्या तारकांपरि
वेलींवरती फुलायचे
परि ठाऊक नाही कधी कुणाला
कुठे कसे जायचे ---- ५
जीवन अपुले दोन क्षणी जणू
अळवावरचे पाणी
करी तयाचे सोने तर कुणी
वाळूवरची गाणी ---- ६
Hits: 253