४. शिक्षणाचा ध्यास - २

Parent Category: मराठी पुस्तके Category: सेनानी साने गुरुजी Written by सौ. शुभांगी रानडे

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

४. शिक्षणाचा ध्यास - २

एकदा दिवाळीची सुटी सुरू झाली होती, श्यामला व धाकट्या भावाला भाऊरावांनी नवीन सदरे शिवले होते. पण भाऊरावांच्या नेसण्याच्या धोतरांच्या मात्र चिंध्या झालेल्या होत्या. आईची लुगडीही ती शिवून नेशीत होती. पण पतीला धोतरे नाहीत याचे तिला फार वाईंट वाटे. तिच्याजवळ प्रपंचात काटकसर करून शिल्लक टाकलेले थोडेसे पैसे होते. पण तेवढ्यात कशी येणार धोतरे? तेवढ्यात पुण्याहून कोणीतरी गावी आले. पुण्याच्या भावाकडून बहिणीला तीन रुपये ओवाळणी झाली. त्या पैशातून श्यामच्या आईने व मुलांनी भाऊरावांसाठी धोतरजोडी आणली. दिवाळीची आंघोळ झाल्यावर श्यामच्या आईने भाऊरावांच्या हातात नवीन धोतर दिले. ते चकित झाले! त्यांनी नवीन धोतर पाहून चौकशी केली. श्यामच्या आईने सारे सांगितले. भाऊरावांना आनंद झाला आणि आपल्या गरिबीचे वाईटही वाटले. ते श्यामच्या आईला म्हणाले, “तुझ्यासारखी जन्माची सोबतीण आणि अशी गोड व गुणी मुले असल्यावर मी का आनंदी होणार नाही?” ,

दुसऱ्यासाठी स्वत:च्या सुखाचा त्याग करण्याचे आईचे थोर उदाहरण श्यामपुढे होतेच. त्यानेही एकदा दापोलीहून येताना धाकट्या भावासाठी कोट आणला.

“पैसे रे कोठले? कोणाचे कर्ज काढलेस की फीचे दवडलेस?” भाऊरावांनी विचारले.

“कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास?” आईने कातर स्वरात विचारले.

श्यामने सांगितले, “भाऊ, तुम्ही मला खाऊला आणा-दोन आणे देत असा, ते मी जमविले. त्यातून हा कोट शिवून आणला मी पुरुषोत्तमासाठी.'"

हे ऐकून आईला गहिवरून आले. वडिलांनी त्याच्या पाठीवरून मायेचा हात फिरविला.

श्याम एकदा आईबरोबर लाडघरला चालला होता. लाडघर दापोलीपासून सहा मैलांवर आहे. दापोलीहून पहाटे बैलगाडीतून दोघे निघाली. निसर्गलावण्याने नटलेल्या त्या हिरव्याकंच झाडीतल्या लालचुटूक रस्त्यातून बैलगाडी चालली होतो. श्याम आईच्या मांडीवर डोके टेकून पडला होता. आज तो आणि त्याची आई असे दोघेच होते. श्याम अपार मातृसुख अनुभवीत होता. खूप सुखावला होता. आई त्याच्या केसांतून बोटे फिरवीत ओवी म्हणत होती -

घनदाट या रानात । धो धो स्वच्छ वाहे पाणी ।
माझ्या श्यामच्या जीवनी । देव राहो ॥

ही ओवी ऐकताच श्याम ताडकन उठून बसला.

“का रे उठलास असा?”

श्याम म्हणाला, “आई, श्यामच्या जीवनात तू देवाला बोलावीत आहेस, मी कसा निजू? देव येणे म्हणजे जागृती येणे.”

'मी मोठा होईन, शिकेन आणि आईला सुख देईन” असा ध्यासच श्यामला लागला होता. आई आणि वडील दोघेही पालगडला अत्यंत गरिबीत, हालात दिवस काढत होते. घरात भाऊराव आणि त्यांचे बंधू यांचे बिनसल्याने भाऊरावांना घर
सोडून झोपडीत रहावे लागत होते. घरच्या वाटणीतले कर्जच फक्त भाऊरावांच्या डोक्यावर आले होते. मानी भाऊराव अपमानित जीवन जगत होते. श्यामची आई तर या भाऊबंदीच्या जाचाने काळवंडून गेली होती. घरप्रपंचाला थोडेफार ठिगळ
लावण्यासाठी ती लोकांच्या घरचे दळणकांडण करू लागली होती. एकेकाळी वैभवात दिवस काढलेल्या आईला हे दु:ख विलक्षण जाळीत होते. तिची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. श्याम घरी आला म्हणजे आईला दळू लागे.
धुणे धुवायला, भांडी घासायला, केरवारे करायला, सारवायला तो आईला मदत करीत असे.

दापोलीला श्याम इंग्रजी पाचवी पास झाला. त्याचा मित्र राम आधीच पुण्याला आई व भावंडांबरोबर शिकायला गेला होता.
भाऊरावांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. त्यांना धनहीन स्थितीत प्रपंचाचा गाडा ओढणे फार जड जात होते. अशा परिस्थितीत श्यामला पुढे शिकवणे त्यांना जमेलसे दिसत नव्हते. म्हणून त्यांनी नाइलाजाने श्यामला
ओळखीने रेल्वेत नोकरीला लावण्याचा विचार केला होता.

श्यामच्या मनोरथांचा चुराडा होत होता. त्याने शिकून मोठा होण्याची, कवी-ग्रंथकार होण्याची उमेद बाळगलेली होती. पण परिस्थित्तीने बाट अडविली होती. श्यामला खूप शिकण्याची इच्छा होती. त्याने वडिलांवर भार न टाकता शिकावे, असा विचार केला. एवढ्या लहान वयात नोकरीची कल्पनाही त्याला रुचली नाही. श्यामने दोन-तीन ठिकाणी चौकशी केली, तेव्हा कळले की औंध संस्थानात शिक्षणाची सोय आहे. गरीब विद्यार्थ्यांना अन्नछमातून मोफत जेवण मिळते. श्यामने
औंधला शिकायला जायचे ठरविले.

देवासाठी रानावनात जाणारा बाळ ध्रुव हा त्याचा आदर्श होता. विद्येसाठी पडतोल ते कष्ट सोसण्याचे, प्रसंगी माधुकरी मागून शिकण्याचे त्याने पक्के केले. श्यामच्या या शुभ विचाराला त्याच्या आईने व वडिलांनीही पुष्टी दिली. श्यामने
वळकटी बांधली. ट्रंकेत चार कपडे, पु्स्तके घेतली. भाऊरावांनी चांगला दिवस पाहिला आणि श्यामने त्या दिवशी ओंधचा रस्ता धरला.

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

Hits: 67
X

Right Click

No right click