सावित्रीबाई : व्यक्तित्व

Parent Category: मराठी पुस्तके Category: सावित्रीबाई फुले - समग्र वाङ्मय Written by सौ. शुभांगी रानडे

संदर्भ -संपादकाचे मनोगत मधून .

सावित्रीबाई : व्यक्तित्व

भारतातील पहिल्या शिक्षिका-स्त्रीमुक्‍ती चळवळीच्या पहिल्या नेत्या, पददलितांच्या कैवारी आणि पौढ शिक्षणाच्या पुरस्कर्त्या म्हणून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचें स्थान अढळ आहे. एका अशिक्षित स्त्रीने शिक्षण घेऊन शिक्षिका बनावे आणि वर्षानुवर्षे अज्ञानाच्या अंधकारात चाचपडणाऱ्या स्त्री-शुद्रांना ज्ञानाचा प्रकाश दाखवावा ही गोष्ट भारताच्या दोन हजार वर्षांच्या इतिहासात अपूर्व अशी आहे.

शिक्षणाच्या क्षेत्रातून सामाजिक क्षेत्रात पदार्पण करावे, दुष्काळात अन्नान्न करून तडफडणार्‍या हजारो जिवांच्या मुखांत घास भरवावा, शेतकरी-सामाजिक सुधारणांसाठी वाङ्मयाचे साधन हाती घेऊन कवयित्री आणि लेखिका बनावे, सर्व गाव, सर्व समाज . सुशिक्षित, सुसंस्कृत करण्याचे, जनावरांप्रमाणे जिणे जगणाऱ्या खी-शूद्रांना माणसात आणण्याचे वेड घ्यावे, पतीच्या निधनानंतरही शोक करीत न बसता सत्यशोधक समाजाच्या तत्त्वप्रसाराचे कार्य करण्याचे सतीचे वाण घेऊन अविश्रांत काम करावे, दीनदलितांसाठी, दीनदलितांच्या मुलांसाठी रोगांच्या साथीत दिवसा-रात्री घराबाहेर धावावे,. त्यांची सेवा करावी, प्लेगच्या साथीत त्यांना कडेवर घेंऊन आपल्या दत्तक मुलगा डॉ. यशवंतराव फुले यांच्या दवाखान्यात घेऊन जावे, तेथे प्लेगच्या रोगाला आपण बळी पडत असल्याची जाणीव होऊनही रुग्णांची सेवा करीत राहावी आणि ही सेवा करता करता अनंतात विलीन होऊन जावे. अशा या व्यक्तिमत्त्वास केवळ अलौकिक हे एकच विशेषण योजिता येईल.

सावित्रीबाईंच्या कार्यकर्तृत्वाच्या या पटावरून अशी सहज ओझरती नजर जरी टाकली तरी या स्त्रीचे व्यक्तित्व हे सामान्य नव्हते, हे सहज लक्षात येते. एका समाजसुधारकाची पत्नी म्हणून त्यांचे एक सवंग अस्तित्व होते, असे म्हणता येणार नाही. सावित्रीबाईंनी जोतीदादांना त्यांच्या इहलोकातील आयुष्याच्या अखेरच्या प्रवासापर्यंत साथ केली. परंतु ही साथ केवळ एका पतिपरायण स्त्रीची नव्हती, तर त्यांची प्रेरणा स्वतंत्र अशी होती.

'सावित्रीबाईचा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात झालेला. शिरवळजवळच्या एका खेड्यात. जेथे सबंध गावात शंभर-दीडशे उंबरा सापडणे कठीण. गावाला वर्षानुवर्षे दुष्काळाची परंपरा लाभलेली, शिक्षणाचे संस्कार नाहीत, अशी ही निरक्षर कुटुंबात जन्मलेली वाढलेली. स्त्री जोतीरावांच्या हाताखाली शिक्षणाचे धडे गिरविते, शिक्षक-प्रशिक्षण घेते, आणि ज्ञानदानाचे व्रत घेऊन ज्ञानयोगिनी बनते.

फुले दांपत्याने शाळा काढल्या. १८४८ ते १८५२ या चार वर्षांच्या कालावधीत पुणे आणि पुण्याच्या ग्रामीण परिसरात एकूण अठरा शाळा काढल्या आणि त्या यशस्वीपणे चालविल्या. या शाळा चालविण्यासाठी त्यांनी अविश्रान्त परिश्रम केले. त्यांनी दिवस पाहिला नाही की रात्र पाहिली नाही, तहानभूक विसरून या दांपत्याने ह्या परोपकारी कृत्याचा पिच्छा न सोडता') हा ज्ञानदानाचा यज्ञ अहोरात्र प्रज्वलित ठेवला. फुले दांपत्याचे हे कार्य म्हणजे या दांपत्याने घडवून आणलेला एक चमत्कार होता. कारण त्या काळात अशा शाळा चालविणे या अशक्य कोटीतील गोष्टी होत्या.

