मेघदूत
साहित्याच्या सम्राटा तू प्रणाम घे अमुचा
कालक्रम जरि तुझा कुणाला नसे ओळखीचा
प्रसन्नचित्ते सरस्वती तुज देई दिव्य वाचा
अलौकिकाचा स्पर्शही लाभे तव काव्या साचा ---- १
तीन नाटके काव्ये चारही ऐसी सप्तपदी
प्रसिद्ध झाली काव्यसंपदा कालिदासहाती
`मेघदूता''सम ना मिळते काव्यकृती दुसरी
कविकुलगुरु हे, सकलजनांचे नमना स्वीकारी ---- २
प्रतिबिंबचि ते निसर्गातले काव्यी अवतरले
कालिदासमनभावसागरी तरंग जणू उठले
शृंगारासम करूणरसाचे दर्शन त्यात घडे
काव्यकृतीही शोधुनी ऐसी कुठेचि ना सापडे ---- ३
यक्षाला त्या सदैव लागे प्रियेचाच ध्यास
मूर्ती तियेचि नयनापुढती उभी असे खास
रामगिरीहुनी अलकापुरीला मेघा जाण्यास
शापभ्रष्ट तो यक्ष देतसे प्रियेस संदेश ---- ४
Hits: 139