कारण आम्ही लहान होतो

Parent Category: मराठी पुस्तके Category: सांगावा कवितासंग्रह Written by सौ. शुभांगी रानडे

कारण आम्ही लहान होतो

माणसाचे लहानपण हे निरागस बाळासारखे असते. लहान लहान गोष्टीत सुद्धा परमानंद मिळतो. म्हणूनच लहानपण देगा देवा असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. वयानं मोठा झाल्यावरसुद्धा लहानपणच्या छोट्या छोट्या गोष्टींची केवळ स्मृतीही माणसाला अमाप आनंद मिळवून देते.

कारण आम्ही लहान होतो
कारण आम्ही लहान होतो . . . . ध्रु. ।।

खेळावरती प्रीती होती
नीती अनीती ठाऊक नव्हती
आईवरती भक्ती होती
सारे तिचे एकत होतो
कारण आम्ही लहान होतो . . . १

वडीलधाऱ्यांची भीती होती
चालही थोडी उडती होती
बाबांची नोकरी फिरती होती
गावोगाव फिरत होतो
कारण आम्ही लहान होतो . . . २

सवंगड्यांची आवड होती
अभ्यासाची नावड होती
म्हणून बाइंर्ची भीती होती
आईच्या मागे लपत होतो
कारण आम्ही लहान होतो . . . ३

गोष्टीत राजाराणी होती
राक्षस आणि परिराणी होती
मंजुळ मंजुळ गाणी होती
तालावर त्या नाचत होतो
कारण आम्ही लहान होतो . . . ४

घरची हालत बेताची होती
दोन-चार कच्ची बच्ची होती
पण वाणी तेवढी सच्ची होती
थोरल्यांना अनुसरीत होतो
कारण आम्ही लहान होतो . . . ५

शिरापुरी ठाऊक नव्हती
भाजीभाकरीला कमी नव्हती
पण फारच गोड लागत होती
वाटून सारे घेत होतो
कारण आम्ही लहान होतो

Hits: 172
X

Right Click

No right click