परिस
परिस
श्रीमती मालतीबाई किर्लोस्कर. काव्यदीप या माझ्या काव्यसंग्रहाच्या मार्गदर्शक. जसे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते तसे मालतीबाइंर्नी केलेल्या प्रेमळ कौतुकाने माझ्या कवितेला परिसस्पर्श होतो अशी माझी प्रामाणिक समजूत. अशा काव्यगुरूच्या गुणगौरवगानपर लिहिलेली ही कविता.
सुखात बहु नांदती जगती आपुल्या कन्यका
कधी न भुलती परि सकल आपुल्या तासिका
अखंड तव सत्पदी अमुचि राहते नम्रता
असाच सहवासही तव मिळो अम्हाला सदा . . . १
अनंत असती जरी शुक नि सारिका भूवरी
करूनी अति गलबला विहरतीही त्या अंबरी
सदैव नच कूजिते खरीच कोकिला सुस्वरी
तशीच गमते मला ती कविता तुवा अंतरी . . . २
चाल बदल
तुवा हाती बघता दिसती मजला सप्तसरिता
स्मरण करिता त्यांचे अविरत मनी ये धन्यता
जशी परिसस्पर्शे येई लोहाते स्वर्णता
तशी तव सुस्पर्शे सुभग होई माझी कविता . . . ३
Hits: 154