मनुष्यत्वासाठी शिक्षण
फुले दांपत्याने शाळा काढल्या, परंतु शाळांची जाळी विणीत ते बसले नाहीत. शिक्षण हे समाजपरिवर्तराचे साधन आहे. केवळ साक्षर करण्यासाठी त्यांना शिक्षण लावधाने न्हवे, शिक्षणायून र्‍्यांम' सशज3गृरी कराळयाची होती. जुनाट रुढी-अंधश्रद्धा, जुन्या परंपरा, भोळ्या समजुती नाहीशा करावयाच्या होत्या. सामान्य लोक पशुतुल्य जीवन जगत होते, त्यांच्यात मनुष्यत्व कसे आणता येईल याचा सावित्रीबाईंनी विचारकेला होता. आपल्या 'काव्यफुले' या काव्यसंग्रहात त्या म्हणतात-
*“शुद्रांना सांगण्याजोगा शिक्षण मार्ग हा।
. शिक्षणाने मनुष्यत्व, पशुत्व हाटते पहा' ।।
मनुष्यत्वासाठी शिक्षण हा मूलभूत विचार सव्वाशे वर्षांपूर्वी मांडणाऱ्या सावित्रीबाई फुले ह्या भारतातील थोर शिक्षणतज्ज्ञ होत. लोकांना माणूस बनविणे, ताठ मानेने उभे राहायला लोकांना शिकविणे, स्वत्व जपण्यास शिकविणे आणि त्याहीपलीकडे माणसांबद्दल प्रेम निर्माण करण्यास शिकविणे एवढा शिक्षणविषयक व्यापक दृष्टिकोण ह्या लोकोत्तर स्त्रीच्या ठिकाणी होता.

म. फुल्यांनी १८५५ साली 'तृतीय रत्ने' नावाचे नाटक लिहिले होते. परंपरा आणि अंधश्रद्धा यांनी जखडलेल्या निरक्षर कुटुंबाची धर्मांच्या नावाखाली लुबाडणूक आणि
नागवणूक कशी होते याचे प्रत्ययकारी चित्र; यात जोतीरावांनी रेखाटले आहे. या नाटकात शेवटी सावित्रीबाईंनी प्रौढ स्त्रियांसाठी जी रात्रीची शाळा सुरू केली आहे; त्या शाळेत प्रौढ स्रियांनी जावे असा उपदेश केला आहे. रूढी, परंपरा आणि अज्ञान यांचे उच्चाटन करण्यासाठी या दांपत्याने आपले जीवनसर्वस्व ऐन तारुण्यात कसे समर्पित केले होते याची कल्पना यावरून येते. सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य केले. त्यानंतर सामाजिक कार्यही केले. दुष्काळात फुले दांपत्याने अन्नछत्रे उघडली, आणि हजारो जीवांचे प्राण वाचविले.

जिवंतपणी मरणाचे भोग

ज्याप्रमाणे मृत्युपंथाला लागलेल्या जिवांना त्यांनी जसे जीवदान दिले तसेच जिवंतपणी मरणाचे भोग भोगणाऱ्या जिवांनाही त्यांनी नवजीवन दिले. त्या काळी विधवा स्त्रियांची स्थिती अत्यंत अनुकंपनीय होती. अकाली वैधव्य आलेल्या तरुण विधवा स्त्रिया घराच्या सांदी-कोपऱ्यात फुटक्या कपाळाला दोष देत उभे जळते आयुष्य अश्रू ढाळत. मनाची आणि शरीराची भडकलेली आग विझवू पाहात. त्या काळात विधवांची स्थिती भयानक होती, हे तत्कालीन आकडेवारीवरून लक्षात येईल. सन १८९१ च्या खानेसुमारीनुसार महाराष्ट्रात केवळ शून्य ते चार वर्षे वयाच्या विधवा झालेल्या, आईचे स्तनपानही न सुटलेल्या-शैशवावस्थेतील निरागस, कोमल बालिकांची संख्या १३,८७८ अशी होती.

