चैत्रगौर
स्वागत करण्या चैत्रगौरीचे
मयूर होऊनी मन हे नाचे
फूलपाखरी पंख लेऊनी
सदा सर्वदा हसर्या/ वदनी ---- १
लग्नापरी ते हळदीकुंकूही
चैत्रमासी हे चढे मन्मनी
काय करु अन् काय नकासे
वाटे सकला भेटावेसे ---- २
जमवुनि सार्याै सख्या मैत्रिणी
इकडुनि तिकडे करिती भगिनी
लहान मोठे येथ न कोणी
आनंदाने उडती पक्षिणी ---- ३
परि न भुलती निजगृहाला
झटपट उरकती घरकामाला
सडा शिंपुनी सुबक अंगणी
रंगावली ती पुढती रेखुनी ---- ४
कोणी अंबाडा कोणी वेणी
केस मोकळे सोडी कोणी
सुगंधीत तो गजरा माळुनी
किंवा गुलाबपुष्प खोवुनी ---- ५
साड्यांची जणू मैफल भरली
इंद्रधनूसही लाज वाटली
हिरव्यांची तर चंगळ झाली
जरी पदराची रेशीम काळी ---- ६
कोणी अंजिरी कोणी चंदेरी
कोणी झिरमिरी कोणी रुपेरी
कोणी पिवळी कोणी गव्हाळी
अलगद येई निळी जांभळी ---- ७
सकलांवरती नवी झळाळी
कुंकुमतिलका लावुनी भाळी
सुरभि अत्तरा हाती लावुनी
हसर्या हाती गुलाब पाणी ---- ८
हरभ-या सही छान भिजवुनी
ओटी भरती नमुनी वाकुनी
अशीच एकी ठेवा म्हणुनी
आशीर्वच हा देती सुवासिनी ---- ९
डाळ आंब्याची सुरेख सजवुनी
पन्हे कैरिचे नीट हलवुनी
वडी नारळी मध्ये ठेवुनी
पेपरडीशही देती नेउनी ---- १०
कन्या अपुल्या नटुनी थटुनी
विविधवर्णी वस्त्रे लेऊनी
अप्सराच जणू स्वर्गामधुनी
उतरुनी येती अवनी सदनी ---- ११
मिळे सर्व ना पुन्हा पुसोनी
बडीशेप ती हाती देऊनी
आनंदा जणू देती वाटुनी
`या या'' म्हणती आनंदोनी ---- १२
नटुनी थटुनी सुहास्य वदनी
स्वागत करिती सार्यान मिळुनी
चैत्रगौरीच्या वंदुनी चरणी
प्रतिवर्षी सण करिती भगिनी ----१३
Hits: 207