बावन्नकशी सुबोध रत्नाकर - २

Parent Category: मराठी पुस्तके Category: सावित्रीबाई फुले - समग्र वाङ्मय Written by सौ. शुभांगी रानडे

॥ पेशवाई ॥

पुढे पेशवाई तिचे राज्य आले
अनाचार देखी अती शूद्र भ्याले
स्वथुंकी थुंकाया गळा गाडगे ते
खुणा नाश या दुंगणी झाप होते ॥१७॥

स्वराज्यी स्वधर्मी परी व्याघ्र दाढी
असंतोष त्यांचा कुणाही न काढी
प्रजेला एकसारखे वागवीती
तरी शूद्र सारे स्वधर्मी रहाती।॥१८॥

तुला बोलवी रावबाजी धनी ग
स्वपत्नीस धाडी निर्लाजा पती ग
छळे ब्राह्मणाला अशी स्त्रैणशाही
मुखा बोलती ही जळो पेशवाई ॥१९॥

पहा शंकराचे लुटी पूज्य क्षेत्र
अशी माजली पेशवाई विचित्र
पुढे जाहली मूर्खसत्ता विनाश
नसे दु:ख कोणा नसे सुख आस ॥२०॥

छळी स्त्रीस शूद्रा बहू पेशवाई
अशा कारणे इंग्रजी राज्य होई
ध्वजा इंग्रजी लाविता बाळ नातू
तया निंदती गेरवातील जंतू ॥२९॥

मिळे इंग्रजी फूस शूद्रादिकांना
लढाई कराया जमे जाति नाना
पराभूत हो पेशवाई करूनी
तिथे आणती शूद्र आंग्लाई शहाणी ॥२२॥

॥ आंग्लाई।।

करी इंग्रजी नोकरी ते अशूद्र
परी शूद्र स्रीया रहाती अशूद्र
तयी आंग्ल सत्ता उदे-हिंद देशी
प्रजेला सुधारी मराठी प्रदेशी ॥२३॥

इतिहास सत्ये घडे ते टिपीतो
तसा जोतिबाचा इतिहास ज्ञातो
अशी अव्वली इंग्रजी रम्य साची
तशी स्फूर्तिदायी कथा जोतिबाची ॥२४॥

मनुष्ये शिकाया असे पात्र प्राणी
वदे आंग्लशाही अभीजात वाणी
म्हणोनी शिकाय़ा डोळे आपणाला
स्त्रिया शूद्र सारे शिके वाचयाला ॥२५॥

पहा गर्जतो इंग्रजीचा नगारा
तसा वाटतो सत्तेचाही दरारा
अडाण्यास देती शिकाया सुसंधी
दरोडे, खुनी, चौर्य गुन्ह्यास बंदी ॥२६॥

न प्रभू येशू खिस्ती भटांची प्रशाला
लळा लावुनी शिकवी शूद्र बाळा
म्हणे मेंढरे ही कशी ख्रिस्त हाकी
फुका बोलती ही उगा बोंबठोकी ॥२७॥

असे शूद्र '“युगानुयुगे'' अभागी
नसे सूख काही सदा दु:ख भोगी
पशूसारखे मौन होऊन राही
अशा या दशेची कुणा लाज नाही ॥२८॥

जया जन्म-मृत्यू कळेना जराही
म्हणोनी पशूसारखे कष्ट नाही
नसे बुद्धि ज्याला नसे ज्ञान काही |
अशा मानवाला कधी सुख नाही ॥२९॥

म्हणे बांध शेती पहा या विहीरी
पहा पीक माझे कशी छान ज्वारी
मला गौरकांता तशी गोड पुत्री
असा दंभ ज्याला नसे तो सुपात्री ॥३०॥

करी जो बहू पाशवी दृष्ट कृत्ये
पराच्या सुखाचा करी द्वेष नित्ये
मनी लोभं ठेवी परस्त्री धनाचा
सदाचार नाही पशू हाच साचा ॥३१॥

अशा मानवाला नसे धर्म नीती
पशूसारखी त्याजला हीन वृत्ती
तयाचा हा जन्म वायाच गेला
तसा शूद्र हा शून्य माणूस झाला ॥३२॥

पहा इंग्रजीच्या सत्तावीस साली
जनी कोड सत्ताविशी उक्त झाली
असा लोभ हा काळ सुधारणेचा
पुणे स्वगृही जन्म रे जोतिंबाचा ॥३३॥

Hits: 165
X

Right Click

No right click