नक्को नक्को

Parent Category: मराठी पुस्तके Category: काव्यदीप पुस्तक - ७.इतर Written by सौ. शुभांगी रानडे

बोलावल्याविणा जाऊ नको
अन् विचारल्याविणा सांगू नको
कुणास काही मागू नको
अन् दुःख कुणाला सांगू नको ---- १

दोघात तिसरा बोलू नको
अन् वेडावाकडा चालू नको
पैशाची ती हाव नको
अन् सरड्याची ती धाव नको ---- २

कोणासंगे भांडू नको
अन् वितंडवादा घालू नको
उगा कुणाला हसू नको
अन् थोड्यासाठी रुसू नको ---- ३

आपुली टिमकी वाजवू नको
अन् फुकटची दमडी घेऊ नको
अधिक सलगी धरू नको
अन् नात्यातली मुलगी करू नको ---- ४

अतिगोडाते खाऊ नको
अन् सदासर्वदा झोपू नको
वेळ रिकामा दवडू नको
अन् नामस्मरणा विसरू नको ---- ५

Hits: 145
X

Right Click

No right click