दख्खनची दौलत - १
'अशा परिस्थितीत भारतामधून इंग्रजांनी चंबूगबाळे उचलले ते ठीकच झाले; पण ब्रिटिश जाताच त्यांच्या आधारावर ज्यांचे अस्तित्व टिकले होते त्या संस्थानातील कारखानदारांची मोठी विचित्र परिस्थिती झाली. त्यांचा मुख्य आधारच गेला. या संकटाचा विचार करण्यासाठी भोरपासून कोल्हापूरपर्यंतच्या संस्थानातील नातू, दिवेकर, कृपर, मराठे या त्यांच्या उद्योजक मित्रांना शंकरभाऊंनी बुधगावला येण्याचे निमंत्रण दिले; सर्वांच्या ओळखी झाल्या. त्यांच्या अडचणीचे प्रश्न ऐकून घेतल्यावर शंकरभाऊंनी त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी अनेक सूचना केल्या.
''संकट आले म्हणून आपले गाव सोडून दुसरीकडे जाण्याऐवजी, आपल्या जागी पुन्हा पाय रोवून उभे राहण्यासाठी आपली सर्वांची एकजूट झाली पाहिजे. जितके हात एकत्र येतील तेवढा आपला आत्मविश्वास वाढेल. नव्या प्रयत्नांना उभारी येईल.'' असे विचार ऐकल्यावर सर्वांची चर्चा होऊन, शंकरभाऊंना अध्यक्ष करून
'डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन' ही संस्था स्थापन झाली. सांगलीचे आबासाहेब खेबुडकर, कोल्हापूरचे रामभाई सामाणी यांनी सेक्रेटरीचे काम स्वीकारले. आपापल्या गावी जाताना शंकरभाऊंचा उत्साह, आणि उद्योगप्रेम यानेच आत्मोन्नती होईल असा विश्वासही कारखानदारानी बरोबर नेला व संघटनेचे काम चांगले सुरू झाले.
दुर्दैवाने गांधीवधानंतर जाळपोळीत दहा दिवसांत दक्षिणेत कोट्यांवधी रुपयांची मालमत्ता नाश पावली, असंख्य कुटुंबे होरपळून निघाली व महाराष्ट्रातील उद्योगाला फार जोराचा तडाखा बसला. शे-दीडशे जुने वाडे नाहीसे झाले. पंधरा-वीस माणसांची हत्या झाली. चाळीस कारखाने भस्मसात झाले. घरे-छप्परे किती जळाली याचा पत्ता नाही. या स्थितीतून डोके वर काढण्यासाठी 'बचेंगे तो और भी लढेंगे' अशा आत्मविश्वासाने सर्व कारखानदार कामास लागले. शंकरभाऊंचा विचार नेहमी व्यापक असे. पुण्यामध्ये 'केसरींचा', जाहिरात विभाग सांभाळणारे आ. रा. भट यांनी व्यापारी, धंदेवाईक, उद्योजक यांची एक मराठा चेंबर नावाची संघटना असावी, असा विचार पुष्कळ दिवस चालविला होता. शंकरभाऊ त्यांना भेटायला जात आणि ही संघटना पुणे शहर किंवा जाहिरातीपुरती ठेवू नये असे सांगत. यातूनच मराठा चेंबर ही संघटना सुरु झाली. त्यामुळे डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ही संस्था त्यांनी मराठा चेंबरच्या सभासदांत जोडून घेतली आणि इतरही उद्योजक, व्यापारी अशा संस्थांशी संपर्क जोडण्याचे प्रयत्न करण्याकडे लक्ष वेधले. १९४६ मध्ये शंकरभाऊ मराठा चेंबरचे अध्यक्ष झाले, त्याबद्दल आ. रा. भट सांगतात, ''शंकरराव अध्यक्ष झाल्यापासून गेल्या तीन वर्षात त्यांची धडाडी, कल्पकता, आधुनिक धर्तीवर काम करण्याच्या पद्धतीचा चेंबरला फार उपयोग झाला. पहिल्या धडाक्याला चेंबरच्या इमारतीची योजना झाली. आणखी अभिमानाची गोष्ट म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्राची स्थापना करून महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांना खेळत्या भांडवलाचा पुरवठा होऊ लागला. आगीचा विमा उतरण्यासाठी कॉमनवेल्थ विमा कंपनीस प्रोत्साहन दिले गेले, मराठा चेंबरला सरकारी मान्यता मिळवून सर्व महत्त्वाच्या संस्थांवर चेंबरच्या प्रतिनिधींना जागा मिळाली.
दिल्लीतील संयुक्त व्यापारी संघाच्या अधिवेशनासाठी शंकरभाऊ मराठी प्रतिनिधींबरोबर गेले होते. अधिवेशनातील भाषणांत ते म्हणाले, ''या निमित्ताने आम्ही महाराष्ट्रातील मंडळी आणि दिल्लोतील मराठी मंडळी यांच्या भेटीगाठी होतात. जुन्या ओळखी दृढ होतात. हिंदी व्यापारी संघाच्या अधिवेशनातून आम्हाला एकप्रकारची स्फूर्ती मिळते, म्हणून आम्ही येथे येतो. आपला प्रांत औद्योगिकदृष्ट्या सुधारला पाहिजे असे वाटते; पण व्यापारी संघाची मंडळी आणि महाराष्ट्रातील मंडळी यामध्ये बरेच अंतर आहे.
महाराष्ट्रात पैशाच्या बळावर कारखानदार झाले नसून, उत्पादनाचे कौशल्य, कसब व कष्टामुळे ते कारखानदार झाले आहेत. हिंदी व्यापारी संघाने वडिलकीच्या नात्याने विचार करावा. व्यापार-उद्योगातील सत्ता थोड्या लोकांच्या हाती असते व सर्व अर्थकारणाचा संबंध प्रधानत: त्यांच्यापाशी पोचतो. फाळणीमुळे आलेल्या बिकट प्रश्नांचा विचार करावा. दक्षिण महाराष्ट्रात गांधीवधानंतर दंगलीमध्ये औद्योगिक साधनसामुग्रीचा नाश झाला आहे. या सर्व अडचणीतून आम्ही मार्ग काढीत असतो. पैसा हा सर्वांना हवा असतो. आपण संक्रमणावस्थेतून जात आहोत. अशावेळी आम्हाला आपल्या मार्गदर्शनाची, सहानुभूतीची व उत्तेजनाची आवश्यकता आहे.'' त्यानंतर मुंबईस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर व गृहमंत्री मोरारजी देसाई यांची भेट घेतली आणि दक्षिणेतील कारखान्यांचा पुन्हा जम बसविण्यासाठी मदतीची गरज निकडीची आहे हे सांगितले, आणि थोड्या दिवसांत प्रत्येक कारखान्यास २५००० रुपये ७ ते १० वर्षे. २॥ टक्के व्याजाने देण्याची व्यवस्था मान्य झाली.
Hits: 117