माझी ताई

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह Written by सौ. शुभांगी रानडे

माझी ताई

एक खरेखुरे व्यक्तिेचत्र. अत्यंत प्रेमळ, समजूतदार, लोभसवाणी, कष्टाळू , सदा समाधानी, कधीही न रागावणारी अशी माझी मोठी बहिण - ताई . तिच्या व्यक्तिमत्वाच्या काही पैलूंवर प्रकाश टाकला आहे. हिमनगाचा १/१० भाग पाण्यावर व ९/१० भाग पाण्यात असतो तसे या कवितेत वर्णन केलेल्या भागात तिच्या जीवनातील १/१० भागच मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

खरेचि कथिते बाई
भारी गुणाची माझी ताई . . . ध्रु.

तिसऱ्या मजली घर माहेरचे
होते जरि ते एक खोलीचे
तीर्थक्षेत्र ते परि मायेचे
उणे न होते तेथ कशाचे
आठवणी रमुनी जाई
भारी गुणाची माझी ताई . . . १

हुतुतु आसने आवड होती
द्रुतगतीतही प्रथम येत ती
घरकामातही आनंदी ती
खंत ना करी जागेची ती
संसारी परि रमली
भारी गुणाची माझी ताई . . . २

लग्नासमयी लहान होती
सासर माहेर नाती गोती
कुशलपणाने सांभाळी ती
सदा हासरी समाधानी ती
मनात भरूनी राही
भारी गुणाची माझी ताई . . . ३

कुंद-मोगरा, जाई-जुई ती
जीवनवेली उंच जात ती
बहरूनी कळसाला चढली ती
त्यागाची जणू सुरेख मूर्ती
तिला सर कुणाची नाही
भारी गुणाची माझी ताई . . . ४

अनंत दु:खे तिने झेलली
कुटुंबकल्याणास्तव झिजली
नशीबवान तुम्ही मुलेसुनाही
ताईसम ती लाभे आई
प्रेमे पाखर घाली
भारी गुणाची माझी ताई . . . ५

सदा गुणांची कैवारी ही
दोषांवरि परि पांघर घाली
सोशिकतेची मर्यादा ही
लेकीसुनांना सांभाळी ही
प्रेमळ सासू होई
भारी गुणाची माझी ताई . . . ६

संसाराच्या वटवृक्षा ही
चहू बाजूंनी धरूनी ठेवी
त्यागाचा त्या महिमा हाही
ठाऊक आहे सकल जनाही
शब्द न ओठी येई
भारी गुणाची माझी ताई . . . ७

गरज म्हणोनी काळाची ती
चिमणपाखरे उडोनी जाती
मायेची परि ओढ असे ती
विसाव्यास कधी घरट्या येती
नयनी जल ते येई
भारी गुणाची माझी ताई . . . ८

Hits: 129
X

Right Click

No right click