दिवस
दिवस
मुलाबाळांनी भरलेले घर म्हणजे नंदनवनच. मुलं लहानाची मोठी होतानाच्या गमतीजमती अवर्णनीय असतात. त्यावेळचे ते दिवस भुर्रकन् उडून जातात. शिक्षणाच्या, नोकरीच्या निमित्ताने जेंव्हा मुलं बाहेरगावी जातात तंव्हा उरतात त्या केवळ आठवणी.
दिवस-राती येती जाती
कैसे ना कळती
सान बालके असता घरी ती
कामे ना संपती . . . . ।।१ ।।
शाळा सुटता आई भूकचा
गजर ये कानावरती
खाऊ-टाऊ भरले डबे
किती तरी ना पुरती . . . . ।।२ ।।
पेन कुणाचे घेई कोणी
पुस्तक तेही लपविती
गंमत जंमत करीत सारे
अभ्यासा त्या संपविती . . . . ।।३ ।।
सुट्टी लागता शाळेला ती
मस्तीला ये ऊत अती
वारे शिरूनि कानामध्ये
वासरे जणू बागडती . . . . ।।४ ।।
कलकल कलकल करीत सारे
डोक्यावरती घर घेती
गोष्टी ऐकण्या सारे जमती
वडीलधाऱ्यांसभोवती . . . . ।।५ ।।
पै-पाहुणा आला-गेला
घड्याळास ना ती गणती
दिवा लावता देवापुढती
`शुभंकरोति'' ही म्हणती . . . . ।।६ ।।
संस्कारांची शिदोरी ही
घेऊनिया खांद्यावरती
पुढील पिढी ही मार्ग क्रमते
रथ घेऊनी अपुल्या हाती . . . . ।।७ ।।
शिक्षण घेऊनी नोकरीधंदा
करण्या परदेशा जाती
उडुनी जाता पिले संपती
घरातल्या साऱ्या गमती . . . . ।।८ ।।
आठवणी परि त्या आणिती
नयनी अमोल ते मोती
सरते वय परि दिवस तेचि ते
मुळी ना सरती . . . . ।।९ ।।
Hits: 182