फिनिक्स
अमेरिकेवरील दहशतवाद्यांचे हल्ले
भला थोरला वृक्ष एक तो
सकल जगा आधारभूत तो ..१
दूरवरी ती मुळेही गेली
जमिनीमध्ये रुतून बसली ...२
पर्णे ज्याची अगणित होती
फळे नि पुष्पे अनंत येती ..३
भव्य दिव्य तो पारही ज्याचा
शोभे राजा अखिल वनाचा ...४
अनंत पक्षी रोजच येती
विसाव्यासही कोणी थांबती ...५
किलबिल किलबिल सारे करती
गजबजून त्या फांद्या जाती ...६
वादविवादा कधी न करती
सुखात सारे पक्षी नांदती ...७
दिवस एक परि कसा उदेला
ठाऊक नव्हते पक्षीगणाला ...८
प्रभातवात तो मंद सूटला
वृक्षराज तो डुलू लागला ...९
गतकालाची भविष्यवाणी
विसरुनी गेला वृक्ष परी मनी ...१०
क्षणार्धात ते सर्व हादरले
कोणा न कळे काय जाहले ...११
भले थोरले गिधाड आले
वृक्षासचि त्या धडकुनि गेले ...१२
शक्ती त्याची अफाट होती
विषवल्लीही होती संगती ...१३
उन्मळून तो वृक्षही पडला
पक्षीगण त्याखाली अडकला ...१४
धूळ उडाली गगनी भिडली
क्षणात वार्ता जगती कळली ...१५
दुष्ट गिधाडे दोनचार ती
करिती त्यासम दुष्कृतीस ती ...१६
गिधाडांस त्या क्षमा न करता
शिक्षा देईल विश्व एकदा ...१७
कालावधी तो थोडा जाता
वृक्षाची जरी राखचि होता ...१८
राखचि परि ती जन्मा घालील
फिनिक्स पक्षी उदया येईल ...१९
अखिल जगातील गिधाडवृत्ती
खचितचि जाईल विलयाला ती ...२०
Hits: 142