दख्खनची दौलत - ७

Parent Category: मराठी पुस्तके Category: शंकरराव किर्लोस्कर - पुस्तक Written by सौ. शुभांगी रानडे

या साऱ्या धकाधकीतही शंकरभाऊ स्थिरचित्त असत. ते म्हणतात ''मला राग येत नाही कारण, राग येणे म्हणजे दुसऱ्याच्या चुकीबद्दल आपल्याला शिक्षा करून घेणे असते.'' या विवेकी वृत्तीमुळेच अशा कटकटीच्या काळातही त्यांची विधायक कामे होत असत. उदाहरणार्थ विक्रत्यांचे संमेलन घेणे, ४२ व्या लढ्यात जीवदान केलेल्या आपल्या दोन सहकाऱ्यांच्या नावे कीर्तीस्तंभ उभा करणे. उपराष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन्‌ दक्षिणेकडील दौरा करून परत जात असल्याचे कळताच किर्लोस्करवाडीच्या स्टेशनावर गाडी थांबवून, कारखान्यातर्फे त्यांचा सत्कार करून त्यांचा संदेश मिळविणे इ. 'स्त्री' मासिकाला २५ वर्षे झाल्यामुळे रौप्यमहोत्सवासाठी सर्व लेखिकांचे संमेलन १७ सप्टेंबर १९५५ ला किर्लोस्करवाडी येथे मोठ्या उत्साहाने साजरे झाले. मालतीबाई बेडेकर या प्रारंभापासूनच्या प्रतिभावंत लेखिका अध्यक्ष होत्या.

आपले काका लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी १९१० मध्ये किर्लोस्कर कारखाना महाराष्ट्रात काढला. त्यामुळे 'महाराष्ट्राचे हेन्री फोर्ड' असे लोक त्यांना म्हणू लागले. याचा शंकरभाऊंना फार अभिमान वाटे. आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी ओलांडत, कारखाने उभारीत राहण्याचे जे महान कार्य त्यांनी केले त्याबद्दल वाटणारी कृतज्ञता म्हणून शंकरभाऊंनी त्यांचे जीवनचरित्र-२ वर्षे सतत वेळ काढून- 'यांत्रिकाची यात्रा' या नावाने लिहून पूर्ण केले. हे फार मोठे काम झाले. शंकरभाऊंनी नंतर कारखान्यातून निवृत्त होण्याचे ठरविले. दिवाळीव्या आधीच्या आठवड्यात ३ नोव्हेंबर १९५८ या दिवशी हा निरोपाचा कार्यक्रम झाला. कारखान्याचे कामगार, वाडीचे नागरिक व पंचक्रोशीतील ग्रामीण जनता त्यांना प्रेमपूर्वक निरोप देणार होती, त्याचे शंकरभाऊंना अगत्य वाटत होते.

त्यावेळी कारखान्याच्या कामगारांनी दिलेले मानपत्र

प्रिय शंकरभाऊ,

आमच्या किर्लोस्कर कारखान्याची सूत्रे खाली ठेवून आपण आता सेवा निवृत्त होत आहात. या प्रसंगी आम्हा सर्व कामगारांची अंत:करणे जड झाली आहेत. कारखान्याची नौका यशस्वी रीतीने हाकारून, आपले काका श्री लक्ष्मणराव किर्लोस्कर यांची परंपा अधिक उज्ज्वल करून, कृतार्ध होऊन आपण जात आहात.

आपल्या कारखान्याची जी अनेक वैशिष्ट्ये आहेत त्यात कामगार आणि चालक यांचा सलोखा हे एक स्पृहणीय वैशिष्ट्य आहे. हा सलोखा प्रस्थापित करून तो वाढीला लावण्यात आपला वाटा फार मोटा आहे. आम्ही त्याबद्दल आपले सदैव ऋणी राहू. किर्लोस्कर कारखान्याच्या आर्थिक व औद्योगिक बाजूला मासिकांच्या उपक्रमाने सांस्कृतिक बाजूची जोड देऊन, आपण एक वैशिष्ट्यपूर्ण कारखानदार असा नावलौकिक मिळविला. किर्लोस्करवाडीतील अनेक सामाजिक संस्था आणि सार्वजनिक उपक्रम यांच्या मुळाशी आपली प्रेरणा आहे.