धर्माच्या नावाखाली रुढी-परंपरा यांनी स्त्रियांचे भावविश्‍वच उदध्वस्त करून टाकले होते. स्त्रीजीवनावर वर्षानुवर्षे मनूचा अंमल चालला होता. स्रिया मग त्या उच्वकुलीन ब्राह्मण स्त्रिया असोत किंवा शूद्रातिशूद्र स्त्रिया असोत; या ठिकाणी मनूने उच्चनीच अशी विषमता निर्माण केली नव्हती. समाजात बालविवाह, जरठविवाह ह्या चाली सर्रास रुढ होत्या. हुंडा देऊ न शकणारा एखादा अगतिक बाप आपल्या. सात-आठ वर्षांच्या कोवळ्या मुलीस साठ-सत्तर वर्षांच्या एखाद्या वृद्धाच्या गळ्यात बांधून मोकळा होई.

तेव्हा-काहो अण्णा मी तुमची लाडकी ।
का करिता मला बोडकी ।॥
असा पोटच्या मुलीने फोडलेला टाहो त्या जन्मदात्या पित्यास-ऐकू जात नसे.
“लेकीचा जन्म । जन्म घालून चुकला ।।
बैल घाण्याला जुंपला । जन्मवैरी ॥
'लेकीचा जन्म । नको देऊ सख्याहरी ॥''
अशी स्त्रीजन्माची कर्मकहाणी होती.

ब्राह्मण सुधारकांची अगतिकता

वास्तविक केशवपनासारख्या दुष्ट रुढी उच्चवर्णीय स्त्रियांमध्ये होत्या. ह्या रुढी नष्ट व्हाव्या अशी आच ब्राह्मण समाजाला असणे स्वाभाविक होते. यासाठी ब्राह्मण सुधारकांनी प्रयत्न केले नाहीत असे नाही. परंतु त्या सुधारकांना अंगभूत परंपरानिष्ठ मर्यादा पडल्या. रानड्यांनी पहिली पत्नी वारल्यानंतर विधवेशी विवाह केल्यास वडिलांना अपार दु:ख होईल म्हणून अकरा वर्षे वयाच्या बालिकेशी लग्न केले. सासुरवाशीण मुलीला सासूचा जाच होईल म्हणून लोकहितवादीनी बिनबोभाट प्रायश्चित्त घेतले. भारतीय राजकारणात लोकमान्य टिळकांची प्रतिमा विलक्षण दीप्तीने झळकली. परंतु विचारात ठामपणा असणाऱ्या या नेत्याने चहा-ब्राह्मण्य प्रकरणात कच खाल्ली, पुनर्विवाहाबाबत रानड्यांनी दाखविलेली अगतिकता, शुद्धीकरणाच्या प्रश्‍नावरून लोकहितवादीनी सनातऱ्यांपुढे घातलेले लोटांगण, पहिली पत्नी जिवंत असता गोखल्यांनी केलेला दुसरा विवाह या पार्श्वभूमीवर जोतीरावांची आणि सावित्रीबाईंची तत्त्वनिष्ठा उजळून निघते, यात शंकाच नाही. जोतीराव आणि सावित्रीबाई या दांपत्याने आपला चूलबोळक्यांचा संसार न मांडता दीनदुबळ्यांचे संसार थाटण्यासाठी स्त्री-शूद्रांच्या सेवेच्या यज्ञकुंडात आपली आहुती दिली. हे दांपत्य काशीबाईसारख्या पतित विधवांसाठी अनाथाश्रम आणि बालहत्याप्रतिबंधक गृह स्थापन करून पतितोद्धार करीत होते, पतित स्त्रीच्या अनौरस अपत्यास आपले अपत्य मानूर त्यास कायदेशीररीत्या दत्तक घेऊन त्याचे पालनपोषण करीत होते. त्याला वैद्यकीय शिक्षण दऊन स्वावलंबी करीत होते, आपल्या मालमिळकतीचा सर्व हिस्सा त्याला मिळावा म्हणून “आमचे उभयतांचे पश्चात्‌ आमचा मुलगा यशवंत हा आमचे स्थावर व जंगम वर्गैरे हरप्रकारचे मालमिळकतीचा मालक असून, तो जाणता व सज्ञान झाल्यावर त्याजना केवळ तशी वहिवाट मात्र करून त्याने आपले वंशपरंपरेने सुखरुप उपभोग घेऊन मालकी करावी. आमचे मालमिळकतीवर आमचे भाऊबंद व पुतण्या गणपतराव राजाराम._ फुले वगैरे हरकोणाची मालकी अथवा वारसा अथवा दावा नाही व माझे मिळकतीवर कोणतेही प्रकारचा बिलकूल कोणाचा हक्क नाही.”* असे मृत्युपत्र तयार करीत होते;

त्याच काळात आणि त्याच पार्श्वभूमीवर उच्चवर्णीय सुधारक “'स्त्रियांनी जाकिटे घालावीत की न घालावीत'' असे सोज्ज्वळ लेख लिहिण्यात किंवा स्त्रियांना आपल्या शिक्षणसंस्थेत प्रवेश देताना स्वजातीची लक्ष्मणरेषा आखून घेण्यात धन्यता मानीत होते!


