ओला आशीष

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह Written by सौ. शुभांगी रानडे

ओला आशीष

उचकी लागणे याचे कारण कोणीतरी दुसरी व्यक्ती आपली आठवण काढीत असते असे म्हटले जाते. त्यात तथ्य किती हा भाग वेगळा. पण प्रत्येक मातेला उचकी लागल्यावर पहिली आठवण आपल्या दूरस्थ मुलाबाळांची होते असे मला वाटते. त्यातून मुलांच्या प्रगतीची बातमी कळल्यावर ती मनोमन आशीर्वाद देते. पण तो मधुर वचनांबरोबरच आनंदाश्रूंनी भिजलेला.

उचकी कशी, इतुकी येई
कळेना काही, मजला बाई
आप्तजनांची, आठवण केली
परि उचकी, ना ती शमली . . . . ।।१ ।।

इतक्यात तुझी, इमेल आली
क्षणात उचकी, दूर पळाली
कळाले तुला, बढती मिळाली
आनंदाते, भरती आली . . . . ।।२ ।।

कष्टाचे फळ, येई हाती
जगाच्या साऱ्या, जाई पुढती
जीवनी सुखाचे, मळे फुलती
जोडीला असावी, नम्रता ती . . . . ।।३ ।।

तव इमेल, बघता क्षणी
गंगा यमुना, नयनातुनी
शब्दैक ना, फुटे वदनी
ओला आशीष, देई जननी . . . . ।।४ ।।

Hits: 155
X

Right Click

No right click