साऱ्या महाराष्ट्राचे, विशेषत: कृष्णा-कोयनेच्या सानिध्याने पूनीत झालेल्या दक्षिण महाराष्ट्राचे झपाट्याने औद्योगिकरण व्हावे यासाठी आपण डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन हो संस्था स्थापन करून या भागातील कारखानदारांना मार्गदर्शन केले. 'कोयना परिषद' भरवून ही योजना चालू करण्याच्या कामी आपण जोराचा पुढाकार घेतला. पुण्याच्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्षपदही भूषविले. औंध संस्थानच्या लोकहितांच्या योजनांना आपण प्रत्यक्ष हातभार लावला असून त्या संस्थानचे दिवाणपदही आपण भूषविले होते.

आपले वक्तृत्व, लेखन, चित्रकला, क्रिकेटचा खेळ, शिकारीचा नाद, अभिनयाची आवड, संगीताची अभिरुची आणि कोणत्याही बिकट प्रसंगी शांतपणाने पुढे येऊन कौशल्याने त्यातून मार्ग काढण्याचे आपले कसब, यासारखे आपल्या व्यक्तिमत्वाचे अष्टपैलू जनतेला उद्बोधक व कारखान्याच्या वाढीला अत्यंत उपकारक झाले आहेत.
आपण सर्वोच्च अधिकारी असला तरी आपल्यात आणि कामगारात कोणत्याही प्रकारचा दुरावा किंवा अंतर कधीच निर्माण झाले नाही. आपण नेहमीच 'शंकरभाऊ' 'शंकरअण्णा' राहिला आणि खरोखरच आमचे थोरले भाऊ झालात.

आजपर्यंत आम्हा कामगारांना आपण मार्गदर्शन केले. यापुढेही आपले मार्गदर्शन आणि आपला आशिर्वाद आम्हाला सतत लाभू दे. अगत्यशील पत्नी, कर्तबगार मुलगा, सुविद्य कन्या, सून आणि खेळकर नातवंडे यांच्या सहवासात आमचे शंकरभाऊ दीर्घकाळ सुखाने राहोत, अशी आम्ही परमेश्वरापाशी प्रार्थना करतो.

आपले नम्र
किर्लोस्कर कारखान्याचा नोकरवर्ग
किर्लोस्कर वाडी
ता. ५ नोव्हेंबर १९५८

३ नोव्हेंबरला सांगलीचे राजेसाहेब चिंतामणराव पटवर्धन यांचे अध्यक्षतेखाली शंकरभाऊ व अनंतराव फळणीकर यांचा पत्नींसह सत्कार झाला. त्यांना मानपत्रे व
रौप्यकरंडक दिले. गौरवपूर्वक झालेल्या भाषणांची खूपच गर्दी झाली. डेक्कन मॅन्युफॅक्चर्रस असोसिओशनने श॑. बा. किर्लोस्कर यांना दिलेले मानपत्र

माननीय शंकरराव,
जीवनाच्या विविध क्षेत्रांत बहुमोल स्वरुपाचे विधायक. कार्य करून आता आपण मोठ्या समाधानी वृत्तीने व उत्साहाने एकसष्टाव्या वर्षात पदार्पण करीत आहात. अशा या शुभप्रसंगी आपले मनःपूर्वक अभिनंदन करताना आम्हा सर्वांना अत्यानंद होत आहे.यशस्वी संपादक, धडाडीचा कारखानदार, कुशल चित्रकार, कळकळीचा समाजसेवक व पुरोगामी विचारांचा पुरस्कर्ता अशा अनेकविध नात्यांनी आपण , महाराष्ट्राची व आपल्या देशाची बहुमोल सेवा केली आहे. किर्लोस्कर नांगर माहीत
नाही असा शेतकरी आणि किर्लोस्कर मासिक माहीत नाही असा साक्षर महाराष्ट्रीय मनुष्य मुद्दाम शोधायला गेले तरी सापडणे कठीण, अशी आज जी वस्तुस्थिती
आहे; तिचे बरेच श्रेय आपल्या कर्तबगारीलाच आहे.

