८. अखेरचे पर्व - १

Parent Category: मराठी पुस्तके Category: एस्‌. एम्‌. जोशी : स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी नेते Written by सौ. शुभांगी रानडे

एस. एम्‌. अंत:करणाने प्रेमळ होते, परंतु बोलण्यात मात्र ते कोकणी माणसांप्रमाणेथ कमालीचे फटकळ होते. कार्यकर्ते चुकले की एस्‌. एम्‌. कठोर शब्दांत त्यांची कानउघाडणी करीत. पण त्यांच्या मनात कधी आकस नसे. धनदांडग्यांना, सत्तेचा उन्माद चढलेल्या राजकारण्यांना फटकारताना एस्‌. एम्‌. यांच्या जिभेला विलक्षण धार येई. परंतु तरीही त्या संतापामागे द्वेष वा मत्सर नसे. गरिबांचे दु:ख पाहून मात्र एस्‌. एम्‌. चे अंत:करण कळवळत असे आणि त्यांचे शब्द एकदम मृदू होत. अन्यायाविरुद्ध संघर्ष करताना कठीण वज्राला भेदू पहाणारे एस्‌. एम्‌. दलित, उपेक्षित बांधवांचे, स्रियांचे दु:ख पाहून मात्र मेणाहून मऊ होत असत. एस्‌. एम्‌. वागायला सरळ होते, पण भोळे मात्र मुळीच नव्हते. लबाडी, दंभ, अप्रामाणिकपणा त्यांच्या चट्कन लक्षात येत असे. राजकारणातील सारे छक्केपंजे ते सहज ओळखत. ते कधी ढोंगामुळे फसत नसत. मात्र प्रत्येक माणसातला सद्भाव ते शोधत असत. 'ऊस डोंगा परी रस नोहे होंगा' असा त्यांचा मनोमन विश्वास होता आणि दुर्जनांच्या मनातीलही सद्‌भावनेचा अंश आपल्या प्रामाणिकपणाने, साधुत्वाने जागृत करण्याची धडपड ते करीत असत. एस्‌. एम्‌. बोलण्यातच केवळ प्रांजळ नव्हते. त्यांचे व्यक्तिमत्वच पारदर्शी होते. त्यांचा संतापही सात्त्विक असे आणि त्यांच्या भावनेचा उमाळा शत्रूच्याही मनाला स्पर्श करीत असे. एस्‌. एम्‌. यांच्याबद्दल कोणाच्या मनात गैरसमज झाले, त्यांचे अनुयायी जरी त्यांच्यावर रागावले, तरी एस्‌. एम्‌. कधी त्याचे निराकरण करीत नसत. ते म्हणत, 'मी असा का वागलो, ते त्याला काही दिवसांनी कळेल आणि मग त्याची नाराजी दूर होईल.'

एस्‌. एम्‌.च्या स्वभावात भावनांची उत्कटता जाणवत असली तरी त्यांच्या प्रत्वेक कृतीला, त्यांना मनोमन पटलेल्या विचारांचे खंबीर अधिष्ठान असे. ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहात. कारण तत्त्वांना मुरड घालण्यास ते कधीही तयार नसत. त्यामुळे अनेकांना ते हेकट वाटत. परंतु एस्‌. एम्‌.ना त्याची फिकीर वाटत नसे. एस्‌. एम्‌.च्या सात्त्विक संतापाच्या आविष्कारामुळे त्यांच्या अनुयायांच्या मनांतील शंकाचे मोहोळ दूर होई आणि सत्यासाठी व न्यायासाठी लढणाऱ्या एस्. एम्‌.च्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा ते निर्धार करीत असत. एस्‌. एम्‌.च्या स्वभावात भावनांची उत्कटता होती. त्याचबरोबर त्यांची विनोद बुद्धीही तीव्र होती. खास कोकणी भाषेत ते दांभिकतेचा फुगा फोडून टाकत. अश्लील म्हण ते सहज वापरून जात, त्या वेळी त्यांचा नव्याने परिचय झालेल्या माणसाला धक्काच बसे. पण या सार्‍या परस्परविरोधी छटा त्यांच्या वागण्याबोलण्यात असल्या तरी त्यांच्या निकट सहवासात आलेल्यांच्या मनावर त्यांची उदात्त प्रतिमाच उमटत असे. कारण त्यांचे जीवन थ्येयासक्त होते, समर्पित होते.

एस्‌. एम्‌.ना, नाटक आणि सिनेमा पाहण्याची हौस होती. राजकीय आणि सामजिक कामांच्या व्यापातूनही कधी तरी वेळ काढून ते आणि ताराबाई सिनेमाला किंबा नाटकाला जात. एस्‌. एम्‌.ना, शाळेत असल्यापासून क्रिकेटची आवड होती आणि ते स्वत: क्रिकेट शाळेनंतर पुढे कधी खेळले नाहीत तरी क्रिकेट मॅचबद्दल त्यांना फार उत्सुकता असे. रेडिओवरील मॅचची कॉमेंटरी ऐकण्यात आणि पुढे दूरदर्शनवर मॅच पाहण्यात ते रंगून जात. अभिजात संगीतही त्यांना आवडत असे.