१८९० साली म. फुले यांचे निधन झाल्यानंतर सावित्रीबाईंनी त्यांच्या पश्‍चात सत्यशोधक समाजाची धुरा वाहिली. ही धुरा समर्थपणे वाहिली. चूल आणि मूल ही पारंपरिक विचारसरणी झटकून ही स्त्री सार्वजनिक कार्यासाठी बाहेर पडली. असे कार्य करणारी सावित्रीबाई फुले ही महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील पहिली स्त्री. त्या काळी उच्चवर्णीय सुशिक्षित स्त्रिया नव्हत्या असे नाही. परंतु त्यांच्या समाजजागृतीच्या कार्यालाही पारंपरिक मर्यादा होत्याच. हळदीकुंकवाचे सामुदायिक समारंभ साजरे करण्यापलीकडे त्यांच्या सुधारणा उंबरठा ओलांडून पुढे गेल्या नाहीत. माजघर आणि दिवाणखाना यातच त्या रॅगाळत राहिल्या.

सावित्रीबाईंनी पुणे आणि पुण्याच्या ग्रामीण परिसरात-सासवड, ओतूर, जुन्नर या ठिकाणी व्याख्याने दिली. सार्वजनिक सत्यधर्माचा प्रसार केला. सामाजिक सुधारणांचा हिरीरीने पुरस्कार करणारे आणि स्वत: ब्राह्मण असून ब्राह्मणांना शिव्या देऊन त्यांना आत्मपरीक्षण करावयास उद्युक्त करणारे लोकहितवादी, १८९२ साली निधन पावले. सासवड येथे सत्यशोधक समाजाच्या सभेत त्यांना श्रद्धांजली वाहिली गेली. वा थोर समाजसुधारकाच्या कार्याचे मूल्यमापन करताना सावित्रीबाई वा वेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात परखडपणे म्हणतात, *'आपल्या जातीचे दोष काढून टाकण्याचा त्यांनी (सरदार गोपाळराव हरी देशमुख) सदुपदेश केला. परंतु तत्कालीन ब्राह्मणांना जोतीबांची चळवळ समजून घेण्याची जशी पात्रता नव्हती, तशी देशमुखांचे बोलणे ऐकून घेण्याची अक्कल नव्हती.” निर्भीडपणा, निर्भयता, अंगीकृत कार्यावरील अविचल निष्ठा आणि त्यासाठी समाजाकडून अपमान, छळ सोसण्याची जिद्द हे त्यांच्या.व्यक्तिमत्त्वातील गुण असाधारण होते. त्यांचा आपल्या कार्यावरील आत्मविश्‍वास असामान्य होता. याबाबत त्या म. फुल्यांपेक्षा काकणभर सरसच होत्या. सावित्रीबाईंनी जोतीरावांपासून प्रेरणा घेतली हे खरेच. परंतु हे प्रेरणा घेण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी होते, हा त्यांचा विशेष. हे प्रेरणेचे शिवधनुष्य त्यांनी पेलले याला महत्त्व आहे. नायगावहून पुण्यास जोतीरावांना लिहिलेल्या दिनांक १०-१०-१८५६ च्या एका पत्रात त्या म्हणतात, ''पुण्यात आपल्या विषयी दुष्टाचा माजविणारे विदूषक पुष्कळ आहेत. तसेच येथेही (नायगाव) आहेत.
त्यांना भिऊन आपण हाती घेतलेले कार्य का सोडून द्यावे? सदासर्वकाळ कामात गुंतावे.भविष्यातले यंश आपलेच आहे.” सावित्रीबाईंचे हे विचार पाहता सावित्रीबाईंच्या प्रेरणेत कस कसा होता आणि त्यात केवढे सामर्थ्य होते याचा प्रत्यय येतो. म. फुल्यांनी समाजपरिवर्तनाचा प्रवाह उलट दिशेला फिरवून जी क्रांती केली त्याचे श्रेय या क्रांतिज्योतीला देणे कसे अटळ 'ठरते हे या उद्गारावरून लक्षात येते. जोतीबांना प्रेरणा, धैर्य आणि आशावाद देण्याचे सामर्थ्य या स्त्रीच्या ठिकाणी होते. याचे आश्‍चर्यकारक दर्शन घडते.

X

Right Click

No right click

Hits: 132
X

Right Click

No right click