उद्योगपती वालचंद हिराचंद
उद्योगपती वालचंद हिराचंद
अरविंद ताटके, सुमेरु प्रकाशन (१९८७)
स्वातंत्र्य्पूर्व काळात ब्रिटीश भांडवलदारांशी दोन हात करीत स्वत:च्या कर्तृत्वाने भारतात उद्योगधंद्यांचे जाळे विणणारे उद्योगपती वालचंद हिराचंद यांच्या कार्याची ओळख श्री. अरविंद ताटके यांनी या पुस्तकात करून दिली आहे. नोकरी हेच ध्येय समजून परिक्षार्थी झालेल्या सध्याच्या विद्यार्थ्यांना अशा आदर्शाची आज खरी गरज आहे.
पारतंत्र्याच्या काळात आपल्या देशात भारतीयांनी उद्योगधंदे काढावेत असे इंग्रज सरकारला अजिबात वाटत नसे. उद्योग त्यांनी काढायचे व भारतीयांनी फक्त इमाने इतबारे नोकरी करुन कायम आश्रित रहावे अशी ब्रिटीश सरकारची धारणा होती. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत साखर उद्योग, जलवाहतूक, बोट बांधणी, विमान बांधणी, मोटरनिर्मिती, बांधकाम व्यवसाय उभे करुन भारताला नवी आर्थिक प्रतिष्ठा व आत्मसन्मान मिळवुन देणार्या वालचंद हिराचंदांचे हे चरित्र प्रत्येक भारतीयाने वाचले पाहिजे.
घरची सांपत्तिक स्थिती उत्तम असूनही त्यांनी स्वतंत्र व्यवसाय करण्याचे ठरविले. त्यासाठी वडिलांचा पैसा, प्रोत्साहन वा पाठबळ मिळाले नाही तरी धाडसाने यात पाऊल टाकले व स्वसामर्थ्यावर व कल्पक बुद्धीच्या जोरावर उद्योग धंद्यांचे साम्राज्य उभे केले. सोलापूरचे फाटक यांच्याबरोबर बार्शी लाइट रेल्वेचे रूळ घालण्याचे काम घेऊन त्यांनी आपल्या कामाला प्रारंभ केला. फाटक- वालचंद या खाजगी कंपनीने बोरीबंदर ते करीरोडपर्यंत चौरुळीकरण, हार्बर ब्रॅंच, करीरोड ते ठाणे, ठाणे ते कल्याण, देवलालीला रुग्णालये व बराकी बांधण्याचे काम केले.
पुढे नरोत्तम मोरारजी, लल्लुभाई सामळदास, किलाचंद देवचंद व वालचंद यांनी ’सिंदिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनी’ स्थापन केली, बोटी खरेदी केल्या व अशारीतिने भारतीय जहाज व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली.
ब्रिटीश कंपनीचे लॉर्ड इंचकेन हे ‘सिंदीया कंपनीला आम्ही चांचे समजतो’ असे म्हणाले तेव्हा वालचंदनी सडेतोड उत्तर दिले.‘चांचे कोण? आम्ही की तुम्ही ? आमच्या देशाभोवतालचा समुद्र, सातासमुद्रापलीकडुन येणार्या तुम्हा लोकांचा की ह्याच भूमीत जन्मलेल्या व वाढलेल्या आम्हा लोकांचा?’
वालचंद कंपनीने टाटा कंपनीशी सहकार्य करत तानसापासून मुंबईपर्यंत ५५ मैल नळ घालण्याचे काम, तसेच अतिशय अवघड बोरघाटातील बोगद्याचे काम करुन आपली क्षमता सिद्ध केली. २७ जानेवारीत टाटा कंपनीने हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी स्थापन केली. हिची मॅनेजिंग एजन्सी वालचंद आणि कंपनीकडे होती.१९३८ मध्ये मुंबईत ‘कन्स्ट्रक्शन हाऊस’ बांधण्यात आले. इंडियन ह्यूम पाइप, हिंदुस्तान एअरक्रॉफ्ट कंपनी, रावळगाव शुगर , वालचंदनगर इंडस्ट्री, प्रीमियर मोटर कारखाना असे अनेक उद्योग त्यांनी सुरू केले व नावारुपाला आणले.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय आमचे उद्योगधंदे व व्यापार ह्यांची अभिवृद्धी होणार नाही असे त्यांचे मत होते म्हणूनच राष्ट्रीय चळवळींना, १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्याला व भूमिगत कार्यकर्त्यांनाही त्यांनी विपुल अर्थसाहाय्य केले.
आज आपण उद्योगधंद्याचा त्यांनी दिलेला संजीवनी मंत्र विसरून परदेशी उद्योगांत नोकरी करण्यात धन्यता मानत आहोत. भारतास स्वबळावर प्रगति करावयाची असल्यास त्यांचा आदर्श आपण अंमलात आणायला हवा. --- डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली
Hits: 154