कळया नका तोडू
कळया नका तोडू
झाडेवेलींना सुद्धा माणसांप्रमाणेच भावना असतात. त्या भावना कवितेतून व्यक्त केल्या आहेत.
फुले तोडा तुम्ही परि कळया नका तोडू
लाडक्या ह्या बाळांंची नीज नका मोडू ---
मुले जशी तुम्ही सांगा अपुल्या घरची
तशी कळयाफुले आम्हा वृक्षवेलींची
चुकीच्या कृतीची येती फळे अति कडू
लाडक्या ह्या बाळांंची नीज नका मोडू --- १
पाणी तुम्ही घाला मग फुले आम्ही देऊ
एकमेका म्हणू आपण सारे बहिणभाऊ
एक दिवस नक्की येतील धीर नका सोडू
लाडक्या ह्या बाळांंची नीज नका मोडू --- २
सूर्यदेव येता उषाराणीच्या महाली
पखरण रंगांची होईल त्यावेळी
झोपू देत सुखे नका पांघरूण ओढू
लाडक्या ह्या बाळांंची नीज नका मोडू --- ३
गोड गोड गुलाबी स्वप्ने पाहताती
दिस एक जगुनी जगा सुखविती
कामा येतील उद्या तुमच्या आज नका तोडू
लाडक्या ह्या बाळांंची नीज नका मोडू --- ४
झोप त्यांची होता छान पहा उमलती
रंग आणि गंधाची कुपी घेऊन हाती
हळू फुले तोडा त्यांच्या माना नका मोडू
लाडक्या ह्या बाळांची नीज नका मोडू
Hits: 156