सच्चे बंधन
सच्चे बंधन
मनापासून केलेल्या कोणत्याही गोष्टीला कसलेही बंधन आड येऊ शकत नाही. प्रेम, मैत्री, नाते, ज्ञान, भूषण इत्यादी गोष्टी जर अगदी खरेपणाने केलेल्या असतील तर त्यासाठी जातपात, देश, धर्म अशा प्रकारचा कोणताही अडसर मधे येऊ शकत नाही.
बंधन सच्च्या प्रेमाला ना
कधी कुठले उरते
जातीपातीमधील भिंती
पार करोनी फुलते . . .१
बंधन सच्च्या मैत्रीला ना
कधी कुठले उरते
देशादेशामधील रेषा
पार करोनी खुलते . . . २
बंधन सच्च्या नात्याला ना
कधी कुठले उरते
जुन्या-पुराण्या आठवणींना
पार करोनी राहते . . . ३
बंधन सच्च्या भूषणा ना
कधी कुठले उरते
सोन्यामोत्या दागिन्यांना
पार करोनी उरते . . . ४
बंधन सच्च्या नामाला ना
कधी कुठले उरते
घरदारातिल कामाधामा
पार करोनी उरते . . . ५
बंधन सच्च्या ज्ञानाला ना
कधी कुठले उरते
जनामनातिल अंधश्रद्धा
पार करोनी उरते . . . ६
Hits: 136