आठवणी

Parent Category: मराठी पुस्तके Category: काव्यदीप पुस्तक - १.आई Written by सौ. शुभांगी रानडे

वर्षामागुनी वर्षे जाती
परी न जाती आठवणी
आठवणींची अनंत पुष्पे
असती माझ्या साठवणी ----- १

स्मृतीसुमनांच्या गंधकोशी गे
मरंद जो राही भरुनी
प्राशन करिता आनंदाने
अवतरशी तू मम सदनी ----- २

गुजगोष्टी त्या करीत असता
वेळेचे मज भान नुरे
अलगद उकले स्मृतिमंजूषा
सकलांची मग एकसुरे ----- ३

आठवणी तव काढीत असती
बागेमधली सर्व फुले
आठवणींच्या हिंदोळयावर
मन माझे मग घेत झुले ----- ४

नशीब अमुचे थोर म्हणूनी
लाभे माता तुज जैसी
अनंत असती स्मृती तुझ्या मी
गणती त्यांची करु कैसी ----- ५

आठवणी तव बुडूनि जाता
आनंदाचे ऊन पडे
चरणधूलि तव सदनी लागता
सोनियाचा कळस चढे ----- ६

If your browser does not support the audio element, please scan the code by your mobile phone with QR Reader app or get audio link by opening

https://dnyandeep.net/images/dnyandeep-scanner.html

in the browser.

Hits: 211
X

Right Click

No right click