चिंगीचा देव
चिंगीचा देव
लहान मुलांनाही अनेक शंका येतात.देव कुठे असतो या चिंगीच्या प्रश्नाला आईने चिंगीला समजेलसे दिलेले उत्तर. लहान मुलांशी त्यांच्या भाषेत बोलले तर त्यांना ते सहज पटते. त्यांच्या कोवळया मनावर आपोआप सुसंस्कार घडविले जातात. म्हणूनच आपल्याशी जवळकीने, प्रेमाने बोलणाऱ्या मुलीला आपली आईच देवस्वरूप वाटते.
देव कोठे राहतो गे
कसा असे तो ते सांगे
उत्तर देई मम प्रश्नाते
आई दुजे ना मी मागे . . . १
सोनुलीसी घेऊनि संगे
आई विचार करू लागे
मांडीवरती घेऊनि तीते
ऐक म्हणे आई,, चिंगे . . . २
देव राही ना मंदिरी
सत्कर्माच्या वसे घरी
मनापासुनी स्मरता त्याते
दिसे तरी तो चराचरी . . . ३
देव नसे गे मूर्तीमध्ये
सोन्याचांदी वस्तुमध्ये
पांडुरंग तो राही सखये
सकल जनांच्या मनामध्ये . . . ४
भुकेस देता भाकरी
तहानलेल्या पाणी तरी
समाधान ते विलसे वदनी
दिसतो तेथे श्रीहरी . . . ५
डोंगर, झाडे, नदीनाले
सूर्यचंद्र आकाश भले
सजीवनिर्जीव देवाहाते
जगती या जन्मा आले . . . ६
आनंदाने वदली चिंगी
गंमत कथिते तुज आई
प्रेमळ तुझिया रूपामध्ये
देवच दिसला मज बाई . . . ७
Hits: 178