कल्पनेची भरारी

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह Written by सौ. शुभांगी रानडे

कल्पनेची भरारी

कल्पना चावलाने भारताचे नाव जगाच्या इतिहासात कोरून ठेवले. अवकाशयानातून पृथ्वीवर परतताना घडलेली दु:खद घटना ही सर्वांना ठाऊक आहे. आपल्या कर्तृत्वाने उज्वल झालेली कल्पना चावला तरूण पिढीचे स्फूर्तिस्थान ठरली. या कवितेद्वारे तिला श्रद्धांजली वाहिली आहे.

शुक्राच्या चांदणीपरि आकाशी
चमकून गेलिस कल्पना तशी
कल्पना नव्हती कुणाला ऐसी
नियतीची क्रू र थट्टा कैसी . . . . ।।१ ।।

कल्पनाशक्तीत विलीन होसी
जगताच्या तू कणाकणाशी
शौर्यगाथा ही गातील तुझी
देशी नि परदेशी . . . . ।।२ ।।

कार्याने तव प्रेरणा मिळेल
साऱ्या युवकांसी
पुढील पिढीचे स्फूर्तिस्थान
तूच खरी होसी . . . . ।।३ ।।

कल्पनांचे पंख लेऊन
आकाशी भराऱ्या घेसी
स्मरण करील जग तूचि
महिला अविनाशी . . . . ।।४ ।।

साऱ्या जगाचा दीपस्तंभचि
होऊनी बसलीसी
अंतरिक्षाच्या इतिहासी
अमर होऊनी जासी . . . . ।।५ ।।

अज्ञानाचा ध्यासच देईल
मानवा ज्ञानराशी
कार्य तुझे इतुके मोठे
उठतील फिनिक्स पक्षी . . . . ।।६ ।।

अंतरिक्षी भारतदेशा तू
उच्चपदा नेलेसी
नतमस्तक होतील सारे
तुझिया चरणांच्यापाशी . . . . ।।७ ।।

Hits: 146
X

Right Click

No right click