एस्‌. एम्‌. यांची प्रकृती मात्र चांगली नव्हती. लहानपणी गरिबीमुळे झालेली आबाळ आणि नंतर स्वातंत्र्य चळवळीतील पाच सह्य वर्षे सोसलेला 'क' वर्गातील तुरुंगवास, यामुळे त्यांची पचनक्रिया बिघडून गेली होती. ते सकाळी एक वेळ जेवत आणि संध्याकाळी दूध घेत वा थोडेसे खात. भिडस्त स्वभावामुळे राजकीय कामासाठी वणवण करीत फिरताना ते कोणालाही त्रास पडू नये म्हणून खाण्याची कसलीही आवड निवड ठेवत नसतं. 'जे पानावरती पडेल पुढती नेमस्त ते भक्षिणे' अशी त्यांची रीत होती. ग्रामीण भागात तिखट खावे लागले की त्यांचे पोट बिघडत असे. थंडी गारठा झाला की त्यांना अनेकदा थोडा ताप येई. त्यांना सतत औषधे घ्यावी लागत. वैद्य मामा गोखले यांच्या उपचारांमुळे त्यांचा आजार वाढला नाही. पन्नाशीनंतर ते खाण्यापिण्यात अधिक निर्बंध पाळू लागले. एस्‌. एम्‌. उंच होते पण त्यांची शरीरयष्टी किरकोळ होती. वर्णाने ते गोरे होते. नाकीडोळी नीटस होते. खादीचा धुतलेला पायजमा च नेहरू शर्ट असा त्यांचा पोषाख असे. बाहेर जाताना ते कोट घालीत. एकूण खाणे, कपडे याबद्दल ते बेफिकीरच असत.

ताराबाईंनी भावे स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी करीत संसाराची आर्थिक जबाबदारी उचलली. एस्‌. एम्. त्यांच्या राजकीय कामात इतके गुरफटलेले असत की मुलांकडे लक्ष द्यायला त्यांना फुरसदच नसे. मुलांची दुखणी, अभ्यास यांची जवळजवळ सर्व जबाबदारी ताराबाईंनाच पार पाडावी लागली. मुले अभ्यासात हुशार होती. थोरला अजेय एम.बी.बी.एस. होऊन पुढे मुलांचा तज्ज्ञ डॉक्टर झाला. त्याने "आश्विनी" म्हणून हॉस्पिटल चालवले आहे. धाकटा मुलगा अभय हा एअरफोर्समध्ये पायलट झाला. १९६२, १९६५ आणि १९७१ या तिन्ही वेळा तो युद्धभूमीवर काम करीत होता. मात्र दोघांही मुलांनी राजकारणात रस घेतला नाही. एस्‌. एमू-ची थोरली सून कांचन हीही डॉक्टर आहे. अभय पुण्यापासून दूर असे. अजेय आणि कांचन यांच्याजवळच एस्‌. एम्‌. आणि ताराबाई राहिले. मुलांवर आईवडिलांचे मायेचे छत्र होते. परंतु एस्‌. एम्‌.चा स्वातंत्र्य चळवळीतील कारावास आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही समाजवादी चळवळ, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आदींमधील जबाबदाऱ्या यामुळे मुलांचे कौडकौतुक करायला त्यांना पुरेशी उसंत मिळाली नाही. नातवंडे या बाबतीत अधिक भाग्यवान ठरली. डॉ. अजेय एकदा आपल्या मुलाला म्हणाला, "तुमची मजा आहे. अण्णा तुमचे जितके लाड करतात तसे आमचे नाही त्यांनी केले." यावर एस्‌. एम्‌. म्हणाले, 'म्हातारपणी मनही अधिक हळुवार होते आणि नातवंडांचे लाड करण्यात एक वेगळाच आनंद असतो.'

१९८४ साली एस्‌. एम्‌. यांच्या प्रकृतीत जो बिघाड होऊ लागला, त्याचे निदान करण्यासाठी त्यांना मुंबईला नेण्यात आले आणि डॉक्टर कामतांनी कॅन्सरचे निदान करून औषधोपचार करण्यास सुरुवात केली. ताराबाईंचीही प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. ताराबाईंचा आजार बळावला आणि ६ सप्टेंबर १९८६ रोजी त्यांचे निधन झाले. आयुष्यभरची सहचरी गेल्यानंतर एस्‌. एम्‌. यांच्या जीवनात मोठीच मोकळी निर्माण झाली.

Hits: 160
X

Right Click

No right click