३. शुभ संस्कारांची शिदोरी

Parent Category: मराठी पुस्तके Category: सेनानी साने गुरुजी Written by सौ. शुभांगी रानडे

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

३. शुभ संस्कारांची शिदोरी

बाबुराव खोत हे वडवली गावचे खोत होते. गावचा शेतसारा वसूल करणे आणि तो सरकारकडे भरणे हे खोताचे काम असे. कोकणातील खोत हे तसे इतर समाजातील लोकांच्या मानाने श्रीमंत असत. एकेकाळी साने घराणेसुद्धा श्रीमंत म्हणून प्रसिद्ध होते, परंतु दैवगती फिरली आणि श्रीमंती गेली. ते कर्जबाजारी झाले.

बाबुराव हे तसे मोठे मानी गृहस्थ होते. खोताच्या घरीच वाढल्यामुळे ते आपल्या कुळांशी कडकपणाने वागत असत. परंतु मनाने अत्यंत भावनाशील होते. स्वदेशीचे कट्टर अभिमानी व पुरस्कर्ते होते. लोकमान्य टिळकांच्या स्वदेशीच्या चळवळीत
त्यांनी भाग घेतला होला. सहा महिन्यांची शिक्षाही भोगली होती. आपल्या मुलांवर त्यांचे फार प्रेम होते. त्यांना शिकवावे, शहाणे करावे म्हणून त्यांची धडपड चालू असे. गरिबीतदेखील त्यांनी पोटाला चिमटा घेऊन आपल्या मुलांना शिक्षण देण्याची खटपट केली. स्वत: भाऊराव भल्या पहाटे उठून मुलांना श्लोक, भूपाळ्या, आरत्या, अभंग आदी शिकवायचे. त्यामुळे श्यामचे कितीतरी श्‍लोक आणि इतर पाठांतरही झाले होते. जेवणाच्या वेळी प्रत्येकाने श्‍लोक म्हणायचा अशी घरात
पद्धतच होती. वडील श्लोक समजून द्यायचे आणि शिकवीतही असत. मोरोपंत, वामन पंडित वगैरे पंडित कवींचे कितोतरी श्‍लोक आणि आर्या श्यामच्या पाठ झाल्या होत्या. इतर देवांची स्तोत्रेही पाठ झाली होती. श्याम म्हणतो, “कानी
कुंडलाची प्रभा चंद्रसूर्य जैसे नभा हे चरण आजही मला मधुर वाटतात. 'वक्रतुंड महाकाय, शांताकारं, वसुदेवसुतं देवं, कृष्णाय वासुदेवाय वर्गैरे संस्कृत श्‍लोक आम्हाला लहाणपणी पाठ येत. रोज एखादा नवीन श्लोक ते शिकवायचे.
वडिलांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे शेकडो संस्कृत शब्दांचा अर्थ समजू लागला.”

वडील पहाटे शिकवीत तर आई सायंकाळी शिकवी.

'दिव्या दिव्या दीपोत्कार ।
कानी कुंडल मोतीहार ।
दिवा देखून नमस्कार ।'

किंवा

'तिळाचे तेल कापसाची वात ।
दिवा तेवे मध्यान्ह रात ।
दिवा तेवे देवापाशी ।
माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी ।'
वगैरे आई शिकवीत असे. त्यामुळे मुलांनाही ते पाठ करण्याचा नाद लागे.

एकदा घरातली गाय व्यायली असतानाची गोष्ट. त्या वेळी श्याम दापोलीला शिकायला होता. त्याला कच्च्या दुधाचा खरवस फार आवडत असे. आईला त्याची सारखी आठवण. येऊ लागली. भाऊराव म्हणाले, “उद्या पहाटे मी घेऊन जातो
त्याच्यासाठी खरवस.” आणि सहा कोस चालत ते खरवस घेऊन गेले. किती प्रेम!

मुलासाठी कष्ट उपसण्यात आई-वडिलांच्या मनाला अपार आनंद होत असतो. जेवणाचेदेखील शास्त्र आहे. भाऊराव सांगायचे, “आपल्या पानाकडे पाहून जेवावे. पानात वस्तू असता पुन्हा मागू नये. पान कसे लख्ख करावे.” आणि वडील
स्वत:ही तसेच वागत असत.

एके दिवशी सारे जेवायला बसले होते. आईने रताळ्याच्या पानांची भाजी केली होती. ती भाजीत मीठ घालायचे विसरली होती. परंतु वडील बोलले नाहीत म्हणून मुलेही बोलली नाही. जेवणे झाली, पसारा आवरून आई जेवायला बसली. पहिला
घास घेतला तो भाजी अळणी! आई म्हणाली, “अरे अळणी भाजी कशी रे खाल्ली? सांगावे की नाही?” श्याम म्हणाला, “भाऊ बोलले नाहीत म्हणून मी बोललो नाही.” सर्वांना अळणी भाजी खावी लागली याची रुखरूख आईला लागून राहिली.
इतक्या खटपटीने चुलीजवळ राहून केलेला स्वयंपाक गोड करूनच घ्यावा ही वडिलांची दृष्टी! श्याम म्हणतो, "मित्रांनो, दुसऱ्याचे मन दुखवू नये म्हणून स्वत:च्या जिभेवर ताबा ठेवणारे माझे वडील श्रेष्ठ की, स्वत:च्या मनाला लावून
घेणारी माझी आई श्रेष्ठ ? दोघेही श्रेष्ठ! संयम व समाधानाप्रमाणेच कर्मकुशलतेवरही भारतीय संस्कृती उंभारलेली आहे. हे दोन्हीही धडे मला आई-वडिलांनी दिले.”

लहानपणापासूनच श्याम देवभक्त होता. देवादिकांच्या कितीतरी गोष्टी त्याला येत असत. ऐकलेल्या व वाचलेल्या पुष्कळ गोष्टी त्याला ठाऊक होत्या. मुले गोष्टीवेल्हाळ असतातच. त्यामुळे आळीतील तसे शाळेतील मुले श्यामच्या घरी
गोष्टी ऐकायला जमायची. श्याम त्याला देवांच्या, साधुसंतांच्या व वीर पुरुषांच्या गोष्टी तन्मय होऊन सांगायचा. श्यामने 'रामविजव', 'हरिविजय', 'पांडवप्रताप', 'गणेशपुणण', 'कथासारामृत', 'शिवलीलामृत' अशी खूप लहानमोठी पुस्तके
मिळवून वाचली होती. एकदा पुण्याच्या मामाने श्यामला खाऊसाठी दोन आणे दिले होते. श्यामने त्याचे 'शनिमहात्म्य' व रामाचे चित्र विकत घेतले. अशा प्रकारे पालगडला आपल्या घरी आई-वडिलांच्या व निसर्गाच्या सानिध्यात ज्या वेळी
श्याम लहानाचा मोठा होत होता, त्याच वेळी ही शुभ संस्कारांची शिदोरीही मिळवीत होता.

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

Hits: 67
X

Right Click

No right click