परंतु केवळ किर्लोस्कर बंधूंच्या कारखान्यापुरतेच आपण आपले क्षेत्र मर्यादित ठेवले नाही. औद्योगिक विकासाशिवाय आपला देश सुखी, स्वावलंबी आणि सामर्थ्यसंपन्न होणार नाही हे बरोबर ओळखून, सरकार व सर्वसामान्य जनता या दोघांनाही या विचाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी आपण फार परिश्रम केले आहेत. कोयना धरण योजना सरकारने लवकर हाती घ्यावी म्हणून आपण केलेली खटपट, आपल्या नेतृत्त्वाखाली १९५० साली कोल्हापुरात भरलेले 'दख्छनची दौलत' प्रदर्शन हे दोन्ही उद्योग 'कारखानदारीला जोराने चालना मिळाली पाहिजे' या आपल्या इच्छेतूनच निर्माण झाले आणि 'मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज' व विशेषत: 'डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन' या नामवंत संस्थांचे अध्यक्ष म्हणून आपण केलेले कार्य तर फारच मोठे आहे. आपल्या खटपटीमुळे डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ही संस्था जन्मास आली. आपल्या कुशल मार्गदर्शनाखाली तिची वाढ झाली व होत आहे. संघटित झाल्याने किती मोठे कार्य होते ते या संस्थेने दक्षिणेतील कारखानदारांना दाखवून दिले.

'बुद्धिवादाचा पुरस्कर करून महाराष्ट्रात आपण वैचारिक जागृती घडवून आणलीत. तिचे महत्त्व तर औद्योगिक क्षेत्रातील आपल्या कार्याहूनही कदाचित अधिक श्रेष्ठ ठरेल. अस्पृश्यता, जातिभेद, अंधश्रद्धा, बुवाबाजी वगैरे समाजविघातक गोष्टींवर व जाचक रूढींबर जोराचा प्रहार करून, पुरोगामी विचारांचे लोण लहान सहान खेड्यापर्यंत पोहोचविण्याचे जे अवघड पण अत्यावश्यक कार्य आपण केले, त्याबद्दल आजची व उद्याची तरुण पिढी आपल्यास खचित धन्यवाद देईल.'

कर्तबगार माणसे रुक्ष असतात असा सर्वसाधारण अनुभव आहे; पण आपण मात्र या नियमाला अपवाद आहात. कर्तृत्व, कलासक्ती व क्रीडानैपुण्य या गुणांचा मोठा मनोहर त्रिवेणीसंगम आपल्यामध्ये झालेला आहे. औद्योगिक योजनांच्या आखणीप्रमाणेच चित्रकलेची उपासनाही आपण सारख्यात तन्मयतेने करू शकता.
यंत्राचा लयबद्ध आवाज ऐकण्यासाठी आपले कान जसे टवकारल्यासारखे असतात, तसेच दिलरुब्यातून बाहेर पडणाऱ्या मधुर स्वरमालिकाही आपल्या जिवाला विलक्षण मोहिनी घालू शकतात आणि क्रिकेटची बॅट अथवा टेनिसची रॅकेट हातात घेऊन जेव्हा आपण क्रीडांगणाकडे धाव घेता तेव्हा आपल्या चेहऱ्यावर व चालीत जी अधीरता दिसते ती पाहिली म्हणजे तर 'शंकरराव कधीही म्हातारे होणे शक्‍य नाही' असा विचार मनात येऊन मोठा आनंद होतो. मोठमोठी कामे यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी आवश्यक असलेले कितीतरी गुण आपल्या ठिकाणी आहेत. आपल्या अंगच्या या गुणसमुच्ययाचा स्वतंत्र भारताच्या सर्वांगीण उन्नतीसाठी शक्‍य तितका अधिक उपयोग व्हावा म्हणून करवीर-निवासिनीने आपणास दौर्घायुरारोग्य द्यावे अशी तिच्या चरणी नम्र प्रार्थना
आहे.
स. गो. पाध्ये
उपाध्यक्ष, डे. मॅ. असोसिएशन
कोल्हापूर, १० नोव्हेंबर १९५१

निरोप समारंभ पार पडल्यावर किर्लोस्करवाडीकडे बघताना, १९१४ साली कुंडलच्या माळावरील झोपड्यांचे चित्र शंकरभाऊंच्या मनासमोर येत होते. त्यामधून
किर्लोस्कर कारखान्यांचा विस्तार होऊन आता नव्या पिढीतील तरुण मंडळी आवश्यक ते तांत्रिक ज्ञान संपादन करून या कारखान्याची धुरा समर्थपणे वाहण्यास पुढे येत होती. पन्नास वर्षांत एक नवी सृष्टीच जणू उभी राहिली होती. आता भविष्यकाळाचे उज्ज्वल स्वप्न त्यांना दिसत होते आणि आपला कार्यभाग आपण प्रामाणिकपणे पार पाडला अशी पावती त्यांचे मन देत होते.

Hits: 131
X

Right Click

No right click